दीपिकाचा 'माय चॉइस' युट्यूब व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. 'तिने जे म्हटलंय ते बरोबरच आहे' असं अनेकींना वाटतंय. पण यातल्या अनेक गोष्टी अतिरेकी आहेत. स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचं समर्थन कसं करणार? असंही काहीजणींना वाटतंय.
दीपिकाच्या व्हिडिओवरुन ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दोन गट पडल्याचं दिसून येतंय. दीपिकाचं अभिनंदन करणारा, तिला पाठिंबा देणारा एक गट आहे. तर दुसरा गट असं म्हणतोय की जगातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये दीपिकाची 'चॉइस' मान्य होणार नाही. या व्हिडिओतल्या अनेक गोष्टी तर्कशुद्ध नसल्याचं म्हणणारा दुसरा गट आहे. ब्लॉग्स, व्हिडिओ, कमेन्ट, टोमणे यांच्या माध्यमातून या दोन्ही गटांचे सध्या सोशलनेटवर्किंगवर पोस्टवॉर रंगलं आहे.
अनेक मुलींनी दीपिकाच्या मतांना विरोध दर्शवला असून स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही करणं चुकीचंच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आजची महिला सक्षम आहे हे दाखवण्यासाठी या व्हिडिओमध्ये सगळ्याच मर्यादा ओलांडण्यात आल्याचं मत अनेक नेटिझन्सनी नोंदवलं आहे. अनेक मुलींनी 'सॉरी, दीपकिाज चॉइस इज नॉट माय चॉइस' अशा आशयाच्या पोस्टस शेअर केल्या आहेत.
प्रेरणादायी
मी पहिल्यांदा 'माय चॉइस' व्हिडिओ पाहिला तेव्हा मला तो खूप प्रेरणादायी वाटला. मी तो शेअरसुद्धा केला. त्या व्हिडिओबद्दल माझ्या मित्र-मैत्रिणींशी मी बोलले. आमची चर्चा झाली तेव्हा वाटलं आताच्या स्त्रीला जे हवं आहे ते हे नक्कीच नाही. आपण फेमिनिझम वगैरे म्हणत असलो तरी ते स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलतो. पुरुषांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असा याचा अर्थ होत नाही. दीपिकाला माझ्या सारख्या तरुणी आयडॉल मानतात. त्यामुळे तिचा हा व्हिडिओ मुलींवर खूप प्रभाव पाडतो. शिवाय यातून आपण पाश्चात्य संस्कृतीकडे जरा जास्तच ओढले जातोय.
क्षिप्रा जोशी, जिम्नॅस्ट
म्हणून स्वैराचार नको
हा पब्लिसिटी स्टंट नाही वाटत. अजाणतेपणी का होईना, अजूनही आमच्यावर निवड करताना समाजाचं दडपण असते. हा व्हिडिओ बघितल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. परंतु यातले सगळेच मुद्दे मला पटले नाहीत. विवाहबाह्य संबंध यासारखे काही अयोग्य मुद्देही यात मांडले आहेत. स्त्रियांना चॉईस करण्याचा हक्क असावा. पण स्वैराचाराने वागणंही योग्य नाही.
- शाल्मली सुखटणकर, गायिका
सुरूवात तर झालीय
आपल्या जगण्याचा मार्ग आपण आपल्या पद्धतीने निवडावा, हा संदेश अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तो प्रयत्न झालेला दिसतो. पण अजून परिणामकारक पद्धतीने ही सुरुवात करता आली असती. आपण सर्वांनी पुढे येऊन ही सुरूवात चांगल्या ठिकाणी नेऊ शकतो.
- भाग्यश्री सावंत, गिर्यारोहक
उमेद देणारा
महिलांचा आत्मविश्वास वाढवणं ही एक चांगली सुरूवात आहे. त्यांना हवं जगता आलं पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे समाजाला याबाबतीत जागं करण्याची ही वेळ आहे. महिलांना पुढे जाण्यासाठी लागणारं स्वातंत्र्य त्यांनी मिळवलं पाहिजे, ही उमेद त्यांना हा व्हिडिओ देताना दिसतो.
- निकिता बाणावलीकर, नृत्यांगना
आक्षेपार्ह काय?
'माय चॉइस'वर बऱ्याच मोठ्या लेखकांनी टीका केली आहे. मला मात्र यात काही आक्षेपार्ह जाणवत नाही. महिला सबलीकरणावर केलेला हा हटके असा प्रयत्न आहे. कारण तो आपल्या भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे असं भासू शकतं. सर्वांनाच उद्देशून हा व्हिडियो युट्यूबवर टाकला आहे. त्यामुळे आपण विचार करतानाच मुळात ग्लोबल दृष्टीकोन लक्षात घ्यावा.
- ऐश्वर्या वाळवेकर, अभिनेत्री
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट