मुलांना काय करायला आवडते, काय व्हायचे आहे, कशात गोडी आहे याचा विचार न केल्याने विद्यार्थीदेखील स्वताचा व्यक्ती म्हणून विचार करत नाही. मला काय व्हायला आवडेल? मला काय व्हायचंय? मला कशात रुची आहे? मला काय चांगले जमते? याचा विचार करत नाही. त्यामुळे पालकांची ही एक मानसिकता पाल्याची विचार प्रक्रिया थांबवते.
----
काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थिनी भेटली. नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेली ही हुशार मुलगी मला कधीच इंजिनीअरिंगचे शिक्षण घ्यायचे नव्हते तर मी कायमच सामाजिक शास्त्रात त्यातही इतिहासात रुची असणारी होते. पण मला माझ्या घरच्यांनी मला हवा तो निर्णय घेऊ दिला नाही तर उलट माझ्यावर प्रत्येक निर्णय लादला. त्यामुळे आता इथून पुढे मला हवे तसे मी करणार आहे असे म्हणत तिची व्यथा सांगत होती. तर दुसरीकडे ओळखीतल्या एका नातेवाईकांचा मुलगा मला अमुक एका ठिकाणी प्रवेश नाही घेऊ दिला तर मी शिक्षण घेणार नाही अशी धमकीवजा इशारा पालकांना देऊन हट्टाला पेटला होता. त्यामुळे पालक आणि मुलगा दोघेही अडून बसले होते आणि एकमेकांना आपला निर्णय योग्य कसा आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते.
आपल्या आजूबाजूला असे अनेक पालक असतात. जे मुलांवर निर्णय लादत असतात किंवा आपण जे सांगू ते पाल्याने ऐकावे अशी त्यांची अपेक्षा असते. अनेक पालक तर यामुळे मुलांच्या निर्णय स्वातंत्र्यावर आक्रमण करतात. त्यांच्या व्यक्ती म्हणून असणाऱ्या दृष्टिकोनाचा यामुळे संकोच होतो. यामुळे पालक आणि विद्यार्थी यांच्यात वरवर खटके उडतात. वादही होतो. काही बंडखोर पाल्ये आपला हट्ट पूर्ण करतात. तर काही नम्रतेने पालकांच्या निर्णयाचा आदर करतात. पालकांचा हा हस्तक्षेप नेहमीच नकारात्मक किंवा सकारात्मक नसतो. सुरुवातीला लहान वयात शाळेत कुठल्या घालायचे हे पालक ठरवतात. पण महाविद्यालय कोणते, विद्याशाखा कोणती, नोकरी कुठे, कशा स्वरुपाची, क्षेत्र कोणते, सहलीला जायचे की नाही, मित्र कोण असावेत, मैत्री कुणाशी करावी, सामाजिक जीवनात सहभाग किती असावा हे सारेच ठरवतात. पण प्रत्येक टप्प्यावर पालकांनी केलेला हस्तक्षेप अप्रत्यक्षपणे अनेक वाईट परिणाम घडवून आणतो.
घेतलेला प्रत्येक निर्णय हा योग्य किंवा बरोबरच असायला हवा हा पालकांचा आग्रह अथवा अट्टहास मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासावर अदृश्यपणे परिणाम करतो. यातही विशेषत: शिक्षित व जागरूक समजले जाणारे पालक तुलनेने मुलांचे निर्णय नियंत्रित करत आल्याचे जास्त प्रमाणात आढळते. नुकतेच बारावीचे निकाल लागले. त्यात विविध प्रवेश परीक्षांचेही निकाल घोषित झाले. आता अनेक घरात पुढे काय करिअर करायचे यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण समुपदेशन घेतात. तर अनेक पालक कुटुंबातील शिक्षित अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेतात. काही पालक हे स्वतःच मुलांच्या आयुष्यातील निर्णय घेण्यास स्वतःला समर्थ मानतात. त्यामुळे एक पाल्याचा भविष्याचा निर्णय हा पालक, विद्यार्थी, शिक्षक, नातेवाईक, समुपदेशक यावर ठरतो. यात अनेकदा बाजारातील संधी व नोकरीची उपलब्धता हा अति महत्त्वाचा निकष असल्याने मुलांच्या आवडी, रुची, रस याकडे दुर्लक्ष होताना दिसते. कारण अनेक पालकांना मुले वयाने लहान असल्याने, त्यांना जगातील ज्ञान नसल्याने, त्यांच्या भविष्याविषयी माहिती नसल्याने, सभोवतालच्या स्पर्धेविषयी जाणीव नसल्याने ते निर्णय घेण्यास असमर्थ आहे असे वाटते. शिवाय लहान वयात तो/ती काय निर्णय घेणार असा दृष्टिकोन सामान्यपणे आढळतो. त्यामुळे आम्ही सांगू तसेच होईल असा काही पालकांचा अविर्भाव असतो. हा अविर्भाव अर्थात काळजीपोटी असला तरीही तो मुलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारा आहे.
मुलांना काय करायला आवडते, काय व्हायचे आहे, कशात गोडी आहे याचा विचार न केल्याने विद्यार्थीदेखील स्वताचा व्यक्ती म्हणून विचार करत नाही. मला काय व्हायला आवडेल? मला काय व्हायचंय? मला कशात रुची आहे? मला काय चांगले जमते? याचा विचार करत नाही. त्यामुळे पालकांची ही एक मानसिकता पाल्याची विचार प्रक्रिया थांबवते. स्वत:विषयी परीक्षण सोडाच पण स्वताच्या क्षमतांचा विचारही करावासा त्याला वाटत नाही. त्यामुळे निर्णयाच्या बाबतीत असे विद्यार्थी परावलंबी बनतात. सतत निर्णय घेण्यासाठी त्यांना पालकांची गरज पडते. कुठलाच निर्णय घेण्यास ते स्वत:ला समर्थ मानत नाही म्हणजे त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. जगात वावरताना मग प्रत्येक टप्प्यावर त्यांना पालकांच्या मदतीची गरज पडते. चुकीतून आलेल्या अनुभवातून मिळणाऱ्या व्यवहार ज्ञानाला ते मुकतात. किंबहुना चुकण्याचीच भीती इतकी वाटते की ते व्यक्ती म्हणून स्वताच्या निर्णयाची जबाबदारी घ्यायला बिचकतात. स्पर्धात्मक व्यावसायिक आयुष्यात निर्णय क्षमतेअभावी त्यांचा टिकाव लागणे अवघड होऊन बसते. त्यामुळे मार्गदर्शन देणे, रस्ता दाखवणे, योग्य अयोग्य याची जाणीव करून देणे व निर्णय लादणे यातील फरक पालकांनी ओळखायला हवा. आपण मुलाचा प्रत्येक निर्णय स्वतः घेऊन त्याचे भविष्य सुरक्षित करत असू अशा गैरसमजात न वावरता आपण त्यांना एक परावलंबी व्यक्ती घडवत नाही ना? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. याशिवाय तुला काय वाटते? तू ठरव काय करायचे ते!, तुला हवे ते कर पण जबाबदारी तुझी असेन अशी वाक्य बोलून जाणीव करून द्यायला हवी पण यात कुठेही जबरदस्ती नसावी.
अनेक पालक आमच्या मुलांना काय योग्य व अयोग्य हे पालक म्हणून आम्हालाच चांगले समजणार नाही तर कुणाला? असा प्रश्न उपस्थित करतात. अर्थात पालक नेहमीच पाल्याच्या हिताचा विचार करतात हे अंतिम सत्य असले तरीही मुलांना त्यांच्या व्यक्ती म्हणून अनुभव विश्वाला नियंत्रित करणे योग्य नाही. शिस्तीच्या नावाखाली सामाजिक जीवनातील त्यांचा सहभाग जेव्हा पालकांकडून नियंत्रित व्हायला लागतो तेव्हा त्यांचे अनुभव विश्व मर्यादित होते. एका सीमारेषेत मुलांना बांधून ठेवल्यामुळे वास्तव व व्यवहार यापासून मुले लांब राहतात. चांगले किंवा वाईटही त्यांच्या दृष्टीस पडत नाही त्यामुळे त्यांचे अनुमान व निष्कर्ष काढण्याची क्षमता अरुंद होते. याची जबाबदारी सर्वस्वी पालकांचीच असते. मुलांना समोर बरे-वाईट-कटू-अयोग्य-चांगले अनुभव येऊ द्यायला हवेत. त्यांच्या अंगी फक्त सारासार विचार करण्याची वृत्ती, बारीक निरीक्षण, सजगता रुजवायला हवी. त्यापुढे त्यांचा मार्ग त्यांना चालू द्यायला हवा. कारण पालक हे एक वस्तु किंवा उत्पादन घडवत नसतात तर माणूस घडवत असतात. त्याला कुठल्याच चौकटीत अडकून ठेवायला नको. व्यक्तिमत्त्वाला शिस्त लावताना अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी तरच एक अनुभवसंपन्न परिपूर्ण व्यक्ती घडवता येऊ शकते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट