देशभरातून आलेले जवळपास पाचशेहून अधिक फोटोग्राफर्स आपले कॅमेरे घेऊन फोटो मॅरेथॉनसाठी सज्ज होते. विजेत्यासाठी पहिलं बक्षीस होतं जपानची टूर. फोटो मॅरेथॉन स्पर्धेसाठी दिलेल्या थीमवर ठराविक वेळेत मुंबईतले उत्कृष्ट फोटो काढत स्तुती वाघेला या मुंबईकर तरुणीने विजेतेपदाचा मान पटकावला.
वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहामध्ये स्पर्धेचे विषय घोषित करण्यात आले. 'फ्लेवर' आणि 'हार्मनी' अशी थीम या स्पर्धेसाठी देण्यात आली. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशी वेळ त्यासाठी देण्यात आली होती. या दोन थीमवर फोटो काढण्यासाठी प्रत्येकी तीन तास इतका वेळ होता. थीम कळताच सगळे फोटोग्राफर्स आपल्या मोहिमेवर निघाले. यात हौशी तसंच व्यावसायिक फोटोग्राफर्सचा समावेश होता. मुंबईकर स्तुतीनेही आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल म्हणून या फोटो मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला होता.
'खरं तर मी ही अनोखी स्पर्धा अनुभवायला आले होते. मला वाटलंच नव्हतं की मला एवढं मोठं गिफ्ट मिळेल. माझा नवरा एक उत्तम फोटोग्राफर असून मी त्याला अनेकदा असिस्ट करते. त्याच्याकडून मला फोटोग्राफीचे धडे मिळाले. ह्या स्पर्धेमुळे मी माझ्यातली कला लोकांपर्यंत पोहचवू शकले याचाच मोठा आनंद आहे. मी फाईन आर्टची पदवीधर आहे. मात्र लग्नानंतर मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करता येईल की नाही थोडी धाकधूक होती. पण या स्पर्धेच्या निमित्तानं मला छान संधी मिळाली. फोटोग्राफीच्या माझ्या छंदाला घरच्यांकडून तसंच सासरच्या मंडळींकडूनही भक्कम पाठिंबा मिळतोय,' असं तिने 'मुंटा'शी बोलताना सांगितलं.
रोहित शिंदे या मराठी तरुणाने काढलेल्या फोटोंनाही दोन बक्षीसं मिळाली. याबद्दल रोहित म्हणाला, की ‘मी मूळचा पुण्याचा असून मला फिरायला खूप आवडतं. त्यातून मला खूप शिकता येतं आणि छान आयडियासुद्धा मिळतात. या आयडियांचा उपयोग मला फोटोग्राफीमध्ये करता येतो. मी स्वतःहून फोटोग्राफी शिकलो आहे. सुरुवातीला मोबाइल फोन, मग नंतर हळूहळू मोठ्या कॅमेऱ्याकडे वळलो. हा सगळा अनुभव खूप छान होता. माझ्या २ फोटोग्राफ्सना बक्षीस मिळाल्याने खूप आनंद झालाय.’
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट