त्या दिवशी मी टॅक्सीनं घरी येत होते. इतक्यात रस्त्यावर एके ठिकाणी गर्दी जमलेली पाहून, मी बाहेर आले. पाहते, तर दोन मुली जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल्या होत्या. त्यांच्या भोवती जमलेला जमाव त्या मुलींना मदत करण्याऐवजी मोबाइलवर फोटो, व्हिडिओ काढण्यात मग्न होता. ना कुणी मदतीसाठी पुढे येत होतं, ना कुणी पोलिसांना किंवा अॅम्ब्युलन्सला फोन करून बोलावत होतं. मी पुढे झाले आणि त्या दोघींना टॅक्सीतून हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी दाखवली. पण मुलींना उचलून टॅक्सीत ठेवण्यासाठीही कुणी पुढे येत नव्हतं. 'अहो, ही पोलिस केस आहे. तुम्ही कशाला यात पडता?' असं मला सांगण्यात आलं. काही वेळानं पोलीस तिकडे आले. आता बघ्यांनी चर्चा करणं सुरू केलं. 'असं झालं, तसं झालं असं बरंच काही चाललं होतं' मी स्वतः हा अपघात पाहिला नसल्यानं मी त्याविषयी पोलिसांना काही सांगू शकत नव्हते. पोलिसांनी या दोघींना हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र तोपर्यंत त्या दोघींचा जीव गेला होता.
मुंबईकर कुणाला मदत करत नाही असं नाही. मुंबईकरांनी एकत्रितपणे केलेल्या मदतीची उदाहरणं अनेक आहेत. पण जेव्हा व्यक्तिगतरित्या मदत करण्याची वेळ येते, तेव्हा लोकांची माणुसकी कुठे जाते हा प्रश्नच आहे. पोलिस घटनास्थळी येईपर्यंत आपलीही काहीतरी जबाबदारी आहे. यामध्ये फोटो काढत उभ्या असणाऱ्या तरुणांचाच दोष आहे असं नाही. त्यांच्यावर घरातून, समाजाकडून योग्य ते संस्कार होणं आवश्यक आहे. त्या दोन मुलींच्या ठिकाणी आपली जवळची व्यक्ती असती तर आपण फक्त बघत उभे राहिलो असतो का? असा प्रश्न जेव्हा त्या बघ्यांना पडेल तेव्हा पुन्हा असं होणार नाही. पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून घाबरून पुढे न येणाऱ्या लोकांकडे अपघाताच्या चर्चा करण्यासाठी वेळ असतो. पण अॅम्ब्युलन्स बोलवायला वेळ नसतो. त्यावेळी मी पुढे झाले, म्हणून मला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे झाला नाही. मात्र त्रास झाला तो त्या संवेदनाशून्य बघ्यांचा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट