असाध्य आणि दुर्धर आजारानंही तो खचलेला नाही. संकटांशी टक्कर घेत यशोशिखर गाठण्यासाठी त्याची झुंज सुरू आहे. 'कुठल्याही प्रकारची सहानुभूती नको, पाठीवर थाप मारुन फक्त लढ म्हणा' असं म्हणणाऱ्या ओमकार वैद्यची गोष्ट जाणून घ्या आजच्या 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिना'निमित्त. मुंबई टाइम्स टीम 'जगभरात स्टँडअप कॉमेडी उभं राहून केली जाते. पण मी मात्र ती जागेवर बसूनच करणार आहे' या त्याच्या पहिल्याच वाक्यानं ओमकार वैद्यनं प्रेक्षकांना जिंकून घेतलं. भाडीपा सिक्रेट स्टँडपसाठी आलेल्या ओमकारनं जोरदार सादरीकरण करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 'सिलेब्रल पाल्सी' यासारख्या दुर्धर आजारानं ग्रस्त असलेला तो बिलकूल खचलेला नाही. त्यातून जिद्दीनं पुढे जात यशस्वी व्हायची जिद्द त्याच्या मनात आहे. औरंगाबादमध्ये राहणारा ओमकार मास्टर्स ऑफ सोशल वर्कचा विद्यार्थी आहे. लहानपणापासूनच या आजाराशी तो झुंज देतोय. त्याच्या आई-वडिलांनी सामान्य मुलांबरोबरच शिकण्यास त्याला प्रोत्साहन दिलं. छंद जोपासण्यास कधीही आडकाठी केली नाही. शाळा-कॉलेजमध्ये असताना ओमकारनं लेखनासाठी अनेक बक्षीसं मिळवली आहेत. २००५मध्ये त्याला सृजनशील लेखनासाठी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते बालश्री पुरस्कार मिळाला होता. वाचनाचा छंद जोपासत असताना सायकॉलॉजीमध्ये बीए तर मास्टर इन कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवी मिळवली. आपल्याला मिळालेलं वातावरण इतर दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध करून देता यावं यासाठी सध्या तो 'मास्टर्स इन सोशल वर्क'चं शिक्षण घेतोय. ओमकारची जिद्द बघून सत्यजित खारकर यांनी त्याच्यावर एक माहितीपट बनवला. संगीताची आवड असलेल्या ओमकारनं गीतरामायणाचा कार्यक्रम आयोजित करून श्रीधर फडके यांची जाहीर मुलाखत घेतली होती. मनोरंजन क्षेत्राची मनापासून आवड असल्यामुळे, नोकरी न करता मनोरंजन क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करणार, असं तो सांगतो. स्टँडअपमध्येच काम करणार का असं विचारल्यावर तो म्हणाला, की 'आपलं मत मांडण्यासाठी स्टँडअपचा पर्याय मला आवडला. यापुढे देखील विविध सामाजिक विषयांना हात घालणारे स्टँड अप्स करायला आवडतील.' ओमकारला दिव्यांगांसाठी काम करायचं आहे. 'दिव्यांगांबद्दलची जागरुकता केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येक व्यक्तीच्या मनात कायमस्वरूपी असायला हवी. दिव्यांग हा केवळ सहानुभूतीचा विषय बनला असून, तसं नसावं', असं तो सांगतो. सहानुभूती नको ओमकार स्टँडअपच्या माध्यमातून दिव्यांगांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्या, त्यांना थोडा कॉमेडीचा तडका देत प्रेक्षकांसमोर मांडतो. दिव्यांगांना जाणवणारा एकटेपणा, न मिळणाऱ्या सोयी-सुविधा, त्यांचं एकूणच आयुष्य असे अनेक मुद्दे तो यामध्ये मांडतो. हे सर्व सांगत असताना तो कुठेही मदतीची याचना किंवा सहानुभूतीची अपेक्षा करत नाही. सिलेब्रल पाल्सी हा आजार केवळ शारीरिक आहे. हा आजार असणारी व्यक्ती बुद्धीमत्तेच्या बाबतीत सामान्य माणसाप्रमाणेच असते. हे लक्षात आल्यानंतर मी हे करू शकेन याची जाणीव मला झाली. त्यानंतर माझा आजार माझ्यासाठी आजार उरलाच नाही, उलट तो माझी ताकद झाला. ओमकार वैद्य
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट