मराठी कवितावाचनाच्या कार्यक्रमांविषयी तुम्हाला माहीत असेल. पण, येत्या २३ सप्टेंबरला मुंबईमध्ये चार भाषांतल्या कविता एकाच व्यासपीठावरुन सादर होणार आहेत. रसिकांमध्ये उत्सुकता असलेल्या या कार्यक्रमाचं नाव आहे ‘क्रॉसओव्हर पोएम्स’…
साहित्यप्रेमी मंडळींना कवितावाचनाचे कार्यक्रम नवीन नाहीत. पण एकाच वेळी चार भाषांतल्या कवितांचा आस्वाद घेण्याची संधी देणारा एक कार्यक्रम ‘क्रॉसओव्हर पोएम्स’ येत्या २३ सप्टेंबरला मॅक्सम्युलर भवन (जहांगिर आर्ट गॅलरीशेजारी) इथे सादर होणार आहे. या कार्यक्रमाचा हा तिसरा प्रयोग असून, यापूर्वी दोन प्रयोगांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येतं.
या कार्य्रमात हिंदी, इंग्रजी, जर्मन, मराठी या भाषांतल्या कविता सादर होणार आहेत.
मॅक्स म्युलर भवन, मुंबई आणि द पोएट्री क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम होतोय. मॅक्स म्युलर भवनच्या पहिल्या मजल्यावरच्या लायब्ररीत संध्याकाळी ६ वाजल्यापासून होणाऱ्या या कार्यक्रमात इंग्रजीतली आघाडीची कवयित्री रोशेल पोटकर, हिंदी कवी सौरभ जैन आणि मोहिंदर प्रताप सिंग आणि मराठीतले प्रख्यात कवी भारत दौंडकर आणि तुकाराम धांडे हे सहभागी होणार आहेत. सामाजिक विषयांवरील कविताच नव्हे तर रोमँटिक, नॉस्टॅल्जीक असे कवितांचे विविध अंग काव्यरसिकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना कवी संकेत म्हात्रे यांची आहे.
मराठी कवितेवर जागतिक कवितेचा प्रभाव आहेच. तसंच भारतातल्या इतर भाषांतल्या काव्याचाही ठळक प्रभावही जाणवतो. आपण कवी, रसिक आणि माणूस म्हणून तेव्हाच समृद्ध होऊ जेव्हा आपण इतर भाषांतल्या कवींच्या कविताही रसिक म्हणून ऐकू. प्रत्येक भाषेची एक वेगळी नजाकत असते म्हणून आपल्या सीमा ओलांडून पुढे जाण्याची गरज आहे. हेच क्रॉसओव्हरसारख्या कार्यक्रमाचं उद्धिष्ट आहे.
-संकेत म्हात्रे
‘प्रत्येक भाषेचा एक वेगळा स्वर असतो. विविध भाषेतले हे स्वर म्हणजेच एक काव्यानुभव असतो’, असं कती मोहिंदर प्रताप सिंह म्हणतात. मोहिंदर हे कवितेसोबत हिंदी चित्रपटांसाठी लेखन आणि दिग्दर्शनही करतात. गेल्या वर्षी आलेल्या ‘एम एस धोनी’ या चित्रपटाचे ते सहलेखक होते. फक्त इंग्लिश, मराठी आणि हिंदी या भारतीय भाषाच नव्हे, तर जर्मन भाषेतल्या कवितांचा समावेश यात करण्यात आलाय. उलरिके ऑलमु सँडिग या प्रख्यात जर्मन कवयित्री त्यांच्या कविता सादर करतील. त्यांचं मराठीत भाषांतर जयश्री हरी जोशी करणार आहेत. ‘क्रॉसओव्हर पोएम्स’चा पहिला प्रयोग ठाण्यात झाला होता. त्यानंतर मॅक्सम्युलरमध्ये होणारा हा दुसरा प्रयोग आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट