सांगलीमध्ये राहणाऱ्या एखाद्या मुलीने थरारक आयुष्याचा अनुभव घेण्यासाठी लेह-लडाखला जावे, तेथे थोडे थबकावे आणि त्यानंतर कायमचेच तेथील होऊन जावे, हा प्रवास अनेकांना चक्रावून टाकणारा आहे. त्यानंतर तेथे सुरू केलेले हॉस्टेल हा आणखी पुढचा टप्पा. मी हे केले आहे आणि त्यात मला खूप आनंद मिळतो आहे. - ग्रीष्मा सोले मी सांगलीची. भटकंतीचे वेड पहिल्यापासूनच होते. वडिलांचा व्यवसाय होता. आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायचे, कोणाच्याही हाताखाली काम करायचे नाही, हे ठरवले होते. शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आले. सांगलीमधील निवांतपणा सुटला आणि येथील धावत्या जगाशी स्वत:ला जुळवून घेतले. पुण्यामध्ये एमबीए झाले. भटकंतीची आस मात्र थांबत नव्हती. मन सतत वाऱ्याच्या वेगाने धावत होते. शेवटी या भटकंतीलाच मी सोबती बनविले. माझा स्वभाव बंडखोर. नेहमी वेगळ्या वाटा धुंडाळणारा. माझ्या आवडीनिवडीही तितक्याच भन्नाट! मी स्कूबा डायव्हिंग शिकले. त्यात पारंगत होऊन आंतरराष्ट्रीय लायसेन्सही मिळविले. त्यानंतर सात वर्षे निरनिराळ्या ट्रॅव्हल कंपन्यांसाठी टूर मॅनेजर, लीडर म्हणून काम केले. पाच वर्षांपूर्वी 'डायरी ऑफ अ रोव्हर्स ओडिसी' या नावाने ब्लॉग सुरू केला. स्कूबा डायव्हिंग आणि बायकिंगच्या सफरी आयोजित केल्या. मी फ्री लान्सर म्हणून काम करत होते. खूप फिरत होते; पण शोध काही संपत नव्हता. सहा वर्षांपूर्वी 'होम स्टे' प्रकल्पासाठी लडाखला आले आणि माझी पावले थबकली. फक्त थबकलीच नाही, तर ती येथे थांबलीच. मी तीन महिने लेहला स्थानिकांमध्ये वावरले. त्यांच्या घरात राहिले. त्यांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला, संशोधन केले, त्यावर लिहिले. थोडक्यात, मी पुरती वेडी झाले होते. मला कधीच हिरवेगार डोंगर, जंगल, समुद्र यांचे आकर्षण नव्हते. येथील उजाड डोंगर, दुर्गम खडकाळ रस्ते आणि बोचरी थंडी मात्र मला खुणवायची. २०१५मध्ये मी स्वतःची 'रोव्ह की' नावाची ट्रॅव्हलिंग कंपनी सुरू केली आणि लडाखवासी झाले. रोव्हर म्हणजे भटके आयुष्य जगणारा. येथे वेगळ्या टूर्स काढत होते. भटक्यांच्या गरजेनुसार, आवडीनुसार सहली ठरवत होते. त्यात एकदा फक्त पुरुषांसाठी बाइक रायडिंग टूर आखली. ही टूर लीड करणारी मी एकमेव मुलगी ठरले. दरडी कोसळून बंद पडलेले रस्ते, वातावरणातील बदल यांचा थरकाप उडवणारा अनुभव घेतला. त्यातून खूप काही शिकत गेले. कितीही अडचणी आल्या, तरी या ठिकाणाबद्दल वाटणारी तळमळ कधी विरली नाही. मी जेव्हा जेव्हा येथे एकटी असायचे, तेव्हा रात्रभर फिरणे, कोणाचेही दार ठोठावून राहायला जाणे, हिचहायकिंग करणे असे नानाविध प्रकार केले. लेह-लडाखवासीयांकडून मला कायम चांगली वागणूक मिळाली. येथील लोक अत्यंत आपुलकीने स्वागत करणारे आहेत. ही जागा मुलींसाठी अगदी सुरक्षित आहे. मी त्याचा अनुभव घेतला आहे. माझी स्थानिकांशी एवढी छान मैत्री झाली, की मी त्यांच्याकडून तिबेटियन भाषा शिकू लागले आणि त्यांना मराठी शिकविले. आता मला तुटक तुकट का होईना; पण तिबेटियन बोलता येते. तेथे एक ४० वर्षे जुने आणि पारंपरिक लडाखी पद्धतीने बांधलेले घर होते. ते विकत घेऊन त्याचे आरामदायी हॉस्टेल करावे, हा विचार डोक्यात शिजत होता. अखेरीस माझा सोबती कौस्तुभ दळवी याच्या साथीने जागा विकत घेतली. त्यासाठी कर्ज काढले आणि 'रोव्हर्स डेन' हे आमचे टुमदार हॉस्टेल उभे राहिले. आजूबाजूला जर्दाळू, सफरचंदाची झाडे, शेकोटी पेटवून ऊब घेत निवांत बसता येईल, असे ऐसपैस आवार, स्वतःच्या हृदयाचे ठोके जाणवतील एवढी शांतता आणि मार्केट, शांतीस्तूप या पर्यटकांच्या लाडक्या स्थळांपासून जवळ असणारे हे हॉस्टेल या वर्षी मार्च महिन्यात सुरू झाले. १२ खोल्या, त्यातही डॉर्मिटरी, डिलक्स रूम असे वैविध्य, बैठे खेळ खेळायला, गाणी ऐकायला आणि सिनेमे पाहायला केलेली खास तरतूद, अशा सोयी-सुविधांमुळे विदेशी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लेहमधील राहण्यासाठी सर्वांत स्वस्त आणि दर्जेदार ठिकाण म्हणून अल्पावधीतच आम्ही नावलौकिक मिळवला. या हॉस्टेलमधील स्वयंपाकघरात सर्वांना मुक्त प्रवेश आहे. कोणीही येऊन आपापल्या पद्धतीने खाणे तयार करू शकते आणि त्यांच्या त्यांच्या पारंपरिक पदार्थांची चव इतरांना चाखायला देऊ शकते. यामुळे येथे राहणारे सगळे जण एकमेकांशी जोडले जातात. येथील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे अधिकारी, लष्करी अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. एका ब्रिगेडिअरने मला त्यांची बहीण मानले आहे. मी लडाखवासी झाले आहे. तेथील वातावरणाशी समरस झाले आहे. याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर जाणवतो. लोकांना तेथे गेल्यावर त्रास होतो, मला घरी आल्यावर होतो. आता मी बायकर्स आणि सायकलिंग प्रेमींसाठी रेसचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात हिमालयातील पहिल्या अल्ट्रा सायकलिंग रेसपासून झाली आहे. या ६०० किलोमीटरच्या रेसचा सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू म्हणून 'रोव्हर्स डेन' महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एप्रिल ते सप्टेंबर हा येथील भटकंतीचा हंगाम. लडाख फेस्टिव्हलनंतर हिवाळ्यात 'झंझकार व्हॅली ट्रेक' आणि 'स्नो लेपर्ड एक्स्पेडिशन'साठी पर्यटक येतात. पुढील वर्षांपासून यासाठीही हॉस्टेल सुरू ठेवावे, असा माझा विचार आहे. या हिमगर्द परिसराने, येथील थंडीने आणि डोळ्यांत मावणार नाही अशा पसरलेल्या निसर्गाने मला कायमचे घर दिले. इतर भटक्या जिवांना प्रेमाचा आसरा मिळावा म्हणून हॉस्टेल सुरू करण्याची प्रेरणा दिली. संस्कृती, इतिहास जपणाऱ्या आणि जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लडाखवासींनी मला आपलेसे केले; यामुळे मी या जागेची नेहमीच ऋणी राहीन. (शब्दांकन : गार्गी पेठे)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट