Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

वाढणे एक कला

$
0
0

पुणे टाइम्स टीम

'अगं राणी, वाढणाऱ्याच्या उजव्या हाताला मीठ, चटणी, कोशिंबीर वाढायचं असतं. लग्नाला तीन वर्षं झाली तरी पान काही वाढता येत नाही अजून,'

हा संवाद आपल्याही सवयीचा. सुगरण असणाऱ्या अनेकींची ताट वाढताना गडबड होते. मग भाजीचा रस्सा चटणीत आणि वरणामध्ये भिजलेले पापड, या गोष्टी अगदी ठरलेल्या. याच गोष्टी टाळण्यासाठी या खास टिप्स...

१. जेवण वाढताना नक्की काय करायचं आणि काय टाळायचं?

जेवायला बसल्यावर सगळ्यांत आधी लक्ष वाढलेल्या ताटाकडे जातं. स्वयंपाक ही एक कला आहे, असं म्हणतात; पण पोट आणि मन दोन्ही भरण्यासाठी ते पुरेसं नक्कीच नाही. ताट वाढण्याची पद्धत आणि सुटसुटीत टेबल यामुळे तुमचं जेवण अधिक रुचकर होऊ शकतं. पाहुण्यांच्या ते कायम लक्षात राहू शकते. पदार्थ कितीही उत्तम चवीचे असले, तरी ताटात गर्दी झालेली असली आणि पदार्थ एकमेकांत मिसळले असतील, तर रंगाचा बेरंग होऊ शकतो. घरी जेवत असा किंवा हॉटेलमध्ये, वाढण्याची पद्धत ही नेहमीच महत्त्वाची गोष्ट ठरते. त्यामुळे पाहुण्यांना आणि खरंतर तुमच्या कुटुंबीयांनासुद्धा वाढताना काही गोष्टी कायमच लक्षात ठेवायला हव्यात.

२. हे विसरून चालणार नाही.

पाणी हा अगदी न टाळण्यासारखा भाग आहे; त्यामुळे सगळ्यांत आधी ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना जेवण्याआधी एक घोटभर पाणी पिण्याची सवय असते. पाण्यालाही चव आणण्यासाठी त्यात जरासं लिंबू आणि पुदिना टाकता येईल. त्यामुळे पाण्याला वेगळी चव मिळेल आणि जेवण पचण्यासाठीही मदत होईल.

३. अतिथी देवो भव!

अतिथीचं स्वागत करणं, त्यांना सन्मान देणं हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य समजलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात, तरी आलेल्या पाहुण्यांना उत्तम जेवण वाढून संतुष्ट करणं, ही महत्त्वाची गोष्ट ठरते. आलेल्या पाहुण्यांना आरामशीर आणि पोटभर जेवता आलं, की ते एकंदरच खूष होतात. जेवणाच्या चवीबरोबरच तुम्ही केलेलं आतिथ्यही ते विसरणार नाहीत.

४. लक्ष वेधणारी कटलरी

जे पदार्थ करत आहात, त्याला योग्य आणि आवश्यक अशी कटलरीची मांडणी हवी. कटलरीला जुनी परंपरा लाभली आहे. ती एक संस्कृतीच बनून गेली आहे, असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. त्यामुळे याही गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं.

५. पदार्थांची योग्य मांडणी

तुम्ही तयार केलेले रुचकर पदार्थ योग्य रीतीनं वाढलेत, तर त्याची चव आणखी वाढते. प्रत्येक पदार्थाची वेगळी मांडणी, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. सूप बाउल्सपासून गोडाच्या वाट्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट वेगळ्या समोर आल्यास पाहुण्यांसाठी तो नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

६. पसारा नको

जास्तीची ताटं किंवा वाट्यांचा पसारा झाल्यास एखाद्याचा जेवणाचा मूड जाऊ शकतो. त्यामुळे जितके लोक जेवणार आहेत, त्यांना आवश्यक तितक्याच गोष्टी मांडून ठेवा.

७. पदार्थांनुसार क्रोकरीची निवड

चुकीचे पदार्थ चुकीच्या ताटांमध्ये किंवा वाट्यांमध्ये वाढले, तर कसं वाटेल? नूडल्स खाताना साधा चमचा आणि आइस्क्रीम खाताना काटा-चमचा, असं असल्यास कोणालाच आवडणार नाही. त्यामुळे जे पदार्थ करणार आहात, त्यानुसार क्रोकरीची मांडणी हवी. केलेले पदार्थ खाण्यासाठी योग्य अशा गोष्टी असल्या, तर जेवणाचा आनंद वाढतो.

८. बच्चेकंपनी खूष होईल

तुम्ही वाढदिवस किंवा लहान मुलांच्या कार्यक्रमांसाठी पार्टीचं आयोजन करत असाल, तर नक्कीच त्यांना खूष करणं महत्त्वाचं आहे. लहान मुलांना आवडणारे गडद आणि गोंडस, आकर्षक असे रंग क्रोकरीसाठी निवडा. याचसोबत लहान मुलांना आवडणाऱ्या रंगांचा, कार्टून्सचा उपयोग या मांडणीमध्ये करता येईल. एकदा मन खूष झालं, की पोट भरायला वेळ लागत नाही.

९. पदार्थांची सजावट विसरू नका

प्रत्येक पदार्थ हा कसा लागतो, याचसोबत तो कसा दिसतो, हेदेखील महत्त्वाचं आहे. प्रत्येक पदार्थाची सजावट विशिष्ट पद्धतीनं करता येते. डोळ्यांना सुंदर दिसणारे पदार्थ चवीबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात. त्यामुळे कोणतेही पदार्थ बनवताना त्यांना चविष्ट आणि देखणं बनवायचं आहे, हे लक्षात घ्या.

१०. टिशू आणि नॅपकिन तितकेच गरजेचे

पदार्थांची चव, सजावट याचसोबत जेवणाचा एकंदर अनुभव हा महत्त्वाचा ठरतो. केवळ रुचकर पदार्थ पानात वाढून चालत नाही, तर टेबलाची साधीच; पण साजेशी सजावट देखील गरजेची असते. याबरोबर योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात टिशू पेपर्स आणि नॅपकिन्स ठेवल्यास गडबडीच्या वेळाही टाळता येऊ शकतात.

संकलन : अनुजा मुळे, कॉलेज क्लब रिपोर्टर, आय.एल.एस.लॉ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>