Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मिळाला चांगलाच धडा!

$
0
0

आवडत्या सेलिब्रेटींच्या बर्थडे सेलिब्रेशनची उत्सुकता तुम्हालाही असेलच. आठवणीत राहिलेल्या वाढदिवसांचे गंमतीदार किस्से ते मटाच्या वाचकांशी शेअर करणार आहेत 'बर्थडे स्पेशल' या सदरातून. आज संदीप कुलकर्णी याचा वाढदिवस असून, त्याचा हा किस्सा...

वाढदिवस हा सर्वांच्याच आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो. आजवर माझ्या आयुष्यात आठवणीत राहिलेले दोन वाढदिवस आहेत. पहिला म्हणजे जेव्हा मी पाचवीत होतो. त्यावर्षीचा वाढदिवस मला अजूनही आठवतो. मी वाढदिवसाची भेट म्हणून आई-बाबांकडे खेळण्यातली मोठी जीप मागितली होती. जी मी घरातच चालवणार होतो. त्यावेळी कोणाच्या घरी किंवा कोणाकडे ते खेळणं असणं ही खूपच मोठी गोष्ट होती. मला तीच गाडी हवी असा हट्ट मी आईकडे केला. तेव्हा मला आई म्हणाली की, 'बरं! संध्याकाळी तुला गाडी मिळेल'. त्याकाळी शाळा दिवसभर असल्याने शाळेमध्ये मी सर्वांना सांगितलं की, 'संध्याकाळी माझी गाडी येणार आहे'. घरी माझा लहान भाऊसुद्धा खुश होता. गाडी येणार या उत्साहामध्ये गाडीवर लावायला आम्ही क्राफ्ट पेपरची फुलं तयार केली. त्यामुळे आमचा संध्याकाळपर्यंतचा वेळ त्यातच गेला.

संध्याकाळी आधी आई आली आणि मग बाबाही आले. पण गाडी काही आली नाही. तेव्हा बाबांनी एका छोट्या बॉक्समधून हळूच एक छोटी जीप काढली. त्यावेळी काय बोलावं हे मला काहीच सुचेना. माझा हिरमोड झाला होता. मी केक कापायलाही तयार नव्हतो. आईने मला समजावण्याचा प्रयत्न केला की, 'अरे, एवढी मोठी गोष्ट खरेदी करण्यापूर्वी आपल्याला आधी नियोजन करावं लागतं. आपण रितसर नियोजन करू आणि पुढच्या वाढदिवसाला नक्की घेऊ'. आजीनेही मला समजावण्याचा प्रयत्न केला की, 'आयुष्यात सगळ्याच गोष्टी लगेच मिळत नसतात'. त्या वाढदिवशी मला ही महत्त्वाची शिकवण मिळाली होती. त्यामुळे मला हा वाढदिवस चांगलाच आठवणीत राहिला. ही शिकवण मी माझ्या मुलालाही दिली आहे.

दुसरा किस्सा म्हणजे मी २००३ साली एकावेळी दोन चित्रपटांचं शूटिंग करत होतो. त्यावेळी मी कामाच्या गडबडीत स्वतःचा वाढदिवसही विसरून गेलो होतो. माझ्या बायकोचा वाढदिवस १४ आणि माझा १६ नोव्हेंबरला असतो. शुटिंगच्या गडबडीत दोघांचाही वाढदिवस विसरलो. शूटिंग करताना संध्याकाळी सेटवर अचानक केक आला तेव्हा माझ्या लक्षात आलं. तेव्हा व्हॅनिटीही फार छोट्या होत्या आणि संध्याकाळी सेटवरची व्हॅनिटीही निघून गेली होती. मग आम्ही फोर्टला एका ठिकाणी तो केक कापला. वाढदिवसाच्या या आठवणी माझ्यासाठी नेहमीच लक्षात राहणाऱ्या आहेत.

शब्दांकन- विनय राऊळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>