ज्या मुलींची आई कडक शिस्तीची असते, त्या आयुष्यात जास्त यशस्वी होत असल्याचं एका सर्वेक्षणानं सांगितलं आहे.
तू सातच्या आत घरात आलीच पाहिजे, रात्रीचं बाहेर भटकायचं नाही, हे कपडे तू घालू नकोस, तुझा दिनक्रम असाच असावा... इतका अभ्यास व्हायलाच हवा... अशा नियमांनी आई मुलीला शिस्तीत ठेवत असेल, तर अनेकदा वादालाच तोंड फुटतं. मग दोघींमध्ये मैत्रीचं नातं निर्माण व्हायला अनेक अडचणी येतात; पण ज्या मुलींची आई कडक शिस्तीची असते, त्या मुली आयुष्यात जास्त यशस्वी होत असल्याचं एका सर्वेक्षणामधून समोर आलं आहे. अशा आयांना आपल्या मुलीमध्ये योग्य तो आत्मविश्वास आणण्यासाठी पालकत्त्वाचं उत्तम तंत्र अवगत असतं, असंही हा सर्व्हे सांगतो.
बंधनं, नियम कुणालाच नको असतात. मुक्त जगणं सगळ्यांनाच हवंहवंसं वाटतं. आजच्या जमान्यात तर बरोबरीनं जगण्याच्या स्पर्धेमध्ये मुलींनाही मुलांसारखंच स्वातंत्र्य हवंय. मग ते करिअरनिवडीबाबत असो, पेहरावाबाबत असो किंवा भटकंतीचं. त्यात स्वतःला ‘ममाज् गर्ल’ कोण म्हणवून घेणार? मात्र, जी ‘ममाज् गर्ल’ असते, तीच आयुष्यात चमकदार कामगिरी करते, असं हा सर्व्हे सांगत असताना नक्कीच अनेकींच्या भुवया उंचावतील.
हे सर्वेक्षण १३ आणि १४ वर्षं वयोगटातील मुलींसाठी करण्यात आलं होतं. यासाठी १५ हजार ५०० मुलींचे नमुने घेण्यात आले. त्या आया जास्त शिस्तीच्या होत्या, त्यांना एकतर सर्वोत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला किंवा उत्तम पॅकेजची नोकरी मिळाली. आई शिस्तबद्ध वागत होती, तेव्हा तिचा राग येत असला, तरी आजच्या यशाचं श्रेय तिलाच जातं असं या सर्वेक्षणातील अनेक मुलींचं म्हणणं आहे.
एखादी गोष्ट आपल्या गळी उतरवताना आई कमालीची आग्रही असते, तेव्हा तिच्या त्या आग्रहाचं महत्त्व कळत नाही. ती आपल्याला विरोध करते आहे, मनासारखं वागू देत नाही असा समज करून आपण त्रागा करून घेतो. ‘मुलगी’ म्हणून तिनं जास्त पावसाळे पाहिले असल्यानं आपल्या मुलीसाठी काय योग्य आणि काय अयोग्य, याची तिला उत्तम जाण असते. त्या क्षणी नाही; पण भविष्यात तिची बाजू पटायला लागते.
आज काही सेलिब्रेटींची उदाहरणं पाहिली असता आईनं आग्रही भूमिका घेतल्यानं किंवा कडक शिस्त लावल्यानं यशस्वी झाल्या आहेत. यात खेळाडू आहेत, सिनेअभिनेत्री आहेत, इतर कलाकार आहेत आणि आर्थिक बाजू सांभाळणाऱ्याही अनेकजणी आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट