Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

देशासाठी असंही सीमोल्लंघन

$
0
0

आपल्या देशात शिकून परेदशात नोकरीसाठी सीमोल्लंघन करणारे अनेक सापडतील. पण अनेक तरुण असेही आहेत ज्यांनी परदेशातली आपली तगड्या पगाराची नोकरी आणि आरामदायी आयुष्य सोडून पुन्हा आपल्या मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या कौशल्याचा मायभूमीच्या विकासाला हातभार लागावा यासाठी पुन्हा आपल्या मातीशी नाळ जोडणाऱ्या अशाच काही तरुणांचं हे अनोखं सीमोल्लंघनही कौतुकास्पद असंच…

इरादा पक्का
सुरुवातीची दोन वर्षं मास्टर्ससाठी आणि त्यानंतर दोन वर्षं नोकरीनिमित्त प्रियंवदा पंडित अमेरिकेत होती. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयात मास्टर्स केल्यानंतर तिथल्या एका नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याची तिला संधी मिळाली. परंतु अमेरिकेत स्थायिक न होता भारतात परतण्याचा तिचा निर्धार पक्का होता. दरम्यान कंपनीकडून ग्रीन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण काहीही झालं तरी भारतात परतायचं या विचारावर ती ठाम होती. म्हणून तिनं ग्रीन कार्डसाठी साफ नकार दिला. बहुराष्ट्रीय कंपनीत खूप काही शिकता आलं. त्याचा वापर देशासाठी होतोय याचं समाधान असल्याचं, ती आवर्जून सांगते. या सगळ्यात पालकांनी तिला भक्कम साथ दिली.

आरोग्यसेवेत संशोधनाचं व्रत
फिलाडेल्फियामधल्या एका नामांकित विद्यापीठातून मास्टर्स आणि पीएचडी केल्यानंतर तिथल्याच एका कंपनीमध्ये आदित्य इंगळहळ्ळीकर नोकरी करत होता. २००३ ते २०१६ अशी तेरा वर्षं परदेशात राहूनही आपण भारतात जाऊन काहीतरी करायचं या विचारावर आदित्य ठाम होता. बायोमेडिकलमध्ये इंजिनीअरिंग केलेल्या आदित्यला मेडिकल डिव्हाइस कंपनीत रिसर्च ते मार्केटिंगपर्यंतचा अनुभव होता. भारतात या क्षेत्रात नवनवीन शोध लागावेत, त्यात प्रगती व्हावी या उदेशाने त्यांनी भारतात ‘इंडिअस (INDIUS) मेडिकल टेक्नॉलॉजी’ नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली. आदित्य यांची पत्नी मधुरा इंगळहळ्ळीकर यांनीही परदेशात शिक्षण घेऊन सध्या त्या भारतात सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. शिवाय, ब्रेन डिसऑर्डर्स युजिंग एमआरआइ इमॅजिंगमध्ये त्यांचा रिसर्च सुरू आहे.

खवय्यांसाठी बरंच काही
हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या अभिजित देवघरकरला काही वर्षांपूर्वी परदेशी जाण्याची संधी मिळाली. जगातील आलिशान क्रूझपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्टार क्रूझवर त्याला शेफची नोकरी मिळाली. इटली, टर्की, इजिप्त, कतार, बँकॉक असा प्रवास त्याने केला. डॉलर्समध्ये कमाई करत करिअर जोरात घडत असताना अभिजितनं मात्र भारतात कायमस्वरूपी परतण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचं त्याच्या कुटुंबियांना, मित्रपरिवाराला आश्चर्य वाटलं. 'एकत्र कुटुंबात वाढलेलो असल्याने आपल्या माणसांची ओढ मला होती. पैशांबरोबरच माणसं कमावणंही तितकंच महत्त्वाचं मला वाटतं', असं अभिजित ठामपणे सांगतो. केक, चॉकलेट्स आणि इतर बेकरी प्रोडक्टसच्या दुनियेत अभिजितने चांगलंच नाव कमावलं आहे. आज अगदी बेल्जिअममधील एका मासिकालाही अभिजितची दखल घ्यावीशी वाटते. भारतातल्या खाद्यसंस्कृतीचा विकास करण्याचा त्याचा विचार आहे.

अर्थव्यवस्थेला हातभार
अमेरिकेतून मास्टर्स इन सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवल्यानंतर पुढची काही वर्ष प्रसाद कामतनं तिथंच नोकरी केली. भारतात परतायचं या मतावर मात्र ते ठाम होते. २००२ ते २००४ पर्यंत शिक्षण आणि त्यानंतर २०१०पर्यंत ते तिथंच राहिले. अखेर साडेआठ वर्षानंतर भारतात परतले. देशासाठी काहीतरी करावं या उद्देशातून त्यांनी भारतात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
संकलन- अजय उभारे, साईली भाटकर (एमडी कॉलेज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>