Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मैत्री खगोलाशी

$
0
0

केतकी वस्पटे

खगोल हा मोठ्या मुलांचा विषय आहे. सगळ्या वयाच्या मुलांना यात काय गती आहे, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मला स्वत:ला या विषयाचे लहानपणापासूनच जबरदस्त आर्कषण होते आणि आहे. गूढ वाटणारा आणि तरीही रम्य असा हा विषय दुर्लक्ष करण्यासारखा नसावा; कारण माणसाचे कुतूहल अशा खास गोष्टींमुळेच जिवंत राहते.

मागे एक पोस्ट बघण्यात आली होती, ज्यामध्ये सूर्य, इतर ग्रह आणि पृथ्वी यांच्या आकाराप्रमाणे तुलनात्मक तक्ता दिला होता. अनेक जणांना ही पोस्ट माहिती असेल. त्यात सूर्य सगळ्यांत मोठा असून पृथ्वी त्याच्यासमोर एकदम छोट्याशा दगडाप्रमाणे दिसत होती. एक बाण दाखवून तेथे लिहिले होते, 'येथे आपण आहोत. जेव्हा आपल्या समस्या, दु:ख आणि अहंकार आपल्याला खूप मोठे वाटायला लागतील, तेव्हा हे चित्र डोळ्यापुढे आणावे; म्हणजे आपण किती किरकोळ आहोत, हे समजेल. त्या अनुशंगाने आपल्या चिंताही किती कमी महत्त्वाच्या आहेत, हे समजून आपण स्वत:ला हलके करू शकू.'

खगोल या विषयाची एक बाजू अतिशय क्लिष्ट आणि तांत्रिक आहे. त्यामध्ये सगळ्यांना रस असायचे काही कारण नाही. वैयक्तिकदृष्ट्या मलाही अजिबात नाही. ज्यांना असतो तो त्यांनी नक्की जोपासावा. मला सर्वव्यापी आकाशाचे गूढ आणि त्याचे आपल्याशी असलेले नाते, या विषयाचे खास महत्त्व वाटते. आजकाल मुले आकाशाकडे किती बघतात हा प्रश्न आहे. घर, शाळा, शाळेची इमारत, ट्यूशन, बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये खेळ की घर आणि झोप अशा दिनश्चर्येत आकाशासाठी कोणाला वेळ आहे? शाळाही या विषयाकडे पाठ फिरवून आहेत; पण स्वत:बद्दल आणि जगाबद्दल खोल विचार करायला भाग पाडणारा विषय, म्हणून याला आपण महत्त्व द्यायला हवे.

इतके नियम, इतके जास्त वजन तरी हवेत तरंगणाऱ्या ग्रहांचे रस्ते किंवा ऑर्बिट अशा अनेक गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतातच. एकएक घास तोडून नावडती भाजी पोटात ढकलल्याशिवाय साधा डबाही संपत नाही, तर एवढे भव्य दिव्य ब्रह्मांड अस्तित्वात कसे येऊ शकते आणि कसे चालू शकते, या सगळ्यात मुलांना किती मजा वाटू शकते, याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. मला आजही घरच्या साध्या बायनाक्युलरवर लहानपणी 'कॉमेट' म्हणून तायांबरोबर काहीतरी शोधत असल्याचे दिवस आठवतात. भारी गंमत वाटायची.

आता एकदा जर आपण ठरवले मुलांना काहीतरी खगोलाचे ज्ञान द्यावे किंवा अनुभव द्यावा, तर त्यात जरा तांत्रिक मर्यादा येतात. एकतर त्याची खास दुर्बीण असते, जी सगळ्यांना घेता येण्यासारखी नसते. दुसरे म्हणजे खगोल मंडळांच्या आकाशदर्शनाच्या उपक्रमांनाही आपल्याला जाता येर्इलच असे नसते; कारण परक्या ठिकाणी पूर्ण रात्र जावे लागते. उन्हाळ्याचे दिवसच यासाठी सगळ्यांत सोयीचे असतात; कारण आकाश दर्शनासाठी ढगाळ वातावरण नको असते. मग करावे तरी काय, असा प्रश्न पुढे येतो. यासाठी काही उपक्रम मी येथे देते आहे. ते आपण अगदी सहजपणे करू शकतो आणि मुलांचे कुतूहलही जिवंत ठेवू शकतो.

आम्ही केलेले काही उपक्रम

१. एका पुठ्ठ्यावर आपले सूर्यमंडल काढले आणि रंगविले. चित्र रंगीबेरंगी आणि आकर्षक असावे, अशी काळजी घेतली. एखादे भावचित्र ठेवावे, तसे ते मी आमच्या स्कूलरूमच्या खिडकीत ठेवले. अधूनमधून मुलीला दाखवत राहायचे, 'हे बघ ही आहे पृथ्वी. आपण येथे आहोत.' तिला नेस्टिंग बॉक्सेसही आठवत होते. आपण किती इवलेसे आहोत ते आम्ही पाहिले. ते चित्र मी खूप दिवस तसेच ठेवले. आमच्या सूर्याबद्दलच्या किंवा इतर कुठल्या ग्रहाच्या चर्चांमध्ये ती मला अचानक त्या चित्राचा संदर्भ देऊ लागली. 'ही आपली पृथ्वी आहे ना, चंद्र येथे असेल, देवांनी या सगळ्यांवरून पाय ठेवला होता ना,' मीच थक्क झाले. एका छोट्या चित्राचा मला एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होईल, असे वाटले नव्हते.

२. आम्ही एक 'मून जर्नल' बनवले होते. हे बनवायचे काम एकदम सोपे आहे. एका कागदाचे ३० दिवसांसाठी ३० भाग करायचे आणि चंद्रासाठी ३० गोल काढायचे. शक्यतो पेन्सिल वापरावी. प्रत्येक भागात तारखा टाकायच्या आणि रोज रात्री चंद्राचे निरीक्षण करायचे. जसा चंद्र दिसेल, तसा त्याच्या कलेप्रमाणे रिकाम्या गोलात काढायचा. एखाद्या दिवशी ढगांमुळे दिसला नाही, तर ढग काढायचे. याच बरोबर त्याबद्दल माहितीही देत राहायची. हा उपक्रम आम्हाला ढगाळ आकाशामुळे काही फार दिवस करता आला नाही; पण मजेशीर आहे एवढे नक्की.

३. आपल्याला इंटरनेटवर स्काय मॅप मिळतात. त्यात वेगवेगळे तारे, नक्षत्रांची जागा आणि माहिती दिलेली असते. आकाश ढगाळ नसल्यास हेही मुलांना खूप मजेशीर वाटेल.

४. जेव्हा आकाश ढगाळ नसेल, तेव्हा मी मुलीला हमखास खगोल मंडळाच्या आकाशदर्शनाला घेऊन जायचे. एकदा आम्ही खगोलीय दुर्बिणीतून चंद्र पाहिला होता आणि तो जवळून दिसल्यासारखा वाटला. मुलीला खूप मजा वाटली.

तसेच पुढील उपक्रम माझ्या डोक्यात आहेत. मून जर्नल हा कायमसाठीही एक चांगला उपक्रम आहे. तो मला पुन्हा सुरू करायचा आहे.

१. तारकांचे गुच्छ किंवा कॉन्स्टलेशन यांचे आकार एका कडक कागदावर किंवा पुठ्ठ्यावर भोक पाडून बनवायचे. अंधारात त्यांच्यामागे मेणबत्ती ठेवून ते बघायचे. ते पाठ केले, की आपल्याला आकाशातही शोधण्यास उपयोग होईल.

२. एक जाड फ्रेम बनवायची आणि त्यावर ढगांच्या प्रकारांचे फोटो चिकटवायचे. ही फ्रेम दिवसा आकाशाकडे धरून ते प्रकार शोधायचे.

३. विविध चंद्रकलांचे लटकन बनवायचे आणि भिंतीवर लावायचे.

(लेखिका होमस्कूलिंग करतात)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>