जगात काही पदार्थ असे आहेत, की ते काहीतरी घटना घडल्यामुळे तयार होतात किंवा मुद्दाम तयार केले जातात. अशी बरीच उदाहरणे देता येतील. अशा प्रकारात मोडणारा, सर्वांचा आवडता आणि सोपा प्रकार आहे सँडविच. आपण आज त्याबद्दलच बोलणार आहोत. विष्णू मनोहर सँडविच म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर दोन पावांमध्ये भरलेले काही जिन्नस येतात. कालांतराने आपण सँडविच या शब्दाला आपापल्या परीने अर्थ देऊ लागलो. अगदी वाहतुकीमध्ये अडकलेल्या गाडीलाही तिचे सँडविच झाले, असे म्हणू लागलो. दोन व्यक्तींमधील वाद सोडविण्यासाठी गेलेलाही म्हणून जातो, 'तुमच्या भांडणात माझे सँडविच झाले आहे.' हे सारे असले, तरी सँडविच हे इंग्लंडमधील एका शहराचे नाव आहे. या शहराशी संबंधित दोन गोष्टींमुळेच सँडविच तयार झाले, असे सांगतात. पहिली घटना अशी, सँडविच या शहरात पत्ते खेळणारा एक मनुष्य होता. पत्ते खेळता खेळता त्याला खायला आवडायचे; पण पत्त्याचा शौक एवढा होता, की त्याला बसून जेवायला वेळ पुरत नसे. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. या माणसाला एका हाताने खाता येईल आणि हात खराब होणार नाहीत, अशा पदार्थाची गरज होती. त्याने ब्रेडवर चिरलेल्या भाज्या ठेवल्या, त्याला चव यावी म्हणून वरून टोमॅटो सॉस घातला. हे सर्व जिन्नस खाली पडू नयेत म्हणून त्यावर ब्रेडचा दुसरा तुकडा ठेवला. यानंतर त्याचे पत्ते खेळणे आणि जेवणे एकत्रच होऊ लागले. या पदार्थाला काय नाव द्यावे, असा प्रश्न पडला, तेव्हा त्याने सरळ आपल्या शहराचे नाव देऊन टाकले. अशीच दुसरी एक दंतकथा वाचनात आली होती. सँडविच या शहरातील एक मनुष्य जवळच्या शहरात गेला होता. दिवसभर काम करून थकला. त्याला भूक लागली होती. धावत बाजारात गेला; पण सगळी रेस्टॉरंट बंद झाली होती. एक रेस्टॉरंट बंद होताना त्याला दिसले. त्याने त्या मालकाला विनंती केली, की काहीतरी खायला द्यावे. काहीच शिल्लक नसल्याचे मालकाने सांगितले. शेवटी, 'पावाचा तुकडा तरी असेल तर द्या,' असे तो माणूस कळवळून म्हटला. फक्त पावाचा तुकडा कसा देणार, असे वाटून रेस्टॉरंट मालकाने मांसाचे भाजलेले दोन-तीन तुकडे टाकून पाव दिला. त्या व्यक्तीने तो पाव तसा खाल्ला. त्याला त्याची चव आवडली. दुसऱ्या दिवशी त्याचे त्याच शहरात काम होते. काम झाल्यानंतर तो त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. 'कालच्यासारखाच पदार्थ बनवून द्या,' असे त्याने मालकाला सांगितले. मालकालाही कौतुक वाटले. त्याने आनंदाने पावामध्ये मांसाचा तुकडा भरला, त्याला चव यावी म्हणून कच्चे टोमॅटो, कांदा, काही चटण्या आणि सॅडल भरून त्याला दिले. त्यामुळे आदल्या दिवशीपेक्षा तो पदार्थ अधिक चविष्ट लागला. बिल देताना मालकाने त्याला तो कोठून आला, असे विचारले. त्याने सँडविच या शहराचे नाव सांगितले. पुन्हा दोन-तीन दिवसांनी तो मनुष्य त्या शहरात आला असता त्याच रेस्टॉरंटमध्ये गेला. त्याने तोच पदार्थ मागितला. मालकाने हसत हसत तो बनवून दिला आणि देताना सांगितले, 'तुम्ही गेल्यानंतर हा पदार्थ आम्ही बऱ्याच लोकांना दिला. त्यांना तो आवडला. आम्ही कौतुकाने तुमच्या शहराचे नाव त्याला दिले.' अशा प्रकारे सँडविचचा जन्म झाला. कालांतराने लोकांनी सँडविचवर वेगवेगळे प्रयोग केले. त्यात लोणी आणि चीज आले. वेगवेगळ्या भाज्या, मांस अशा प्रकारचे जिन्नस टाकून त्याची चव वाढविण्यात आली. काही लोकांनी हे सर्व जिन्नस ब्रेडमध्ये घालून भाजले आणि 'ग्रील सँडविच' नावाचा वेगळा आविष्कार पुढे आला. नंतर त्याला समांतर अशा बऱ्याच पदार्थांची निर्मिती होऊ लागली. १७६०च्या दरम्यान बर्गरची निर्मिती झाली, असे म्हणतात. पुढे १९५५ सालानंतर मॅकडोनाल्डच्या प्रयत्नांनी ते लोकप्रिय झाले. साधारण १० वर्षांनंतर म्हणजे १९६५मध्ये 'सब वे सँडविच' नावाचा प्रकार सुरू झाला. त्यामध्ये लांबट अशा पावामध्ये वेगवेगळ्या प्रकारे, आपल्या आवडीचे सॉसेज, भाज्या, मांस घालून सँडविच आले. आता तर जगभरात नाश्ता किंवा जेवणाला सँडविच मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. काठीरोल हा यातीलच एक प्रकार म्हणता येईल. मी म्हणेन, की लोणचे आणि पोळीचा रोल हादेखील सँडविचचा एक प्रकार आहे. याबरोबर सँडविच ढोकळा, सँडविच मिठाई अशा पदार्थांची नावेही घेता येतील. इंडियन कॉटेज सँडविचचा शोध मी लावला. भाकरी मधून कापून आतमध्ये हिरवी चटणी आणि लोणी लावायचे. मधे कांद्याच्या चकत्या आणि झुणका भरून खायला द्यायचे, म्हणजे हे सँडविच. तर अशी ही सँडविचची गोष्ट. पुढे कशी वाढत याईल, हे मी आत्ता सांगू शकत नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट