बालक पालक मुलांना खाण्याच्या चुकीच्या सवयी लागल्यास, त्यांना आयुष्यभर अनेक व्याधींना सामोरे जावे लागेल. सगळ्यांत महत्त्वाचे, मुलांना पौष्टिक अन्न द्या. केवळ मुलाचे पोट भरणे, हा उद्देश न ठेवता, त्याच्या पोटाची गरज चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे, हे पालक म्हणून कर्तव्यच आहे. खाऊ घालताना त्या त्या भाजीची किंवा पदार्थाची विशिष्ट चव आणि गुणधर्म आहे, हे सांगायला विसरू नका. मुलांच्या डब्यात 'चुझी आणि इझी फूड' देऊ नका. खाण्यात कोणताही शॉर्टकट नको, हे आधी मान्य करा. डॉ. प्राजक्ता कोळपकर नुकत्याच शाळा सुरू झाल्या आहेत. मुलांपेक्षा पालकांचाच उत्साह ओसंडून वाहत असेल. नवी शाळा, नवे दप्तर, नवे जोडे, नवे मोजे, नव्या वह्या-पुस्तके, नवा गणवेश, नवे डबे सगळेच नवे नवे. यात शाळेत जाणारी मुले अतिशय खूष असतील. पालक त्याहून खूष असतील, यात वादच नाही. जणू काही आपले मूल युद्धावर चालले आहे, असाच साऱ्यांचा आविर्भाव असतो. पहिल्या दिवशी गणवेश घालून हा छोटा शिपाई बाहेर आला, की एखाद्या सेलिब्रेटीसारखा त्याचा थाट. प्रत्येक कोनातून त्याची ढीगभर छायाचित्रे काढली जातात. नंतर आई-बाबांपासून दोन्हीकडील आजी-आजोबा शाळेत हजेरी लावतात. एखादी सीमारेषा पार केल्याप्रमाणे हे छोटे वीर शाळेच्या आवारात पाहिले पाऊल टाकतात, की दोन्ही आज्ज्या डोळ्याला नकळत पदर लावतात. तेथील बाईंना दोन शहाणपणाचे बोल सांगतात, 'नीट बघा हं माझ्या लेकराला.' असा सगळा सोहळा काहीच दिवसांपूर्वीच साजरा झाला असेल आणि त्याच्या आख्यायिका अजूनही, म्हणजे आठवडा झाला, तरी चर्चिल्या जात असतील. हे झाले शाळेचे. त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचे नावीन्य; पण एकूणच मूल जन्माला आल्यापासून हल्ली असे कौतुक सोहळे पाहायला आणि ऐकायला मिळतात. आज्जी आणि आजोबांच्या तोंडी 'माझा नातू अगदी हुशार आहे. त्याला सगळे समजते. मोबाइलमधले तर आपल्यापेक्षा जास्त समजते त्याला. बाकी काही कळत नसले, तरी टीव्हीचे सगळे चॅनेल बरोबर समजतात. स्वच्छतेचा तर भोक्ता आहे. जरा पायाला माती लागलेली सहन होत नाही. जरा कपडे ओले झाले, की पटकन बदलून मागतो; पण खातच नाही. पिझ्झा, बर्गर, मॅगी खूप आवडीने खातो; पण भाजी-पोळी खायचाच कंटाळा.' अशी काही वाक्ये सहज असतात. हा सूर अगदी नेहमीचा आहे. आयांचे म्हणणे आहे, की आमची मुले वयापेक्षा फार स्मार्ट आहेत. खातच नाहीत, हाच एक वाईट भाग आहे. त्याचे पोट भरावे म्हणून आम्हाला बाहेरून काही मागवावे लागते. तो उपाशीच राहिला आहे, ही भावना खूप त्रासदायक असते. संपदा आता नऊ वर्षांची आहे. तिची शाळा सकाळी दहा ते चार अशी असते. शाळा दूर असल्याने ती नऊ वाजता निघते आणि पाच वाजता घरी पोहोचते. तिची आई तिला रोज सहा डबे देते. सगळे डबे घरी केलेले असतात. तिच्या आईने भल्या पहाटे, 'कोणती भाजी देऊ,' असे विचारले, तर ती उत्तर देते, भरलेले कारले, नाहीतर शेपू, नाहीतर पडवळ किंवा काहीही. आई तिला भरले कारले करून देते. तिच्यामुळे वर्गातील इतर मुलांना कारले खाण्याची सवय लागली आहे. सगळ्या भाज्या न खाणारी ही मुले सगळ्याच भाज्या खायला लागली. संपदाची सहा डब्यांची कथा सगळ्या शाळेत माहिती आहे. शाळेतील शिक्षकही अवाक होतात रोज तिचे सहा डबे बघून. शेवटी पेरेंट्स मीटिंगमध्ये संपदाच्या आईला या सहा डब्यांचे गुपित विचारण्यात आले. सहा डबे कसे आणि काय काय करतेस? ती सहा डबे कसे संपवते? हे प्रश्न विचारल्यावर संपदाची आई निरुत्तर झाली; कारण तिच्यासाठी ही घटना खूप मोठी होती नव्हतीच. संपदासाठी तिने जन्मापासून काय काय केले हे सांगितले. संपदाची आई म्हणाली, 'संपदा सव्वा महिन्याची असल्यापासून तिला गुटी दिली; पण घरी तयार केलेली. तिच्यासमोर कधीच गुटी बेचव असते, कडू असते, असे कुठलेही नकारार्थी शब्द वापरले नाहीत. सहा महिन्यांची ती बसायला लागल्यापासून कायम बसूनच गुटी पाजली. पाणी पिण्यासाठी सिपर नावाचे भांडे आमच्या घरात आले नाही. वाटी चमच्याने दूध पाजले. त्यासाठी बाटली वापरली नाही. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, मी कधीच तिच्यासाठी डायपर वापरले नाहीत. तिच्या खाण्याच्या वेळा पाळल्या. ती दोन वर्षांची होईपर्यंत मी बाहेरचे, म्हणजे हॉटेलचे काहीच दिले नाही. त्यासाठी मी खाल्ले नाही. रोज वेगवेगळ्या प्रकारचे सूप, भाज्या, वेगळे प्रकार, वेगळी चव तिला देत गेले. टीव्हीसमोर बसून जेवणे मला मान्य नसल्यामुळे मी तिला आतल्या खोलीत घेऊन जायचे. त्यावरून घरच्यांकडून बोलूनही घेतले. मी तिला अनेक शूरकथा सांगता सांगता खाऊ घालायचे. आता संपदा मोठी झाली असली, तरी तिच्या डब्यातील नाना प्रकार मी घरीच करते; त्यामुळे तिला खाण्याची गोडी लागली. संपदा काही खात नाही या सबबीखाली जेवण्यासाठी बाहेरून काही मागवणे करणे वगैरे आम्हाला माहीतच नाही. तिच्या सगळ्या चवी इतक्या छान विकसित झाल्या आहेत, की बाहेर गेल्यावर तिला खायला काय द्यावे, हा प्रश्नच आम्हाला पडत नाही.' हे सगळे ती ओघाने सांगत होती. हे करताना काही विशेष योजून केले होते, असेही तिला मान्य नव्हते. एक गोष्ट तिने मला आवर्जून सांगितली, की संपदा पोटात असताना तिनेही सगळे पदार्थ चवीने आणि घरी करून खाल्ले होते. गर्भारपणात चांगले वाचा, चांगले पाहा असे म्हटले जाते. त्याबरोबर चांगले अन्न खा, हेदेखील रुजविणे गरजेचे आहे, असेही तिने सांगितले. संपदाच्या आईचे आणखी एक सहज; पण मार्मिक सांगणे होते, 'आमच्या घरात आम्ही अन्नाला नावे ठेवत नाही. एखाद्याची नावडती भाजी असली, तरी ती मला आवडत नाही, असे म्हटले जात नाही. ताटात अन्न टाकायचे नाही, हा आमच्या घरचा नियम आहे. जेवताना टीव्हीने बोलू नये, तर घरातल्यांनी बोलावे, याचा आग्रह आहे.' संपदाच्या आईने सहज, साध्या आणि सोप्या भाषेत अगदी मोठा विषय हाताळला होता. हे कदाचित तिच्याही लक्षात आले नसावे. आयांनो, संपदाच्या आईने जे केले, ते लाख मोलाचे होते आणि तेच करायला हवे. मग चुकते कुठे? हल्ली सगळ्याच आयांची, मुलांच्या खाण्याविषयीची ओरड का असते? मुलांना भूक लागत नाही असेही म्हणणे असते. हा आयांच्या चर्चेचा विषय असतो आणि यावर काय उपाय करावा हे विचारण्यासाठी फेसबुकचा सहारा घेणाऱ्या बऱ्याच आया बघितल्या आहे. त्यावर येणाऱ्या कमेंट्सविषयी बोलायला नको. आयांनो, एक साधे समीकरण लक्षात घ्या, मूल जेवत नाही म्हणून सतत काहीतरी रेडिमेड खाऊ घालण्यापेक्षा त्याला कडकडून भूक लागू द्या आणि मगच खाऊ घाला. मोठ्यांचे पोटही आपल्या मुठीएवढेच आहे; त्यामुळे उगाच आवडते म्हणून भरमसाठ घेण्याची आणि खाण्याची आपली प्रथा आहे, तीच चुकीची आहे. शिवाय ताटात अन्न टाकू नये हे अगदी जन्मल्यापासून बिंबवणे गरजेचे आहे. त्यासाठी पालक म्हणून मोठ्यांच्या कृतीची गरज आहे. हॉटेल किंवा लग्न समारंभात जाताना ताटात लागेल तेवडेच अन्न वाढून घ्या. त्या भाज्यांची किंवा पदार्थांची मुलांना माहिती द्या. त्या पदार्थांचे गुणधर्म सांगा. आपल्याबरोबर त्याला खाऊ घाला आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे ताटात अन्न टाकू नका. मुलांना ही सवय लागू शकते, हे विसरता कामा नये. अशा छोट्या छोट्या कृतींतून मुलांच्या मनावर खाण्याचे चांगले संस्कार होतात, हे सिद्ध झाले आहे. प्रियाची आई म्हणाली, 'प्रिया सगळे पदार्थ खाते. तिचे पदार्थ मी कमी तिखटाचे करते. मिठ वापरते.' हे आई जितके अभिमानाने सांगत होती, तितकी ही बाब अभिमानास्पद नव्हती; कारण बारा वर्षांच्या मुलीने असे खावे, हे मान्यच नाही. तीच प्रिया आता कॉलेजला आहे. आजही वरण पोळी खाण्यातच तिला आणि तिच्या आईला धन्यता वाटते. मुलांना सगळे पदार्थ सगळ्यांप्रमाणे खायला सांगा. खूप तिखट झाले असल्यास तुमच्या मुलाला ते सांगू द्या. तुम्हीच सांगून आपण मुलाचे फारच हित बघतो, असा अविर्भाव अजिबात आणू नका. तिखट झाले, खारट झाले, हे त्यांना अनुभव घेऊन ठरवू द्या. त्याचीही अनुभूती घेऊ द्या. त्याचाही वेगळा आनंद त्यांना लाभू द्या. साधे उदाहरण घेऊ, पोहे खायला दिल्यावर सहा वर्षांच्या मुलाने त्यातील मिरच्या स्वतःच्या हाताने काढणे अपेक्षित आहे. चुकून मिरच्या खाल्ल्या गेल्या तर, असे आपणच म्हणतो. जाऊ द्या ना पोटात. त्या मिरचीची, त्या लसणाची, आल्याची, शिवाय चिंच, आवळा यांचीही चव त्यांना अनुभवू द्या. आयांनो, हे सारे सांगण्याचे कारण असे, की आज मुलांना खाण्याच्या चुकीच्या सवयी लागल्यास, त्यांना आयुष्यभर अनेक व्याधींना सामोरे जावे लागेल. सगळ्यांत महत्त्वाचे, मुलांना पौष्टिक अन्न द्या. सतत बिस्किटांचा मारा किंवा चॉकलेट खाणे, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ अशा अतिशय चुकीच्या सवयीचे समर्थन नसावे. केवळ मुलाचे पोट भरणे, हा उद्देश न ठेवता, त्याच्या पोटाची गरज चांगल्या पद्धतीने पूर्ण करणे, हे पालक म्हणून कर्तव्यच आहे. खाऊ घालताना त्या त्या भाजीची किंवा पदार्थाची विशिष्ट चव आणि गुणधर्म आहे, हे सांगायला विसरू नका. खाण्याचा खूप बाऊ न करता सहज, सोप्या पद्धतीने खाण्याची आवड लावा. त्यासाठी मुलांच्या डब्यात 'चुझी आणि इझी फूड' देऊ नका. खाण्यात कोणताही शॉर्टकट नको, हे आधी मान्य करा. पालकांनो, जेवताना तुम्ही मस्त मिटक्या मारत खा आणि इतरांनाही सांगा. जेवणाचा आस्वाद घेणे शिकवा. आपले आयुष्य आणि आयुष्यातील आनंद वाढवा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट