पाचशे आणि एक हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्याचा परिणाम लग्नसमारंभातल्या संगीत कार्यक्रमांवर झाला आहे. रोकड उपलब्ध नसल्याने अनेक लग्नांतले हे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्याशिवाय, इतरही संगीत कार्यक्रम पुढे ढकलले गेल्याचं आयोजकांकडून सांगितलं जातंय…
‘मेहंदी लगाके रखना, डोली सजाके रखना’ डीडीएलजेमधलं हे गाजलेलं गाणं ऐकलं की डोळ्यांसमोर लग्नाचा माहोल उभा राहतो. लग्नसमारंभात गाण्यांचे कार्यक्रम जोरात होत असतात. पण नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर लग्नांमधल्या या संगीत कार्यक्रमांवरही गदा आली आहे. कॅश देणं शक्य नसल्याने हे कार्यक्रम रद्द होत असल्याचं सांगितलं जातंय.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. हल्ली अनेक मराठी लग्नांमध्येही संगीत कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. लग्नात संगीतासाठी येणाऱ्या कलाकारांना थेट कॅश दिली जाते. पण नोटाबंदीमुळे रोख रक्कम मिळणं कठीण झालं आहे. कलाकारांना कॅश पेमेंट करणं शक्य होणार नसल्याने संगीताचे कार्यक्रम होत नसल्याचं दिसून येत आहे. नोटाबंदीचा परिणाम मनोरंजनसृष्टीवर होत असताना लग्नांवर देखील याचा परिणाम दिसू लागला आहे.
नोटाबंदीमुळे लग्नातला उत्साह कमी होत असला, तरीही कलाकार, लोकांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. साधारणपणे या एक-दोन महिन्यात होणारे लग्न समारंभ संगीताशिवायच पार पडणार असल्याचं दिसतंय. रोकड अडचणीचा थेट परिणाम हा संगीताचे कार्यक्रम आणि पर्यायाने कलाकारांवर होतो आहे.
लग्नाच्या संगीताबरोबरच बाहेर होणारे संगीताचे कार्यक्रम देखील पुढे ढकलले गेले आहेत. नोटाबंदीमुळे कार्यक्रमांच्या तिकीटांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. कमी प्रमाणात होत असल्याने अनेक मोठमोठे कार्यक्रम पुढे ढकलले गेले आहेत. विशेष म्हणजे, कलाकार आयोजकांना स्वतःच कार्यक्रम पुढे ढकला, असं सांगत आहेत.
सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चांगला आहे. या निर्णयाचा परिणाम हा सांस्कृतिक कार्यक्रमांवर, लग्नांवर होताना दिसतोय. तरीही बहुतांश आयोजक आणि कलाकार हा परिणाम सहन करायला तयार आहेत. नोटाबंदीच्या या निर्णयाचं बऱ्याच कलाकारांनी आनंदानं स्वागत केलं आहे. म्हणून कलाकार स्वतःहून कार्यक्रम नंतर ठेवा असं सांगू लागलेत.
प्रसाद महाडकर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट