मैत्रिणींनो, आपल्याला मुळातच चिक्कार कामं असतात. आपण ती व्यवस्थित करतही असतो. पण कधीतरी कुणीतरी आपल्याला एखाद्या लहानशा कामाबद्दल 'थँक यू' म्हटलं तर आपल्याला खूप आनंद होतो. आपण पुढचं काम दुप्पट जोमाने करतो. मग आपणही कधी कुणाला साध्याशा कामासाठी 'थँक यू' म्हटलं तर! जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याचे अगदी साध्या कामासाठीही आभार मानतो, तेव्हा त्या माणसाला मनातून एकप्रकारचा निराळा आनंद मिळतो. एका 'थँक यू'मुळे अमुक ते काम सक्तीचं असण्याऐवजी ते कुणालातरी आनंद देणारं आहे, ही भावना निर्माण होते.
प्रोत्साहनाचा परिणाम
प्रोत्साहनामुळे नकार मिळायची किंवा टीका केली जाण्याची भीती आपोआप कमी होते. आपण एखाद्याचे आभार मानले की दोघांनाही तितकाच आनंद मिळतो. शिवाय उघडपणे बोलून दाखवल्याने आपल्याबद्दल असणारी काळजी आणि आदर दिसून येतो. नात्यातले तणाव आणि भीती टाळायची असेल तर वेळोवेळी एकमेकांबद्दल कृतज्ञ राहण्याची गरज असते. अगदी साध्या साध्या गोष्टींबद्दलही जोडीदाराला प्रोत्साहित केलं की नातं आणखी घट्ट होत जातं, असं अभ्यासक म्हणतात.
महत्व आभाराचं!
आभार आणि प्रोत्साहन या गोष्टी फक्त नात्यातच सफल ठरतात असं नव्हे तर समाजात इतरत्र वावरतानाही त्या आपल्याला आनंद देतात. अगदी बागेत, रस्त्यावर, दवाखान्यात, पोलिस चौकीत, शाळेत सगळीकडेच एक 'थँक यू' म्हणाल्यावर तुमचं काम आणखी उत्तम होतं. प्रत्येकजणच रुटीनचं काम करत असतो. त्यात त्याला कंटाळाही येत असतो. आपल्या कामाचं कुणालातरी कौतुक आहे, ही भावनाच चांगली असते. शिवाय लोकांनी नुसतीच आपली कामं करण्यापेक्षा ती आनंदाने आणि आपल्याविषयीच्या चांगल्या भावनेने केली तर त्याचा जास्त फायदा होतो. कधीतरी भाजीवालीला चांगली भाजी दिल्याबद्दल 'थँक यू' म्हणालात, रिक्षावाल्याना 'थँक यू' म्हणालात तर त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि आपल्याला सकारात्मक उर्जा.
कामाची विभागणी
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रोज करायची आणि कधीतरी करायची अशी कामं असतात. शिवाय चूक आणि बरोबर अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात. कंटाळा घालवून रोजची कामं करणं आणि सकारात्मक विचारांचा वापर करून चुकीच्या गोष्टींवर मात करणं महत्वाचं आहे. चांगल्या आणि उत्तेजित कामांच्यावेळी उत्साह वाटत असल्याने अशा कामांची दखल घेतली जाणं महत्वाचं आहे.
स्वतःपासून सुरुवात
कोणी स्वतःहून येउन आपले आभार मानेल अशी अशा करण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करा. समाजात बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने सुरुवात करायला हवी.
संकलन - आकांक्षा मारुलकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट