सकाळचं फिरणं चांगलं असतं, तसंच जेवण झाल्यानंतर शतपावली करावी, असं आपण कित्येक पिढ्यांपासून ऐकत आलो आहोत. मी आणि एकदोन मैत्रिणी बऱ्याच वर्षांपासून रात्री थोडा वेळ चालतो. हळूहळू आमच्या सोसायटीतील इतर मैत्रिणीदेखील आमच्याबरोबर चालायला येऊ लागल्या. आता आम्ही आठ-नऊ जणी आहोत. रात्री रस्ते रिकामेच असतात. आम्ही सोसायटीच्या समोरच्या रस्त्यावर येरझाऱ्या घालतो. रमतगमत, गप्पा मारत, हसत अर्धा तास कधी होऊन जातो, ते कळतही नाही. शतपावली होतेच; पण त्यावेळी होणाऱ्या गप्पांमुळे दिवसभराच्या कामाचा ताण कमी होतो. विचारांची देवाणघेवाण होते. घरेलू उपचार, औषधं यांपासून नवे सिनेमे, मालिका असे गप्पांचे भरपूर विषय असतात. वेगवेगळ्या पदार्थांची पाककृती, पर्यटनस्थळांच्या अनुभवांपासून मुलांचं वागणं, घरातल्यांच्या तऱ्हा या सर्व गोष्टींवर बिनधास्त गप्पा होतात. मजा येते. एखादी दोन-चार दिवस आली नाही, तर का येत नाही, हे विचारायला आम्ही तिच्या घरी जातो.
आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आहोत. आम्ही व्हॉट्सअॅपवर वॉकिंग ग्रुपही केला आहे. एकमेकींचे वाढदिवस आम्ही केक कापून साजरे करतो. कधीतरी छोटी सहल काढतो. महिला दिनाच्या दिवशी हॉटेलमध्ये जेवायला जातो.
नाहीतरी जेवण झाल्यावर टीव्हीपुढे किंवा मोबाइल घेऊन बसणं, हेच बऱ्याचदा होतं. त्यापेक्षा शतपावली केल्यानं तब्येतही चांगली राहते. आम्हा सगळ्यांची तब्येतीची गाऱ्हाणी कमी झाल्याचं आम्हालाच जाणवलं आहे. एक-दोन दिवस जरी चालायला जायला जमलं नाही, की चुटपुट लागते. चारू, सुजाता, ज्योत्स्ना, बीना, प्रतिभा, शोभा, नूतन, मयुरी आणि मी लीना अशा नाइस नाइन आहोत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट