चित्रपट बदलतो आहे, चित्रपटातील स्त्री भूमिका बदलते आहे. कालपर्यंत साहाय्यक म्हणून दिसणारी स्त्री व्यक्तिरेखा आता मध्यवर्ती होते आहे. तिने आपला परीघ विस्तारला आहे आणि त्याला प्रेक्षकांचाही प्रतिसाद लाभतो आहे. कालपर्यंत चित्रपट वास्तवदर्शी होता, या भूमिकांना असाच प्रतिसाद लाभत राहिल्यास भविष्य सिनेमॅटीक होईल. अंबर हडप वर्ष होते १९५३. अवघ्या महाराष्ट्रात जेवढा सरासरी पाऊस झाला असेल, त्यापेक्षा जास्त पाणी त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा डोळ्यातून वाहिले असेल; कारण त्या वर्षी शामची आर्इ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मग त्यानंतर हा ओघ काही थांबला नाही. दरवर्षी ढगांमधे एकवेळ पाणी जमा झाले नसेल; पण मराठी प्रेक्षकांच्या डोळ्यांतून धो धो पाऊस पडला. स्त्रियांवर झालेल्या अन्यायावर आधारित चित्रपट एकापाठोपाठ एक येतच राहिले. अर्थात, यालाही काही अपवाद होते, नाही असे नाही; पण बहुतांशी चित्रपटांनी नायिकेला सोशिक दाखवायची जबाबदारी उचलली आणि ती तशी पारही पाडली. मुळात चित्रपटही पुरुषप्रधान होते. जी अवस्था मराठीची, तीच अवस्था हिंदीची होती. 'कलमुही, …कामचोर कहींकी' असे म्हणून ललीता पवार आणि तत्सम सासवांनी असंख्य सुनांना छळामध्ये काहीही बदल न करता छळले आणि प्राण,‚ जीवन, प्रेम चोप्रा अशी सकारात्मक नावे असणाऱ्या खलनायकांनी स्त्रियांवर अनंत अत्याचार केले. असे म्हणतात, की चित्रपट हा समाजाचा एक आरसा असतो. मग तेव्हाचा समाज आणि समाजातील स्त्रिया अशा टिपिकल सोशीक होत्या का? तर अजिबात नाही. तेव्हा कशाला,Æ इतिहासातदेखील बंडखोर स्त्रियांचे अनेक दाखले मिळतील. तसे काही धाडसी निर्मात्यांनी प्रयत्नही केले; पण प्रेक्षकांना नायिकेच्या डोळ्यात विखार नाही, पावसाळाच हवा होता, त्याला कोण काय करणार. चित्रपट आधी वास्तववादी होताच; पण तो वास्तववादी सिनेमा लोकांना आवडायला लागला आणि एक महत्त्वाचा बदल झाला. तो म्हणजे, नायिका बदलायला लागली किंवा नायिकेतील बदल लोकांना आवडायला लागला. पूर्वी सोसणाऱ्या नायिकेने हातात आसूड घेतला, की प्रेक्षकांना तो चित्रपट आवडायचा; कारण प्रेक्षकवर्गातील असंख्य महिलांना भोगणारी महिला बंड करताना दिसायची आणि स्फूर्ती मिळायची. महिलांच्या सशक्त व्यक्तिरेखा 'मदर इंडिया', 'मिर्च मसाला', '‚खूबसूरत', '‚खून भरी मांग' अशा चित्रपटांत लिहिल्या गेल्या. अगदी 'मुघल ए आजम'मधील अनारकलीदेखील बादशहासमोर 'प्यार किया तो डरना क्या' असा प्रश्न विचारताना आपण पाहिली. काळ बदलत गेला आणि शिक्षणामुळे मुलींच्या कक्षा रुंदावायला लागल्या. सोसणारी, ‚रडणारी, ‚भोगणारी,‚ चूल आणि मूल सांभाळणारी हिरॉइन इतिहास जमा होऊ लागली. नंतर आलेल्या काळामध्ये स्त्रीचे नवे चित्र समोर आले. त्या चित्राचे नाव होते प्रेयसी किंवा …गर्लफ्रेंड. त्यानंतर समाजाचे भान बाळगून चित्रपटातील नृत्यमय रोमान्स वाढला. हिरोने मारामारी करावी आणि हिरॉइनने आपल्या अदांनी, सौंदर्याने खिळवून ठेवावे, असा एक दौर आला. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत प्रत्येक पिढीवर हिरो नावाच्या राजाने राज्य केले. देवानंद, मग राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चन आणि मग शहारूख खान आणि आता रणबीर कपूर, ‚सलमान खान,‚ आमीर खान. पटकथा अशा पद्धतीने लिहिल्याच जाऊ लागल्या, की चित्रपट हिरोभोवती फिरायचा. हिरॉइनचं काम साहाय्यक असायचे. याची अनेक उदाहरणे आहेत. डॉन, दीवार, आनंद आणि असे असंख्य चित्रपट आहेत, ज्यात चित्रपटाची कथा, पटकथा फक्त हिरोभोवती फिरली आहे. लोकही हिरोची मारामारी, हिरोची डायलॉगबाजी, त्याने घेतलेला बदला या गोष्टी बघायला जात होते. हिंदीमध्ये मधुबाला, नर्गिस अशा कितीतरी सक्षक्त अभिनेत्री असूनही अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा वापर चवीपुरताच झाला. अर्थात याला 'सीता और गीता', 'चालबाज' यांच्यासारखा फार कमी वेळा अपवाद होता. हेमा मालिनी, श्रीदेवी, रेखा अशा अभिनेत्रींच्या अभिनय गुणांना डोळ्यासमोर ठेवून असे चित्रपट बांधले गेले. दहा गुंडांना मारणारा फक्त हिरोच नाही, तर हिरॉइनदेखील असू शकते. ती सुद्धा पोलिसी गणवेश घालून गुंडांना यथेच्छ बदडू शकते, यावर लोकांचा विश्वास बसू लागला. ८० आणि ९०च्या दशकात स्त्रीच्या सशक्त व्यक्तिरेखांचे अनेक रंग समोर यायला लागले. 'रुदाली', 'बँडिट क्वीन' हे हिंदीमध्ये, मराठीत 'उंबरठा',‚ 'पिंजरा',‚ 'दोघी', 'मुक्ता' हे समांतर म्हणून नाही, तर व्यावसायिक चित्रपट म्हणून लोकांनी स्वीकारले. यामध्ये फक्त अभिनेत्रींचे कौतुक नाही, तर त्या चित्रपटांचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते या साऱ्यांचेच आहे; कारण तद्दन ग्लॅमरस चित्रपट करत असताना, अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींना घेऊन, अनेक लेखकांना आव्हानात्मक व्यक्तिरेखा लिहाव्याशा वाटल्या. दिग्दर्शकांना त्या अभिनेत्रींमधील सूप्त टॅलेंट प्रेक्षकांसमोर आणावेसे वाटले आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे निर्मात्यांनी या प्रयोगासाठी पैसे लावले. ते झाले नसते, तर डिंपल कपाडियांनी 'रुदाली'मधील बंडखोर रुदाली साकारलीच नसती. ड्रीमगर्ल हेमामालिनी ही सीताची गीता बनलीच नसती. रेखाने 'कामसूत्र', 'आस्था' स्वीकारलाच नसता. याच काळात स्त्री भूमिकांची आणखी काही रूपे समोर आली. ज्यामध्ये तिने 'मृत्युदंड'मधील केतकी बनून काही प्रस्थापित प्रथा मोडीत काढल्या. 'गुलाब गँग'मध्ये सुमित्रादेवी बनून बंड पुकारले. 'एनएच १०' मधील तिने आपल्या प्रियकराचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी जिवाचे रान केले, तर 'डोर'मधील गुलपनागने स्वत:च्या नवऱ्याला वाचविण्यासाठी कित्येक किलोमीटरचा प्रवास करत मोठ्या धैर्याने विधवेकडून नवऱ्यासाठी क्लीन चीट मिळवली. 'मर्दानी'मधील शिवानी स्त्री भक्षणाविरुद्ध दबंग इन्स्पेक्टर बनून उभी राहाते. २००० सालानंतर स्त्री भूमिकांना आणखी एक टर्निंग पॉइंट मिळाला; कारण स्त्रीचे प्रश्न घरगुती अन्यायापलीकडे गेले होते. असे प्रश्न मांडण्यापेक्षा चित्रपटांनी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि 'चक दे इंडिया'मधील मुलींनी हॉकीचा वर्ल्डकप खेचून आणला. एक स्पर्धक म्हणून स्त्री कशी आहे, हे प्रकटपणे समजले. 'मेरीकोम' बनून स्त्रीने जगाला प्रेरीत केले. मराठी सिनेमात 'यल्लो'मधील गौरीने जगाला दाखवून दिले, की स्त्री अशीही स्पेशल आहे आणि तशीही. 'क्वीन'मधील रानी एकटी हनीमूनला गेली आणि 'इंग्लीश विंग्लीश'मधील आर्इने मुलीसाठी इंग्लिश भाषेवर प्रभूत्व मिळवले. यातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे 'सैराट'. '…सैराट'मधील आर्ची बंडखोर होती आणि ती वर्णव्यवस्थेविरुद्ध उभी राहीली. तिने प्रेमासाठी वणवा पेटवला. चूल आणि मूल पासून सुरू झालेल्या स्त्रीचे पाऊल सातच्या आत घरात पडायचे. चित्रपटातील स्त्रीने बंधनांचा उंबरठा ओलांडला. त्यामुळेच ती 'क्वीन' म्हणून गौरवाने उभी राहीली. कधी गौरी बनून ती स्पेशल ठरली, तर कधी स्त्रीच्या पाठी उभी राहून तिचीच 'सिक्रेट सुपरस्टार' बनली. 'तुम्हारी सुलू' बनून तिने टिपिकल गृहिणीला लोकांच्या मनापर्यंत नेत संवाद साधला. चित्रपट मराठी असो, हिंदी असो, इंग्लिश असो वा कुठल्याही देशाचा, स्त्री भूमिका बॉक्स ऑफिसवर आणि मनावर राज्य करायला लागली आहे. चित्रपट हा कितीही झाला, तरी मेक बिलिव्हचा खेळ असतो, असे म्हणतात. काल समाजातील गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटात दिसत होते. तेथून आज चित्रपटातली स्त्री आणि तिची भूमिका, तिची हिंमत समाजातील स्त्रियांना प्रेरीत करायला लागली आहे. हे असेच चालू राहिले, तर काल चित्रपट वास्तवदर्शी झाला होता…. सशक्त स्त्री व्यक्तीरेखांमुळे भविष्य सिनेमॅटीक होण्यास वेळ लागणार नाही. (लेखक चित्रपट, नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट