संपदा जोशी, निर्मला निकेतन
वर्ल्डकपच्या सामन्यांना सुरुवात झाली असून आता पुढील एक-दीड महिना क्रिकेटप्रेमींसाठी फुल टू धमाल असणार आहे. त्यानिमित्तानं 'ए यावेळेस भारताचे सगळे सामने सोबत बघू या', 'यंदा बॅटिंगचा वर्ल्ड कप होणार की बॉलर्स बाजी मारणार', असे संवाद सध्या तरुणांमध्ये सुरू आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या वर्ल्डकप सामन्यांची ही हवा आहे. तरुण मंडळी मुळातच हुशार असल्यानं वर्ल्डकपच्या सामन्यातल्या टीम्सपासून ते थेट सामने कुठे आणि कधी बघायचे या सगळ्याचं प्लॅनिंग वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर झालं तेव्हाच झालेलं आहे. काहींनी तर भारताच्या सामन्यांच्या दिवशी सुट्ट्यासुद्धा टाकल्या आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या टीम इंडियाला शुभेच्छा देण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. वर्ल्डकपचे सामने आपल्या प्रमाण वेळेनुसार दुपारी सुरू होत आहेत आणि दुपार म्हणजे कॉलेज किंवा ऑफिसची वेळ. पण यातूनही तरुणांनी मार्ग शोधून काढलाय. तरुणाई मोबाइल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्ल्डकपशी कनेक्टेड राहणार आहे. विविध अॅप्स, ऑनलाइन स्कोर इत्यादी गोष्टींची मदत तरुणांना सामने बघण्यासाठी होईल, यात शंकाच नाही. खास करून भारताचे सर्व सामने बघण्याचा प्रयत्न तरुणाईचा असेल. एवढंच नाही तर व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडियावर थेट लाइव्ह स्कोअर कळेल अशी काहींनी सोय करून ठेवली आहे. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर सामना सुरू असताना चर्चा सुरू असते. सामन्यांविषयी अंदाजही बांधले जातात तर बाहेर असलेल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना लाइव्ह स्कोअर देखील सांगितला जातो. दुसरीकडे अनेक ग्रुप्स भारताचे रविवारी असणारे सामने कोणाच्या तरी घरी जाऊन एकत्र बघणार आहेत आणि मैदानातील लढतीबरोबरच ऑनलाइन गेम्स, व्हर्च्युअल टीम आणि ड्रीम टीम यांसारख्या माध्यमातून वर्ल्डकप फिव्हर कायम राखण्याचा मूड हे तरुण करतील असं चित्र दिसतंय.
तरुण मंडळींकडे नेहमीच भन्नाट कल्पना असतात. त्यामुळे सामना बघण्यासाठी तरुण मंडळी काहीही करू शकतात. काही जणांना सामना बघणं शक्य नसेल तर ते सरळ एफएमवर लाइव्ह कॉमेंट्री ऐकतात. काही मंडळी ऑफिस आणि कॉलेजहून घरी जाताना वाटेतच एखादं टीव्ही शोरूम किंवा एखादं दुकान लागलं तर तिथं उभं राहून सामना बघू लागतात. सामान्यांच्या निमित्तानं अनेक निरनिराळे प्लॅन्स ठरत आहेत. घरी एकत्र जमण्याबरोबरच कॅफेमध्ये जाऊन सामने एन्जॉय करण्याचे प्लॅन्स तरुणांमध्ये सध्या रंगत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट