नोकरी आणि घर अशी दुहेरी कसरत आजच्या सुपरवुमन करत असतात. त्यातही ९ ते ५ ते अशा चौकटी बाहेरची वेगळी करिअर्स करणाऱ्या स्त्रियांसाठी तर हे आणखी अवघड. डॉक्टर, पोलिस, उद्योजिका अशा, वेळेचं बंधन नसलेल्या क्षेत्रांत काम करताना मुलांसाठी टाइम मॅनेजमेंट कसं करतात ते त्यांच्याच शब्दांत..
तिच्यासाठी 'क्वालिटी टाइम' मी २००५ साली सब इन्स्पेक्टर म्हणून करिअरला सुरुवात केली. माझी मुलगी तनिष्का दोन-अडीच वर्षांची असतांना मी नवी मुंबईत आणि तनिष्का तिच्या आजीकडे पुण्यात रहायची. आठवड्याभरात एखादी सुट्टी मिळाली की तिला भेटायला पुण्याला जायचे. सध्या मी पुण्यात असल्याने कुंटुंबाबरोबर आणि तनिष्का बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करते. 'सीआयडी' विभागात काम करत असल्याने सकाळचा आणि रात्रीचा वेळ तिच्याबरोबर घालवते. काम सांभाळून तिला गोष्टी सांगणं, तिची चित्रकलेची आवड जपणं आणि सुट्टीच्या दिवशी अभ्यास घेते. खूप वेळ देता येत नसला तरी क्वालिटी टाइम नक्कीच स्पेंड करते. जयश्री कुलकर्णी, पोलिस इन्स्पेक्टर
प्लॅनिंग महत्त्वाचं माझ्या मते वर्किंग वुमनही अतिशय योग्यपणे आपल्या पाल्याला वेळ देऊ शकते. फक्त त्यासाठी दिवसाचे व्यवस्थित प्लॅनिंग करायला हवं. माझी मुलगी आयेशा आता अडीच वर्षाची आहे. संध्याकाळचा वेळ मी पूर्णपणे तिच्यासाठी राखून ठेवते. मिटींग्स, क्लायंट्सचे कॉल्स या गोष्टी मी यावेळात कटाक्षाने टाळते. वीकेंडला मी आयेशाबरोबर पार्कमध्ये जाणं ,स्विमिंग , नवीन ठिकाणी फिरायला घेऊन जाणं असं उपक्रम प्लॅन करुन तिच्यासोबत वेळ घालवते. आई झाल्यावर बायकांचे लक्ष पूर्णपणे त्यांच्या मुलांच्या आरोग्याकडे ,जेवणाकडे लागलेलं असतं हे स्वाभाविक आहे. पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. आई जर आनंदी असाल तर ती तिच्या पाल्याबरोबर आनंदात वेळ घालवू शकता,असे मला वाटते. प्रीता सुखटणकर, उद्योजिका
वेळेच्या नियोजनाने शक्य माझी मुलगी काव्या आता दीड वर्षाची आहे. त्यामुळे तिला जास्त वेळ देण्याचा माझा प्रयत्न असतो. मी स्वतः एक किबोर्ड वादक आणि ग्राफिक डिझायनर आहे. पण काव्याच्या जन्मानंतर मी गाण्याचे कार्यक्रम करणं कमी केलं. काव्याला वेळ देता यावा यासाठी माझा ग्राफिक डिझायनिंगचा संपूर्ण व्यवसाय मी घरातूनच सांभाळते. यासाठी वेळेचं नियोजन खूप मोलाचं ठरतं. तिच्या लहान वयात तिच्यासोबत घालवलेले हे क्षण माझ्यासाठी कोणत्याही कामापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा वेगवेगळ्या क्लायंट्ससोबतच्या मिटिंग्ज मी घरीच पार पाडते. या सगळ्यामध्ये घरच्यांची आणि माझ्या पतीची मोलाची साथ मला मिळते. किमया काणे, ग्राफिक डिझायनर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट