Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

विटाळ देहांतरी वसतसे

$
0
0

'विटाळ देहांतरी वसतसे' असे सोयराबाई म्हणतात, तेव्हा त्या विटाळ शब्दाचा, म्हणजेच भाषेत ध्वनिचिन्हाला जोडलेला, प्राप्त झालेला जैविक अर्थ लक्षात घेतात. देह निर्मितीला, अपत्यजन्मास कारणीभूत होणारा विटाळ हा देहाचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे विटाळ या संकल्पनेची निश्चिती देहाच्या माध्यमातून होते. ध्वनिचिन्हांना प्राप्त होणारे सामाजिक, सांकेतिक चिन्हार्थ सोयराबाई व्यक्त करतात. हे त्यांच्या अभंगाचे खास वैशिष्ट्य आहे.

\Bप्रा. रूपाली शिंदे\B

सोयराबाईंनी रचलेल्या 'देहासि विटाळ म्हणती सकळ' या प्रसिद्ध अभंगाकडे वळण्यापूर्वी चोखोबांनी रचलेल्या अशाच एका अभंगाची चर्चा केली पाहिजे, असे वाटते. सोयराबाईंचे पती, भक्त गुरू, आदर्श आणि आत्मज चोखोबांचा उल्लेख त्या स्वत:ची नाममुद्रा रेखताना 'म्हणतसे महारी चोखियाची' असा करतात. सोयराबाईंना भक्त असण्याचा, मुक्त होण्याचा, सोसण्याचा, वेदनेतून नि:संग होण्याचा, आत्मानंदात रमण्याचा, विमुक्त होऊन अवघ्या चराचराशी आणि समाजाशी जोडून घेण्याचा आनंद चोखोबांच्या जगण्यातून दिसला. त्यांच्या सहजीवनातून तो जाणून घेण्याचा अनुभव प्राप्त झाला. त्यामुळे सोयराबाईंच्या भक्तीवर, जगण्यावर आणि अभंग रचनेवर चोखोबांचा प्रबाव असणे स्वाभाविक आहे; पण सोयराबाईंची भक्ती ही केवळ अनुकरण भक्ती नव्हती. त्यांची चोखोबांवरील भक्ती ही जीवनभक्ती होती. त्या चोखोबांच्या समानधर्मा होत्या; परंतु त्यांनी स्त्री असण्याची, भक्त असण्याची आणि सदेह मुक्त होण्याची शोधलेली वाट ही त्यांची स्वत:ची, स्वतंत्र आहे. या निष्कर्षाप्रत येण्याआधी चोखोबांचा अभंग पाहायला हवा.

कोण तो सोवळा कोण तो वोवळा।

दोन्हींच्या वेगळा विठ्ठल माझा।।

वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ।

पुराणे अमंगळ विटाळाची।।

जन्मतां विटाळ मरतां विटाळ।

चोखा म्हणे विटाळ आदि अंती।।

निचाचे संगती देवो विटाळला।

पाणी प्रक्षाळोनी सोवळा केला।।

कोण तो सोवळा कोण तो ओवळा।

विटाळाचे मूळ देहमूळ।।

चोखामेळा म्हणे मज वाटते नवल।

विटाळापरते आहे कोण।।

चोखामेळा सोवळे-ओवळेपणा या दोन्ही कल्पनांपेक्षा माझा विठ्ठल वेगळा आहे, असे म्हणतात. जन्म-मृत्यूशी जोडलेली सोयर-सुतकाची म्हणजे विटाळाची, अशुद्धतेची संकल्पना सर्व मनुष्यमात्रांना एकच आहे; म्हणून प्रत्येकाच्या जन्माशी आणि मृत्यूशी विटाळ असणे स्वाभाविक, अपरिहार्य आहे. असे आहे, तर मग कोण तो सोवळा, कोण तो ओवळा, हा प्रश्नच फिजूल, वायफळ आहे. सगळेच विटाळग्रस्त आहेत. वेद, शास्त्रे, पुराणे या साऱ्यांनाच विटाळाने ग्रासले आहे. विटाळाचे ग्रहण लागलेल्या वेद, शास्त्र, पुराणांना चोखोबा नाकारतात. पुढे देव विटाळतो, बाटतो कशामुळे, हे स्पष्ट करतात, 'निचाचे संगती देवो विटाळला.' चोखोबा विटाळाची संकल्पना गुणात्मक करतात. कोणते गुण भक्ताच्या अंगी असल्यामुळे देव भ्रष्ट होतो, हे चोखोबा स्पष्ट करतात. नीच गुणी व्यक्तीच्या सहवासात देव अपवित्र होतो, असे ते म्हणतात. अशा अपवित्र, अमंगळ झालेल्या देवाला अंघोळ घालून, पाणी शिंपून तो पुन्हा स्वच्छ, पवित्र करण्याचे कर्मकांड केले जाते. मुळात एका चुकीच्या, निरर्थक कल्पना, विचारांचे आचरण करताना, त्यातून दुसरी अर्थहीन कृती केली जाते. खरे म्हणजे विटाळ संकल्पनेचे मूळ देहनिष्ठ आहे. भक्ती मात्र मन, बुद्धी, विचार, जाणीवांशी जोडलेले संबंधित मानवी आचरण आहे. चोखोबा देहनिष्ठा आणि आत्मनिष्ठा यांचा परस्परांशी संबंध काय, या प्रश्नाचा उलगडा, उकल करत आहेत. बुद्धी आणि मनाचा विकास करणारी भक्ती ही मनोमय आहे. ती आत्म्याशी संवाद घडविणारी, आत्मशोध घेण्यास भाग पाडणारी कृती अथवा आचरण आहे. त्यामुळे देहनिष्ठेमध्ये गुंतून पडलेल्या विटाळाशी भक्तीचा कसलाच संबंध नाही, हा विचार चोखोबा मांडतात. विटाळ जर देहाला होत असेल, तर मानवी जन्म आणि मृत्यूशी जोडलेली विटाळाची संकल्पना मग सर्व जातिधर्मातील स्त्री-पुरुषांना विटाळ होणारच. त्या परते, वेगळे आहे तरी कोण, असा प्रश्न विचारून चोखोबा विटाळ संकल्पनेची चिकित्सा पूर्ण करतात.

आता सोयराबाई विटाळ या धर्म, समाजजीवन आणि स्त्री जीवनाला व्यापून उरलेल्या संकल्पनेचा शोध कसा घेतात ते पाहू,

देहासी विटाळ म्हणती सकळ।

आत्मा तो शुद्ध बुद्ध।।

देहीचा विटाळ देहीच जन्मला।

सोवळा तो झाला कवण वर्ण।।

विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान।

कोणी देह निर्माण नाही जगी।।

म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी।

विटाळ देहांतरी वसतसे।।

देहीचा विटाळ देहीच निर्धारी।

म्हणत महारी चोखीयाची।।

चोखियाच्या शिष्येने, सोयराबाईने चोखोबांनी मांडलेली देहसंबद्ध विटाळाची संकल्पना, त्यातील तर्कसुसंगत विचार फोड करून सांगितले आहेत. देहामधून निर्माण झालेली आणि देहामध्येच गुंतून पडलेली विटाळाची संकल्पना त्या स्पष्ट करतात. जेथे देह आहे, तेथे विटाळही असणारच; कारण देहाच्या निर्मितीमध्ये विटाळही सक्रीय सहभागी झालेला असतो, तर मग या विटाळातून कोणताचा वर्ण अलिप्त राहू शकत नाही.

ही सर्व चर्चा करताना विटाळ या शब्दाचा शब्दकोषातील अर्थ काय आहे, ते पाहणेही गरजेचे आहे. विटाळ या शब्दाचे कोषामध्ये दोष, अपवित्रता, अशुद्धता, अशुचिता, अपवित्र वस्तूच्या संसर्गाने होणारा दोष आणि अस्पृश्यसंसर्गजन्य दोष असे अर्थ दिलेले आहेत. याशिवाय विटाळ या शब्दाचा एक अर्थ स्त्रियांचा ऋतुस्राव, रज:स्राव असाही आहे. दैनंदिन व्यवहारात विटाळ-चंडाळ असा शब्द प्रचलित आहे. सोयराबाई 'विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।' असे म्हणतात, तेव्हा स्त्रीच्या मासिक धर्माचा गर्भधारणेशी असलेला संबंध त्या स्पष्ट करतात. सोयराबाई विटाळाची संकल्पना जीवशास्त्रीय असल्याचे स्पष्ट करतात. एका अर्थाने त्या विटाळ या संकल्पनेची जीवशास्त्रीय, भाषिक, सांस्कृतिक बाजूने चिकित्सा करीत आहेत. स्त्री देहाशी जोडलेली नैसर्गिक, जीवशास्त्रीय घटना धर्म-संस्कृतीच्या कक्षेत येते, तेव्हा तिला निषिद्धता, अपवित्रता हे अर्थ बहाल केले जातात. विटाळामधूनच नव्या देहाचा जन्म होतो. 'विटाळ देहांतरी वसतसे' असे सोयराबाई म्हणतात, तेव्हा त्या विटाळ शब्दाचा, म्हणजेच भाषेत ध्वनिचिन्हाला जोडलेला, प्राप्त झालेला जैविक अर्थ लक्षात घेतात. देह निर्मितीला, अपत्यजन्मास कारणीभूत होणारा विटाळ हा देहाचे आश्रयस्थान आहे. त्यामुळे विटाळ या संकल्पनेची निश्चिती देहाच्या माध्यमातून होते. विटाळ या संकल्पनेची खातरजमा करण्याचे साधन आणि माध्यम म्हणजे मानवी देह होय. सोयराबाईंनी अपत्यजन्माशी संबंधित असलेल्या विटाळाचा जैविक अर्थ सांगितला आहे. जैविक आणि शरीरनिष्ठ बदलाला धर्म-संस्कृतीचा संदर्भ प्राप्त झाल्यामुळे त्यातील जैविकता पूर्णपणे संपुष्टात येते. जैविकतेऐवजी दोष, अपवित्रता, अशुचिता हे नवे संकेत प्राप्त होतात. ध्वनिचिन्हांना प्राप्त होणारे सामाजिक, सांकेतिक चिन्हार्थ सोयराबाई व्यक्त करतात. हे त्यांच्या अभंगाचे खास वैशिष्ट्य आहे. सोयराबाई आणि चोखोबा यांची विटाळ संकल्पनेची चिकित्सा स्वतंत्र वाटेने होत असल्याचे दिसते. चोखोबा 'जन्मता विटाळ मरता विटाळ। चोखा म्हणे विटाळ आदि अंती।' अशी सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने चिकित्सा करतात. स्त्री असण्याशी जोडलेली, प्रजननाशी संबंधित जैविकता लक्षात घेऊन सोयराबाई प्राप्त होणारा सांस्कृतिक अर्थही लक्षात घेतात. हे त्यांचे वेगळेपण आहे. याची नोंद घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>