Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

आडनावात काय आहे?

$
0
0

संकलन - अमिता बडे
लग्नानंतर नाव-आडनाव बदलणार नाही, अशी ठाम भूमिका मुली आज घेऊ लागल्या आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या या भूमिकेला त्यांच्या जोडीदारांकडूनही पाठिंबा मिळू लागलाय. ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे.

लग्नानंतर मला माझं नाव आणि आडनाव दोन्ही बदलायचं नाही, असं सुवर्णानं सांगितल्यावर तिच्या सासरचेच नव्हे तर तिचे आई-वडिलही आश्चर्यचकित झाले. तिने हा हट्ट सोडावा यासाठी तिची हर एकप्रकारे समजूत घालण्यात आली. पण ती तिच्या मतांवर ठाम होती. तिच्या या निर्णयाला तिच्या नव‍ऱ्याने संजयनेही पाठिंबा दिल्यानंतर मग कुणाचेच काही चालले नाही. आणि अखेर लग्नानंतरही सुवर्णा तिच्या पूर्वीच्या नावाने वावरत आहे....

अलीकडेच एका मॅट्रिमोनियल वेबसाइटने विवाहयोग्य मुलींबाबत केलेल्या पहाणीत त्यांना लग्नानंतर तुमचे आडनाव बदलायला आवडेल का असा प्रश्न विचारला, त्यावेळी जवळपास ४०.४ टक्के मुलींनी लग्नानंतर माहेरचेच आडनाव कायम ठेवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

नावात काय आहे असं शेक्सपिअरने म्हटलं आहे. पण, आजच्या काळात नावातच सर्व काही आहे. पण अजूनही आपल्याकडे मुलीचं लग्न झालं की तिचं आडनाव आणि नावही बदलली जातात... ही प्रथा म्हणूनही अनेक जणी स्वीकारतातही; पण 'मीच नाव का बदलायचं?' हा प्रश्न पडतोच. आपली पूर्वीची ओळख पुसली जाणं, आजच्या मुलींना अमान्य आहे. लग्नानंतर माहेरचंच आडनाव लावणा-या मुलींना आजही हजारो प्रश्नांना सामोरे जावे लागते. विविध सरकारी-खासगी कचे‍‍ऱ्यांमध्ये कामात अडवणूक केली जाते. विशेष करून बँकांमध्ये अकाऊंट काढताना, पासपोर्ट काढताना, कर्ज काढताना, मुलांच्या जन्माच्यावेळी अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी आपल्या मतांवर खंबीर असलेली स्त्री या सगळ्याला धाडसाने सामोरी जाते तर, काही जणींना आपल्या मतांना मुरडही घालावी लागते. अलीकडच्या काळात लग्नाआधीच मी नाव-आडनाव बदलणार नाही अशी ठाम भूमिका मुली घेऊ लागल्या आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या या भूमिकेला त्यांचे होणारे नवरे मंडळीही पाठिंबा देत आहेत. यामुळे हा बदल निश्चितच स्वागतार्हच म्हटला पाहिजे. ही विचारधारा हळूहळू समाजही स्वीकारू लागला आहे. पण अजूनही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नाही. आपल्या सरकारी यंत्रणेची, तिथल्या अधिका-यांची मानसिकता बदललेली नाही. हीच मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे.

कायद्याचं ज्ञान आवश्यक

लग्नानंतर नाव बदलणं ही केवळ एक प्रथा आहे. त्यामागे कोणतंही कायदेशीर असं ठोस कारण नाही. माझ्याबाबतीत लग्नानंतर नाव न बदलण्याच्या निर्णयाला माझ्या नव-याने पूर्ण पाठिंबा दिला. माझा पासपोर्ट काढण्याच्यावेळी सिस्टिमबरोबरच्या लढ्यातही ते माझ्याबरोबरीने सहभागी झाले होते. आमच्या दोघांच्या या संघर्षामुळे अखेर माझ्या माहेरच्या नावाने मला पासपोर्ट मिळाला. कायद्याचं ज्ञान करून घेतल्यामुळेच मी हा संघर्ष करू शकले.

- माधुरी दिक्षीत, प्राध्यापक

... आणि विरोध मावळला

माझं नाव ही माझी ओळख आहे. एका एनजीओमध्ये काम करत असल्याने जुन्या नावानेच मला अनेकजण ओळखतात. केवळ लग्न झालं म्हणून ही ओळख पुसणं मला शक्य नव्हतं. लग्नानंतर नाव न बदलण्याच्या निर्णयाला मिस्टरांनीही पाठिंबा दिल्याने अनेक गोष्टी सुसह्य झाल्या. या निर्णयाबद्दल सासरच्यांनी आपली नाराजी आडून-आडून व्यक्त केली होती. पण नव-याचा खंबीर पाठिंबा होता. बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झाले तेव्हा तिथे माझं नाव नकळत बदललं गेलं. हे मान्य नसल्यानं कालांतरानं अनेक खटपटी करून मी नाव बदलून घेतलं. पण हे करत असताना सरकारी अधिका‍ऱ्यांच्या अनेक प्रश्नांना सामोरं जाताना अक्षरश: नाकी नऊ आले. पण माझा हा संघर्ष यशस्वी झाला.

-दीपा ठाकूर, एनजीओमध्ये कार्यकर्ती

हे ही शोषणच!

लग्नाच्यावेळी मुलीचं नाव बदलणं हे, पितृसत्ताक पद्धतीचं द्योतक आहे. केवळ परंपरा, रुढी अशा लेबलांखाली या गोष्टी सुरू आहेत. लग्नानंतर नाव न बदलण्याच्या निर्णयाचा माझ्या नव-याने आदर केला. मात्र,गृहकर्जाच्या वेळी बँकांमध्ये केलेले अर्ज आमच्या दोघांच्या वेगळ्या नावांमुळे फेटाळले गेले. मग नाइलाजाने मला नावात बदल करावा लागला. या अनुभवावरून आपल्याकडची सिस्टिम किती निर्ढावली आहे, इथल्या कर्मचा‍ऱ्यांची मानसिकता अजूनही किती संकुचित आहे हेच सिद्ध झालं. त्यामुळे सरकारी यंत्रणा याद्वारे पुन्हा एकदा स्त्रीचं शोषणच करते, असं खेदाने म्हणावंसं वाटतं.

-छाया थोरात, नोकरी

नाव हीच माझी ओळख

माझं नाव ही माझ्या आत्म्याची ओळख आहे. लग्नाआधीपासून साहित्यक्षेत्रात मुशाफिरी करत होते. स्वतःची ओळख निर्माण होत असताना लग्नाच्या बोहल्यावर मी चढले. लग्नानंतर बदललेल्या सुनीता झाडे-वानखेडे या नावाने लिखाण करताना ओळख हरवल्यासारखी वाटली. जीव घुसमटत होता..याबाबत नव‍ऱ्याशी म्हणजे देवेंद्र वानखेडेंशी बोलले. त्यांच्या पूर्ण पाठिंब्यावर मी माझं स्वतंत्र अस्तित्व पुन्हा निर्माण केलं. हा बदल काहींनी स्वीकारला तर काहींनी नाकारलाही... पण यामुळे माझ्यातील जिद्द, चिकाटी वाढली. माहेरचं नाव लावणा-या महिलांना समाजातील दृषित दृष्टीकोनाचा सामना करावा लागतो. कायदेशीर, कौटुंबिक बाबतीत अनेक अडचणीही आल्या.. लग्नाला १८ वर्ष झाल्यानंतरही 'तू आमची कधी झालीच नाही' म्हणून झिडकारलं गेलं. अशा वेळी 'सुनीता झाडे' हे नाव माझ्या अस्तित्त्वाच्या संघर्षाची लढाई ठरू पाहणारं ठरलं. माझी मुलगी श्रावणी वानखेडे ही माझी ओळख करून देतांना 'ही माझी आई सुनीता झाडे', असं जेव्हा सांगते तेव्हा दुखावल्या मनावर अलवार फुंकर घातली जाते.

- सुनीता झाडे, कवयित्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>