मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
मैत्री, हे आयुष्यातलं सर्वाधिक मोलाचं नातं. तुमच्यातल्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पैलूंसह तुम्हाला स्वीकारून पुढं नेणारं हे नातं. सध्या मात्र हे नातं ओळखण्यात अनेकांचा गोंधळ उडताना दिसतोय. नव्यानं मैत्री जोडताना केवळ ५० टक्के लोकांनाच मैत्रीचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. प्रत्येकालाच आयुष्याच्या सर्वच टप्प्यांवर साथ करणारी मैत्री मिळेतच असं नाही. काहींना कमी वयातच मैत्रीचा हात मिळतो, तर काहींना शाळा, कॉलेज संपल्यानंतर मैत्रीची खरी ओळख पटते. सध्या ऑनलाइन विश्वात रमणाऱ्यांना मैत्री जोडताना आपले मित्रमैत्रिणी कोण हे ओळखणं अवघड जात आहे. मैत्रीचा शोध घेणाऱ्यांपैकी केवळ ५० टक्के लोकांनाच समोरून प्रतिसाद मिळतो. तेल अवीव विद्यापीठ आणि मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनी जगभरात केलेल्या युवकांच्या सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे. विविध ठिकाणी काम करणारे कर्मचारी, एरवी मित्र-मैत्रिणींसाठी वेळ नसणारे, सतत नव्या लोकांशी मैत्री करायला आवडणारे, मोठा ग्रुप असणारे, सोशल नेटवर्किंगवर झालेल्या ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालेले अशा विविध गटातील व्यक्तींशी संवाद साधून हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यातूनच मैत्री निवडताना अनेकांची गफलत होत असल्याचं स्पष्ट झालं. हे टाळताना अवास्तव अपेक्षा निर्माण होऊन पश्चात्ताप होऊ नये, यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक आहे. या सर्वेक्षणातून डॉ. एरेझ आणि सर्वेक्षण करणाऱ्या तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही महत्त्वाच्या बाबी. - नव्यानं मैत्री करताना समोरच्या व्यक्तीची पूर्ण माहिती जाणून घ्या. - समोरच्या व्यक्तीला स्वतःची माहिती सांगताना ती व्यक्ती खरी असल्याचं पडताळून पाहा. - पहिल्याच संवादात स्वतःची वैयक्तिक माहिती देणं टाळा. - भेट घ्यायचं ठरल्यास ती सार्वजनिक ठिकाणी घ्या. - समोरच्या व्यक्तीविषयी भेटण्यापूर्वीच कोणताही निष्कर्ष काढू नका. - त्या व्यक्तीशी अधिकाधिक संवाद साधून मगच मैत्रीचं पाऊल उचला. - संवादात समोरची व्यक्ती कोणत्या विषयावर अधिक भर देतेय, याकडे लक्ष द्या. - नव्या ओळखीत लगेचच आर्थिक स्वरूपाची मदत घेणं/देणं टाळा किंवा कोणतंही आश्वासनही देऊ नका.