समोरच्यावर छाप पाडणारं, आकर्षक व्यक्तिमत्त्व ही काळाची गरज आहे. तीच ओळखून ग्रीष्मा थांपी हिने अॅव्हान्स इमेज मॅनेजमेंट ही कन्सल्टन्सी सुरू केली आहे. त्याद्वारे ती विविध कंपन्यांमधील कर्मचारी, कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थानं 'देखणं' बनवते. अवघ्या तिसाव्या वर्षी ग्रीष्मानं घेतलेली ही भरारी घेतली निश्चित प्रेरणादायी आहे.
असं म्हणतात, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आजच्या काळात तर हे तंतोतंत लागू पडतं. तुम्ही कितीही हुशार असला तरी तुमचं व्यक्तिमत्त्वही तसंच हवं. त्याकडेही विशेष लक्ष द्यायला हवं. तुमची हुशारी तुमच्या वागण्या-बोलण्यातून दिसायला हवी. काहींच्या अंगी हे गुण उपजत असतात तर काहींना हे गुण आत्मसात करावे लागतात. शाळा- कॉलेजांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्यामध्ये अशाप्रकारचं शिक्षण अजूनतरी आपल्याकडं दिलं जात नाही.
ग्रॅज्युएशननंतर ग्रीष्मानं वेलिंगकर इन्स्टिट्यूमधून एमबीए (ह्युमन रिसोर्सेस) कोर्स केला. त्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूमधून तिला अमेरिकन कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमध्ये जॉब मिळाला. पण ग्रीष्माला काही तरी वेगळं करण्याची उर्मी होती. त्यामुळं २०११ मध्ये तिनं अॅव्हान्स इमेज मॅनेजमेंट या स्वतःच्या कंपनीला सुरुवात केली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या तिच्या धाडसी निर्णयाला घरातून तसंच मित्र-मैत्रिणींकडूनही विरोध झाला. पण, ग्रीष्माचा स्वत:वर ठाम विश्वास होता. शिवाय जे ठरवलं ते करायचंच अशी जिद्दही होती त्यामुळे ती मागे हटली नाही.
ग्रीष्माच्या कंपनीने एल अँड टी, जॉन्सन अँड जॉन्सन अशा अनेक बड्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं आहे. कॉर्पोरेट लेव्हलच्या सेशनमध्ये ड्रेस कोड, डिनर-लंच मीटिंगमध्ये कसं खावं, कसं वागावं..याची माहिती असते. तर विद्यार्थ्यांसाठीच्या सेशन्समध्ये आत्मविश्वासानं कसं वावरावं, इंटरव्ह्यूला जाताना ड्रेसकोड, मॅनर्स कसे पाळावे याचं परिपूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. फॅशन जगतामध्ये मानाचं स्थान असलेल्या 'फेमिना'मासिकातर्फे होणाऱ्या विविध सेशन्समध्येही ग्रीष्मा सहभागी होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट