ही गोष्ट १९७०ची आहे. त्यावेळी मी सहकारनगरमधील एका बंगल्यातील एक खोली आणि व्हरांडा असलेल्या जागेत राहत होतो. पुष्कळ मित्रमंडळी आमच्या घरी येत असत. त्यांची आम्हाला कधीच अडचण झाली नाही. त्या वर्षी दिवाळीसाठी पत्नीनं फराळ केला होता. मला आवडतात म्हणून स्टीलचा मोठा डबा भरून अनारसे केले होते. रात्री दहा वाजता जवळच राहणारे माझे मित्र बारटक्के आणि त्यांच्या पत्नी आले. आमचं स्वयंपाकघर, झोपण्याची खोली, बैठकीची खोली सगळं एकच होतं. आम्ही गप्पा मारत बसलो. माझ्या हाताजवळच अनारशाचा डबा होता. मी त्यातील एक अनारसा काढून बारटक्केंच्या पुढे धरला. त्यांना अनारसा आवडत नव्हता. मग वहिनींना विचारलं, तर त्या जेऊन आल्या असल्यामुळे नको म्हणाल्या. शेवटी मीच तो अनारसा खाऊन टाकला. तो संपल्यावर दुसरा अनारसा काढला. एकीकडे आमच्या गप्पा रंगत होत्या आणि दुसरीकडे तो डबा रिकामा होत होता. रात्री १ वाजता ते दोघं आपल्या घरी जाण्यासाठी उठले. त्यापूर्वी सगळा डबा रिकामा झाला होता. त्यावर्षीची दिवाळी अनारशाशिवायच गेली. शरद बापट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट