भर पगारी 'पॅटर्निटी लीव्ह' देण्याचा निर्णय देशातील एका ख्यातनाम कंपनीने घेतला आहे. यामुळे वडील आणि मूल यांच्या नात्यावर काय परिणाम होईल आणि असा निर्णय इतरही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू होऊ शकतो का, याविषयी. आसावरी चिपळूणकर सहा महिन्यांची भर पगारी 'पॅटर्निटी लीव्ह' देण्याचा निर्णय 'झोमॅटो'ने घेतला आहे. हा त्यांच्या 'डिलिव्हरी बॉइज'साठीचा निर्णय नसून, देशभरातील त्यांच्या पाच हजार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांसाठीचा आहे. ही बातमी त्यांच्याच सीईओंनी काही दिवसांपूर्वी ट्विट केली आणि नोकरदार असलेल्या अनेकांना (स्त्री-पुरुष दोघांनाही) 'आपल्याही कंपनीने असे केल्यास फारच बरे,'… असे वाटल्याशिवाय राहिले नाही. बाळाच्या आगमना आधीपासून कुटुंबाचा खर्च वाढू लागलेला असतो. सुरुवातीच्या टप्प्यात लसीकरणापासून डायपरपर्यंतच्या विविध गोष्टींमध्ये कपडे, खेळणी इत्यादीपासून बाळासाठीच्या उष्टावण, बारसे यांसारख्या सोहळ्यांमध्येही एक एक खर्च वाढतच जातो. अन्य एका आंतरराष्ट्रीय फर्निचरच्या कंपनीनेही पुरुष कर्मचाऱ्यांसाठी भर पगारी 'पॅटर्नल लीव्ह'ची सुविधा यापूर्वीच उपलब्ध केली आहे. अशा निर्णयामुळे संबंधित कुटुंबाला आर्थिक भार पेलणे सोपे जाण्याची, तसेच बाळंत महिलेला आवश्यक असलेला मानसिक आधार आणि विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. वडील म्हणून बाळाशी नाते घट्ट होण्यासही यामुळे मदत होईल. 'मॅटर्निटी लीव्ह'नंतर जास्त काळ घरी राहायला लागलेल्या बायकांना किंवा प्रसूतीदरम्यानच्या काही गुंतागुंतीमुळे नोकरीच सोडाव्या लागलेल्या आईच्या मनात अनेकदा करिअरच संपल्याची भावना वाढीस लागते. बाळाच्या जबाबदारीदरम्यान तिला मदतनीस म्हणून कुटुंबातील सगळ्याच बायका पुढे येतात. मात्र, ज्याच्याशी तिचे खऱ्या अर्थाने नजीकचे नाते असते, त्या नवऱ्याने आपल्यासह बाळाबरोबरही जास्त वेळ घालवावा, ही तिची स्वाभाविक अपेक्षा असते. मूल फक्त एकट्याचे नाही, तर दोघांचे असूनही, कंपनीतून रजा घेण्यापासून, करिअरवर पाणी सोडण्यापर्यंत, ते बाळाची पूर्ण जबाबदारी आपलीच असल्याप्रमाणे पत्नीलाच सारे काही करावे लागते. नवरा फक्त घर आणि काम करत असल्याचे पाहून, तिला काही वेळा मानसिक थकवा येतो. दोघांनीही ही जबाबदारी वाटून घेणे नवऱ्याला रजाच मिळत नसल्याने शक्य नसते. पूर्ण पगाराची 'पॅटर्निटी लीव्ह' दिली जाते, तेव्हा वडील आणि मूल यांचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते. मुलासाठी एखादी गोष्ट करायला घेताना त्यात बाहेरच्या किंवा ऑफिसच्या कामांचा अडथळा येत नाही; तसेच कुठल्याही डेडलाइनचा ताण न घेता हे संगोपन शक्य होते. यामुळे आईलाही नक्कीच मदत मिळते. मुळातच प्रसूतीपासूनच काहीसा अशक्तपणा घेऊन घरी आलेली आई, बाळाच्या झोपेच्या अनिश्चित वेळांपासून त्याच्या स्तनपानापर्यंत पूर्ण लक्ष बाळावर केंद्रित करते. स्वत:च्या आरोग्याकडे काही वेळा ती दुर्लक्षही करते. बाळासाठी प्रकृती चांगले ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून, तिला एकत्र कुटुंबपद्धतीत काही वेळा आधार मिळतोही; पण हल्लीच्या विभक्त कुटुंबात 'पॅटर्निटी लीव्ह'मुळे गरजेनुसार नवऱ्याची मदत घरकामांतही घेता येऊ शकते. बाळासाठी काही पदार्थ तयार करण्यापासून ते एखाद्या वेळी भुकेच्या व्यतिरिक्तही बाळ रडत असल्यास त्याच्याकडे लक्ष देऊन, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणे, ही प्रत्येक वेळी आईचीच जबाबदारी न होता, मग त्याचे दुपटे बदलण्यापासून, त्याची शी-शू स्वच्छ करण्यापर्यंतच्या गोष्टींमुळे बाळाचे संगोपन ही सोपी गोष्ट नसल्याचे वडिलांनाही जाणवू शकेल. दृष्टिकोन बदलेल आणखी एक मोठा फायदा म्हणजे एकंदरितच स्त्रियांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलेल. स्त्रीबद्दलचे गैरसमज, तिच्याकडून असलेल्या अति अपेक्षा, घरकाम, बाळ आणि नोकरी सांभाळूनही (अर्थात, नोकरीतील गरज म्हणून) तिने प्रेझेंटेबल असावे, असा अट्टहास… अशा बऱ्याच गोष्टींबद्दलचे पुरुषांचे दृष्टिकोन, प्रत्यक्षात स्वत: बाळाला सांभाळण्याची जबाबदारी घेता घेता हळूहळू बदलू शकतात. सरसकट सगळ्याच घरांतून नसले, तरी काही घरांतून आजही बाळ सांभाळणे हे बायकांचे काम असल्याप्रमाणे त्याकडे पाहिले जाते. निदान बाळ लहान असताना, म्हणजे सुरुवातीच्या चार ते सहा महिन्यांपर्यंत तरी… 'पॅटर्निटी लीव्ह'च्या निमित्ताने पुरुषांनी फक्त घरीच थांबणे अपेक्षित नसून, त्यांचे बाळाशी, बाळाच्या निमित्ताने स्वत:च्याच बायकोशी संगोपनासंदर्भात अधिक सजगपणे चर्चा करून, बाळासमोर, बाळंत बाईसमोर वागायचे नियम स्वत:ला लागू करून घेतल्यामुळे एकंदरितच इतर स्त्रियांविषयीचा आणि विशेषत: नोकरीच्या ठिकाणी असलेल्या स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होऊ शकते. 'ती'ची म्हणून काही एक बाजू असू शकते, ती आपल्यापेक्षा वेगळी असू शकते, तिची मते, तिची पार्श्वभूमी आपल्यापेक्षा वेगळी असल्याचे भान ठेवून, तिच्यावर कुठलेही थेट 'लेबलिंग' न करता, तिच्याबद्दल अधिक सजग असलेला पुरुष एका 'पॅटर्निटी लीव्ह'च्या निमित्ताने घडू शकतो. बाळाची अंघोळ, न झोपणे यांसारख्या गोष्टींमध्ये सातत्याने त्याच्याबरोबर असण्यामुळे बाळाचा स्वभाव, त्याच्या प्रत्येक रडण्यातला वेगळेपणा आई हळूहळू ओळखू लागते. नोकरीच्या कारणास्तव वडील फारसे बाळाजवळ नसल्यामुळे, त्यांच्या बाबतीत हे घडत नाही. याच कारणाने अनेकदा मूल थोडे मोठे झाल्यावरही केवळ वडिलांकडे त्याला सोडून आईला कुठे जायची वेळ आली, तर अनेक आया शक्यतो जाणे टाळतात किंवा स्वत: मुलाला सोबत घेऊन जातात. वडिलांचे मुलाबरोबर पहिल्यापासूनच चांगले नाते तयार झाले असेल, तर आयांना ही शंका, काळजी तर वाटणार नाहीच; शिवाय मूलही फक्त आई सोडून कुणाकडे न राहण्याचे विशेष कारण उरणार नाही. मूल घडते अधिक सक्षम आईप्रमाणे वडीलही जवळ असतील, तर मुलांची फक्त शाळेतीलच प्रगती चांगली होते असे नाही, तर वडिलांनी मुलांसाठी मुलांना पुरेसा वेळ देण्यामुळे त्यांची एकूण भावनिक आणि बौद्धिकही वाढ अतिशय चांगली होत असल्याचे विविध अभ्यासांअंती सिद्ध झाले आहे. वडील अतिशय आनंदात दिवस घालवू लागतात. त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ऑफिस ते घर हे अंतर शक्यतो जवळचे असल्यास उत्तम; कारण आजही काही जण मोठ्या शहरांत नोकरीच्या संधीच्या निमित्ताने येतात आणि लग्न करून स्थिर होत असतानाच लगेचच मुलांचा विचार करतात. नोकरी करणारी त्यांची बायको अनेकदा गावाहून शहरात नुकतीच नवऱ्याबरोबर लग्न झाल्यामुळेच येऊन राहिलेली असते. इतक्यात तिला नवे शहर, येथील राहणीमान कळेपर्यंत वेळ जातो. मूल झाल्यानंतर तिला तातडीने पुन्हा गावाकडे पाठवले जाते. अर्थात, ही कामे बायकांची आहेत, असा सोयीने अर्थ लावून. हे अंतर जवळ आणले, तर हा मुद्दा खरेच सुटण्यासारखा आहे. अर्थात, यात कंपनीचीही बाजू आहेच. ज्या कंपन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असतात आणि त्यांच्या शाखाही अनेक शहरे, राज्ये किंवा देशांमधूनही असतात, तेथे सरसकट 'पॅटर्निटी लीव्ह'सारखी सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होतेच, असे नाही. संबंधित ठिकाणाची गरज, शाखेनुसार कर्मचारी संख्या आणि मोठा वर्ग विविध ठिकाणांहून एकाच वेळी अशा रजेवर जाण्याची शक्यता विचारात घेता कंपनीच्या कामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका मोठ्या कंपनीचे काम हे देशाच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम करणारे असू शकते. त्यामुळे 'पॅटर्निटी लीव्ह'सारख्या सुविधांचा विचारही अत्यंत काळजीपूर्वकच केला जातो. 'पॅटर्निटी लीव्ह'चे उचललेले पाऊल प्रत्येक घरातील फक्त बाळाच्याच दृष्टीने नाही, तर सर्वार्थाने सुदृढ नागरिक आणि समाज सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही मोलाचे आहे. 'आशिया'त सर्वाधिक 'पॅटर्निटी लीव्ह' 'पॅटर्निटी लीव्ह'ची सुविधा असलेल्या देशांचे प्रमाण आशिया खंडात सर्वाधिक आहे. आर्थिक स्तर वाढत जातो, त्यानुसार ही रजा देण्याची सुविधा उपलब्ध होते; तसेच त्याचा कालावधीही वाढत जातो. मध्यम स्तरांतील आर्थिक स्थिती असलेल्या १४ देशांत १४ आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त 'पॅटर्निटी लीव्ह' दिली जाते. Asawari.Chiplunkar@timesgroup.com देश : भर पगारी 'पॅटर्निटी लीव्ह'चा कालावधी जपान व दक्षिण कोरिया : एक वर्ष ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि मंगोलिया : १४ आठवडे भारत (सध्या) : १२ आठवड्यांपर्यंत ब्राझिल व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो : तीन आठवड्यांपेक्षा कमी गॅम्बिया (आफ्रिकन देश) : २ आठवडे मॉरिशस (२००८ पासून) : १ आठवडा रवांडा (२०१० पासून) : ४ दिवस
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट