Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

क्षण कर्तृत्वाचा…अभिमानाचा!

$
0
0

आम्ही कुठेही कमी नाही हे अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं आहे. आव्हानांना सामोरं जात जिद्दीच्या बळावर पुढे जात असताना ‘ती’च्या आयुष्यात असेही क्षण येतात, जेव्हा त्यांना आपल्या स्त्री असण्याचा अभिमान वाटतो. तुमच्या आयुष्यात असा क्षण कुठला होता हे मटानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना विचारलं…

निर्मितीचा आनंद
मुळात ज्या क्षेत्रात मी काम करते त्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जात नाही. इथे तुमच्या कौशल्यावर तुम्हाला काम मिळतं. एक अभिनेत्री म्हणून काम करतानाच मी निर्माती बनले आणि नाट्यसंस्था चालवू लागले. कुठलीही स्त्री एक संपूर्ण कुटुंब खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. तसंच नाट्यसंस्थाही मी सांभाळू लागलेय. जेव्हा आमच्या टीममधल्या लोकांना माझ्याबद्दल हा विश्वास वाटतो हा माझ्यासाठी अभिमानाचाच क्षण आहे असं मला वाटतं. तसंच माझ्या फॅन्समध्ये मुलींची संख्या जास्त आहे. माझ्या करिअरकडे पाहून, आम्हालाही आत्मविश्वास मिळाला असं त्या जेव्हा सांगतात तेव्हा त्यातून मला स्वतःला वेगळीच ऊर्जा मिळते.
मुक्ता बर्वे
उत्तम अभिनेत्री असलेली मुक्ता सध्या यशस्वी नाट्यनिर्माती म्हणूनही ओळखली जाते.

कौतुक झाले अन्…
अरुणाचल प्रदेशातल्या आपातानी, निशी या आदिवासी जमातींची जीवनपद्धती, त्यांचा धर्म, या विषयी जाणून घेणं हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. गेली पाच वर्ष मी हे करतेय. पहिल्यांदा जेव्हा तिथे गेले तेव्हा तिथल्या लोकांनी याबद्दल खूप नकारात्मक चित्र उभं केलं होतं. पण तरीही मी त्या लोकांमध्ये मिसळले, त्यांच्याबरोबर राहिले. इतक्या लांबून येऊन माझं तिथे राहणं, त्यांच्या प्रत्येक गोष्टींविषयी जाणून घेणं हे पाहून त्यांच्या डोळ्यांत, विशेषतः स्त्रियांच्या डोळ्यांत मला कायम कौतुकाचे भाव दिसायचे. स्त्री मी म्हणून मी हे करू शकले ही गोष्ट माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे असं मी म्हणेन.
हिमानी चौकर, प्रोफेसर,
फिलॉसॉफीच्या प्रोफेसर असलेल्या हिमानी अरुणाचल प्रदेशातल्या आदिवासी जमातींच्या जीवनपद्धतीचा अभ्यास करत आहेत.

जबाबदारी समसमान
महिला असण्याचा अभिमान वाटावा असा कुठलाही एक क्षण सांगणं कठीण आहे. कारण तसं बघायला गेलं तर घरी-ऑफिसमध्ये खूप वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी वावरत असते. मी कुणाची तरी बायको आहे, आई आहे. शिवाय, ऑफिसमध्येही माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो. या सगळ्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा माझा प्रयत्न असतो. हॉटेल उद्योग हा मुख्यतः पुरुषप्रधान मानला जातो. इथे स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही. त्यामुळे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना जेव्हा आपली जबाबदारी चोख निभावली जाते तो क्षण माझ्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा असतो.
अनुपा पुरंदरे दास, शेफ
स्वतः शेफ असलेल्या अनुपा या सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्यासोबत काम करत असून, त्या टीव्ही शोजही करतात.

स्वतःला सिद्ध केलं
कुठलीही स्त्री जेव्हा आई बनते हा क्षण तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतोच. पण याशिवाय, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे स्त्रीसाठी खूप मोलाचं आहे. मी सध्या फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहे. या सृजनशील क्षेत्रात स्त्रियांसाठी काही नवनिर्मिती केल्याचा आनंद मिळतो. मी जेव्हा करिअरसाठी घराबाहेर पडले तेव्हा मी १८ वर्षांची होते. त्याआधी आमच्यावर मुलगी म्हणून खूप बंधनं असायची. तरीही मी बाहेर पडले, स्वतःला सिद्ध केलं. पुरुषांच्या बरोबरीनेच हिंमत दाखवून मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एक स्त्री म्हणून हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण म्हणता येईल.
वैशाली शदांगुळे, फॅशन डिझायनर
वैशाली या नामवंत फॅशन डिझायनर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचं नाव पोहोचलं आहे.

स्त्रीत्वाचा जागर
स्त्री म्हणून जन्माला येणं माझ्या हाती नव्हतं. तो माझा निर्णय नव्हता. जे आपल्या हाती नाही, त्याचा अभिमान कसा वाटून घ्यायचा? स्त्री भ्रूण हत्या, शतकानुशतकं स्त्रियांवर होणारे अत्याचार, गळचेपी, गुलामगिरी याविरूद्ध लढा देऊन आपल्याला समानता आणायची आहे. त्याला पर्याय असूच शकत नाही. त्यासाठी स्त्रीत्वाचा "जागर" करायलाच हवा. यिंग-यांग, शिव-शक्ती यांचा समतोल राहायलाच हवा. हे होत नसेल तर जोर लावून, प्रसंगी लढा देऊन तो समतोल साधायला हवा. पण म्हणून मला स्त्री असण्याचा अभिमान वाटावा का?...माहित नाही. हां, पण जेव्हा मी स्वतःला आरशात पाहते, तेव्हा मला, माझी आई स्त्री असण्याचा अभिमान वाटतो.
मनीषा कोरडे, लेखिका
शब्दांकन – हर्षल मळेकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>