कलासंवाद मी स्वत: कलाकार आणि माणूस म्हणूनही आपल्या कक्षा रुंदावत राहाव्यात, यासाठी काव्य, नाट्य, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला अशा सर्व कलांचा अभ्यास करते. सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आनंद हा मला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार. संगीत अगाध आहे. माझ्या अल्पमतीला मांडावेसे वाटले, ते मांडले. मतांबद्दल दुराग्रह नाही. सगळेच अनुभव शब्दांत मांडता यायला हवेत, असा अट्टहासही नाही. सानिया पाटणकर संगीताने जीवन परिपक्व होते. मन जीवनाचे तत्व, अर्थ नव्याने शोधू लागले आहे. विद्या ग्रहण सुरूच असते आणि एका जन्मात हे शक्य नाही, ही मर्यादाही जाणवते. संगीताशिवाय जीवन निरर्थक आहे, हेही खरे. मी या वाटेवरची एक वाटसरू. मी शब्दप्रभू नाही; परंतु या लेखमालेद्वारे रियाजातील क्षण, श्रोत्यांचे अनुभव, गुरूंसोबतचे आत्मभान देणारे अनुभव, संगीत स्वररत्नांचे तेज, तरुण पिढीसमोरील आव्हाने आणि समस्या यांचा प्रामाणिक आढावा घेता आला. संवाद साधता आला. हा संवाद स्वत:शीही झाला. एक कलाकार म्हणून सामाजिक जीवनात खूप प्रेम आणि आदर मिळाला. विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी स्वत: प्रगल्भ होत गेले. बुजुर्ग कलाकारांचे आशीर्वाद मिळत गेले. देशात आणि विदेशातही मैफली करत असताना स्वत:च स्वत:च्या संगीताचा आरसा बनायला शिकले. काही कटू अनुभवही आले; पण हेच जीवन आहे. सकारात्मक ऊर्जेच्या सहवासात राहणे आणि नकारात्मकतेपासून दूर जाणे, हे संगीतानेच शिकवले. अवाजवी कौतुक आणि निराधार टीका या दोन्हींचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. जगरहाटीचे हे अनुभव मला घराच्या चार भिंतीत फक्त रियाज करून कधीच मिळाले नसते. एक स्त्री कलाकार म्हणून जगभर प्रवास करताना अंगी धैर्य बाणवले. एक स्त्री फक्त कलाकारच नाही, तर आई, पत्नी, सून, गृहिणी अशा सगळ्यांच भूमिका निभावत असते. मला लहानपणापासूनच आई, वडील, आजी, आजोबा, भाऊ, नंतर नवरा, सासू, सासरे, मुलगा या सगळ्यांनी संगीतासाठी कौटुंबिक पातळीवर खूप प्रेमळ आधार दिला. अर्थात, तरीही आतील नाजूक स्त्री मन आणि कलाकार यांच्यामध्ये कधीकधी द्वंद्व सुरू असते. गळ्यातील चिमुकले हात बाजूला काढून दूरच्या प्रवासाला निघणाऱ्या कलाकार आईचे दरवेळी सैरभैर होणे, काही जिव्हारी लागणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाणे, यातून पोटाशी धरतात ते सूर. उज्जैन महोत्सवात गायल्यानंतर आलेल्या अघोरी वादळातून आणि जिवावर बेतणाऱ्या अशा अनेक परिस्थितींमधून मला बाहेर काढून मार्ग दाखविला तो सुरांनीच. सूर हेच माझे ईश्वर, तेच परमतत्व आणि तेच अंतिम सत्य. हे सूरच तर एकाग्रता, तल्लीनता, आत्ममग्नता यांचा पाया रचतात. समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. आजचे जग यांत्रिकीकरणाचे आहे. अनेक वाहिन्या, इंटरनेट, सोशल मीडिया, प्रसारमाध्यमे यांच्यामुळे जग जवळ येत चालले आहे. अनेक प्रकारचे संगीतप्रकार आपल्या कानावर पडत आहेत. संगीताच्या विद्यार्थ्यांना पूर्वी उपलब्ध नसलेल्या सुविधा, संधी मिळत आहेत. गुगल, यू-ट्यूबवर संगीताचे ज्ञानही विनासायास मिळते आहे. उपलब्ध नाही, तो वेळ आणि जागतिकीकरणाच्या जीवघेण्या वेगामध्ये हरविलेली शांतता. त्यामुळे शास्त्रीय संगीतामधील शांततेची जगाला जास्तीत जास्त आवश्यकता आहे. अर्थात, वेळेचे बंधन हे शास्त्रीय संगीतावरही येणे अपरिहार्य आहे. उदा. गुरू-शिष्य परंपरेत गुरूगृही राहून वर्षानुवर्षे शिक्षण घेणे हे सध्याच्या काळात अवघड झालेले आहे. सध्या गुरू आणि शिष्य या दोघांवरही व्यावहारिक बंधने आहेत. माणसाची शारीरिक क्षमता पूर्वीपेक्षा कमी झालेली असेलही कदाचित; पण विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, ग्रहणशक्ती वाढली आहे. पूर्वी शेवटच्या रांगेत बसलेल्या श्रोत्यापर्यंत आवाज ऐकू जाणे, हे महत्त्वाचे असल्यामुळे, त्या रीतीच्या आवाजाचा रियाज दहा-दहा तास करावा लागे. मायक्रोफोनच्या आधारे आता तंत्र अवगत झाल्यामुळे श्रोत्यांपर्यंत आवाज पोहोचविणे खूपच सुलभ झाले आहे. अर्थातच, या सर्व बदलांमध्ये गायनाचा कस कमी होता कामा नये. एखाद्या लहान मुलाला संगीताची आवड आहे, असे आई-वडिलांना समजल्यानंतर चांगला कलाकार घडविण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यासमोर खूप अडचणी येतात. त्यासाठी शालेय स्तरावरच मार्गदर्शक अभ्यासक्रम बनण्याची खूप गरज आहे, असे वाटते. तसे झाले, की अध्ययनातील आणि उपजीविकेचे साधन म्हणून कोणत्याही कलेकडे पाहण्याच्या अडचणी कमी होतील. कला हे एक हातातून निसटू शकणारे मृगजळ आहे, असे लोकांना व्यावहारिक दृष्टिकोनातून वाटते. म्हणूनच मग विज्ञान किंवा वाणिज्य शाखेची पदवी घेऊन कलासाधना करण्याकडे विद्यार्थ्यांचा साहजिक कल असतो. त्याच अनुषंगाने 'प्रेरणा' या सांगीतिक संस्थेचे काम मी काही वर्षांपूर्वी सुरू केले. त्या अंतर्गत अनेक नवोदिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, बुजुर्ग कलाकारांचे मार्गदर्शन आणि कार्यशाळा, खूप नामांकित नसलेल्या; पण अतिशय गुणी कलाकारांचे सादरीकरण असे प्रकल्प झाले. श्रोत्यांची बदलती अभिरुची आणि कसदार सांगीतिक मूल्य यांचा सुवर्णमध्य गाठणारी आदर्श मैफल कशी असावी हे समजावे, यासाठी मी दर महिन्याला माझ्या विद्यार्थ्यांचे रंगमंचीय सादरीकरण आयोजित करते. संगीत शिक्षणाबरोबर मैफलीचे तंत्रही त्यामुळे त्यांना अवगत होते. प्राथमिक ८-१० वर्षांच्या तालमीत तावून सुलाखून निघाल्यावर मला वाटते, की शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम, नाट्य, चित्रपट संगीताचे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे अभ्यासक्रम असावेत. एवढेच नव्हे, तर फक्त मैफलीचा कलाकार एवढेच ध्येय न ठेवता संगीत शिक्षक, संगीत दिग्दर्शक, म्युझिक अरेंजर, कंपोझर, साउंड इंजिनीअरिंग अशी आवडीनुसारची संगीत क्षेत्र हाताळायला हवीत. संगीत मैफलींच्या संयोजनातही गुणात्मक, दर्जेदार आणि अधिक सुंदर बदल व्हावेत. असे झाल्यास अनेक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. मी स्वत: कलाकार आणि माणूस म्हणूनही आपल्या कक्षा रुंदावत राहाव्यात, यासाठी काव्य, नाट्य, अभिनय, नृत्य, चित्रकला, शिल्पकला अशा सर्व कलांचा अभ्यास करते. अनेक पुरस्कार, सन्मान मला रियाजाला प्रोत्साहन देणारे ठरले. सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारा आनंद हा मला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार. संगीत अगाध आहे. माझ्या अल्पमतीला मांडावेसे वाटले, ते मांडले. मतांबद्दल दुराग्रह नाही. सगळेच अनुभव शब्दांत मांडता यायला हवेत, असा अट्टहासही नाही. परंपरेच्या मुशीतून निघूनही आधुनिक पिढीची प्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे. शास्त्रीय, भावसंगीत, लोकसंगीत, चित्रपटसंगीत, पाश्चात्य संगीत असे सर्व प्रकार अभ्यासायला मला आवडतात. त्यातील अनेक प्रकार गायलाही आवडतात. ही विविधता स्वत:मध्ये आणणे मला आव्हान वाटते. गात असताना स्वतंत्र सांगीतिक विचार मांडताना रुळलेल्या पायवाटांपेक्षा नवीन वाटा चोखाळायला मजा येते. नित्यनूतन अनुभवांसाठी मी आसुसलेली असते. सुख-दु:खापलीकडे जाऊन आपले भारतीय संगीत उभे आहे. आदर्श जीवनमूल्ये संगीत क्षेत्रामध्येही असावीत. नाण्याला दोन बाजू असतातच; पण जग परिवर्तनशील आहे आणि उत्तम ते वर येणार असा दुर्दम्य आशावाद माझ्याकडे आहे. अनेक मनांना पुनर्जीवन देणाऱ्या संगीताच्या या सागराची व्याप्ती आणि खोली शोधण्यासाठी परमेश्वराने असेच सामर्थ्य द्यावे, ही इच्छा. (लेखिका शास्त्रीय गायिका आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट