तिचं निरागस प्रेम
आजवर अनेक मुलींनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलंय. आमच्या व्हिडीओजवर कमेंट करून, सोशल मीडियावर मेसेज करून मी त्यांना किती आवडतो किंवा त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला मुली सांगत असतातच. पण एक खूप खास अनुभव मला शेअर करायला आवडेल. एकदा माझ्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांमधून एका साडे तीन वर्षाच्या लहान मुलीने २-३ वेळा माझं नाव घेतलं. चालू प्रयोगात ते नाव घेतल्याने आम्हा सगळ्यांना त्याचं हसू आलं. नंतर प्रयोग संपल्यावर ती लहान मुलगी धावत माझ्या जवळ आली आणि माझ्या पायांना तिने घट्ट मिठी मारली. मी तिला उचलून घेतलं आणि तेवढ्यात तिचे आई बाबा आले. 'हिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे', असं त्यांनी मला सांगितलं. प्रेम म्हणजे काय हे कळण्याआधीच त्या मुलीच्या माझ्याबद्दल असलेल्या भावना बघून मला खूप छान वाटलं.
- अमेय वाघ, अभिनेता (कास्टिंग काऊच)
प्रपोज केलं...निघून गेला
चाहते कमेंटमधून आणि एकंदरीतच डिजिटल माध्यमातून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. अगदी प्रपोजपासून ते मेसेजेस पाठवण्यापर्यंत अनेक कमेंटमध्ये मी पोस्ट केलेले व्हिडीओखाली असतात. मात्र नुकत्याच झालेल्या 'फॅन ग्रीट अँड मीट' कार्यक्रमात एक मजेदार किस्सा घडला. मी स्टेजवर असताना एक तरूण आला आणि तुला काहीतरी सांगायचं म्हणून त्याने त्याच्या हातातील रिंग पुढे केली. मी काही बोलण्याआधीच तोच म्हणाला, थांब... मला माहितीय तुझं उत्तर नाहीच असणार आहे. तरी मला तुला प्रपोज करायचं आहे माझ्या मानसिक समाधानासाठी, असं म्हणत त्याने ती अंगठी माझ्या हातात टेकवली आणि काहीही बोलण्याच्या आत तिथून उठून निघून गेला. हे खूपच मजेशीर होतं. याशिवाय अनेक ठिकाणी जाते तेव्हा चाहत्यांचं प्रेम पाहायला मिळतं ते त्यांच्या भावनांच्या माध्यमातून. आजच्या 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त एवढचं सांगेल प्रेम हे फक्त त्याचं आणि तिचं नसतं हे चाहत्यांचे आमच्यावर असणारे प्रेम बघून कळतं.
- प्राजक्ता कोळी, (Mostly Sane, युट्यूब चॅनेल)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट