गेली नऊ-दहा वर्षं लोकसंस्कृतीच्या अभ्यासापायी तिने कोकणातली अनेक गावं पालथी घातली आहेत. सततचा प्रवास आणि लोकांत मिसळण्याच्या छंदामुळे शिल्पा वाडेकरचं आयुष्य एखाद्या जिप्सीप्रमाणेच झालं आहे. लहान असताना शिल्पाने वडिलांसोबत संपूर्ण देशभ्रमण केलं होतं. तेव्हापासून पायाला लागलेली भिंगरी अजून टिकून आहे. सगळा देश पालथा घालून झाल्यानंतर तिला भुरळ घातली लाल मातीच्या कोकण-गोव्यानं. या भटकंतीमागे लोकसंस्कृतीचा अभ्यास हे एक मोठं ध्येय आहे.
शैक्षणिक आणि संशोधनाच्या प्रांतातही शिल्पा बरंच काम करते आहे. कथा, कविता, ललित साहित्याची आवड असल्याने तिने 'गझल' काव्यप्रकारात एम. फील केलं. ते करतानाच उर्दू-फारसीचा अभ्यासही केला. मग बीएडही पूर्ण केलं. पण तिला चारचौघींसारखी फक्त नोकरी करायची नव्हती. तिला आस लागली होती ती लोकसंकृतीच्या अभ्यासाची. हा ध्यास तिला एका जागी स्वस्थ बसून देत नव्हता. अखेर, महाराष्ट्रातील संपन्न अशा संस्कृतीचा इतिहास मुळातून जाणून घेण्यासाठी पाठीवर बिऱ्हाड घेऊन तिने ट्रेकिंगला सुरुवात केली. गडकिल्ल्यांना, आडवाटांवरच्या देवळांना, विविध सांस्कृतिक ठिकाणांना भेटी तिने भेटी दिल्या. त्यांचा अभ्यास केला. यामध्ये तिचे बाबा, भाऊ, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ दिवंगत निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, महेश तेंडुलकर, डॉ. सोमण यांचं तिला प्रोत्साहन मिळालं.
आता तिने इंडोलॉजीमध्ये मास्टर्स केलं आहे. डॉक्टरेट मिळविण्यासाठी तिचा प्रवास सुरू आहे. हा विषय अतिशय सखोल आणि प्रत्येकवेळी नव्याने उलगडत जाणारा आहे. त्यामुळे अधिक शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी आर्किओलॉजीच्या उत्खननात विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून शिल्पा सहभागी होते. या कामासाठी तिला डेक्कन कॉलेज, टीएमव्हीच्या सर्व गुरुजनांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं.
सुमारे २००६-२००७ पासून शिल्पा सिंधुदुर्ग व गोवा इथल्या देवदेवतांचा अभ्यास करत आहे. कोकणात फिरतेवेळी आलेल्या अनुभवांवर, तिथल्या लोकांचं जगणं तिने शब्दबद्ध केलं असून, ते लवकरच पुस्तकरुपात येणार आहे. आपली संस्कृती ही आपल्याकडे असलेली मोठी ठेव आहे. त्यामुळे तिचं डॉक्युमेंटेशन करणं, ही काळाची गरज असल्याचं, तिचं मत आहे. त्यादृष्टीनं ती कामाला सुरुवातही करणार आहे. संस्कृतीविकासासाठी ही अनवट वाट चोखाळणाऱ्या शिल्पाला तिच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट