अॅड. जाई वैद्य प्रश्न : आम्ही पती-पत्नी निवृत्त शिक्षक (वय वर्षे अनुक्रमे ७० व ६५) असून मध्यमवर्गीय आहोत. सन २००८मधे माझ्या मोठ्या मुलाने प्रेमविवाह केला. दोघेही उच्चशिक्षित (एमबीए) आहेत. लग्नानंतर दोघांनी सुरुवातीच्या काळात मुंबईत नोकरी केली. लग्नानंतर एक वर्षात त्यांना स्वतंत्र घर घेऊन दिले. सुरुवातीचे ११ लाख रुपये आम्ही उभयतांनी व ३२ लाख त्यांनी कर्ज घेऊन घर घेतले. सून मुलगी असते या भ्रमात आम्ही होतो. मी स्वतः एल.आय.सी. एजंट असल्याने, तिला १० लाखाच्या विमा पॉलिसी घेऊन दिल्या व त्याचे प्रीमिअम भरत होतो. सन २००८ पासून २०१५पर्यंत मी पैसे भरले. २०१६पासून तिने स्वतःचा वेगळा संसार थाटला. दरम्यानच्या काळात २०१३ डिसेंबरमधे त्यांना मुलगा झाला. मुलाने फॅमिली कोर्टात केस केली व २०१८मधे परस्पर संमतीने त्यांचा घटस्फोट झाला. न्यायाधीशांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांचा मुलगा आमच्याकडे पंधरा दिवसांतून एकदा येतो. झाले ते अतिशय वाईट झाले. त्या लहानग्या जिवाची उगाच फरफट होते आहे. मुख्य प्रश्न आमच्याशी संबंधित आहे. कोर्टाने निर्णय देताना मुलीचे स्त्रीधन मुलीकडे (म्हणजे मुलीच्या आई-वडिलांनी दिलेले दागिने) राहील असा आदेश दिला आहे. स्त्रीधनात आम्ही, म्हणजे मुलाच्या आई-वडिलांनी दिलेले दागिने, (मंगळसूत्र ६५ ग्रॅम, नेकलेस ४० ग्रॅम, हातातील बांगड्या ४० ग्रॅम, कानातील १० ग्रॅम, नथ ५ ग्रॅम असे एकूण सोने १६० ग्रॅम. नातू झाल्यावर तिच्यासाठी ३० ग्रॅमचा सोन्याचा हार आणि नातवासाठी २५ ग्रॅमची सोन्याची चेन) हे सर्व आम्ही उभयतांच्या पैशांनी करून दिले. शिवाय नातवाच्या बारशाला आलेले सोने, अंदाजे ६० ग्रॅम, चांदीच्या अनेक वस्तू, रोख रक्कम ३०,०००पेक्षा जास्त तिच्या आईने व मावशीने संगनमताने पळवून नेले. मी भरलेल्या एल.आय.सी.ची प्रीमियम रक्कम (२०१५पर्यंत) ४,४६,७०४ रुपये व त्यावरील व्याज ५,२६,९४४ रुपये असे एकूण ९३,७३,६४९ रुपये आता आम्ही कोणाकडे मागावे? मला आपणास एवढेच विचारायचे आहे, की हे आमचे पैसे कोण भरून देईल? आम्ही उभयता निवृत्त असून, आमचे उत्पन्न प्रत्येकी २०,००० रुपये एवढे आहे. कायदा स्त्रियांच्या बाजूने झुकत असला, तरी उतार वयातील वाढणारे खर्च व महागाई यांचा मेळ कसा बसवावा? आम्ही काय केले म्हणजे आम्हाला आमचे पैसे परत मिळतील, याचे मार्गदर्शन करावे. - दोन ज्येष्ठ नागरिक उत्तर : सर्वप्रथम, तुमचा मुलगा सज्ञान, उच्चशिक्षित, स्वयंपूर्ण आहे; त्यामुळे त्याची पत्नी, त्याचे लग्न आणि संसार, त्याचा घटस्फोट या सर्वांची काळजी घेण्यास तो समर्थ आहे. घटस्फोट घ्यायचा की लग्न टिकवायचे, मूल कोणाकडे असावे, मुलाची भेट कधी घ्यावी, घटस्फोट घेताना अटी काय असाव्यात, त्याचा आपल्या व आपल्याशी निगडित लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, असा सारासार विचार करूनच त्याने घटस्फोटाचा निर्णय घेतला असेल. आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केले आहे याची आणि त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत याचीही तुमच्या मुलाला उत्तम जाणीव निश्चित असेल. त्यामुळे तुमच्या मुलाने आणि सुनेने परस्पर संमतीने घटस्फोट घेतला, या घटितातच सारे काही आले. दुसरा मुद्दा असा आहे, की न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोटाचा निर्णय पती-पत्नीने सहमतीने ठरविलेल्या अटींप्रमाणे दिला जातो. म्हणजेच तुमच्या सुनेला घटस्फोटाच्या बदल्यात जे काही मिळाले, ते तुमच्या मुलाच्या सहमतीने. यामध्ये कायदा स्त्रियांच्या बाजूने झुकण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, तरीही कायद्यानुसार, सुनेला लग्नात मिळालेले तिचे स्त्रीधन, मुलाचा ताबा व जबाबदारी तिने घेतली असल्याने त्याला भेट मिळालेल्या वस्तू तिच्याकडे असण्यात काही बेकायदेशीर निश्चित नाही; त्यामुळे याविषयी तक्रार करण्याचा प्रश्न येत नाही. तुमच्या मुलाच्या व सुनेच्या परस्परसंमतीच्या घटस्फोटाच्या दाव्यात तुम्हाला सहअर्जदार होता येत नाही. राहिला विषय, मुलाच्या लग्नानंतर त्यांना वेगळा संसार थाटून देण्यास तुम्ही मदत केलीत, सुनेला मुलीप्रमाणे मानून तिच्या भविष्याचीही काळजी घेतलीत, या सर्व तुमच्या जमेच्या बाजू आहेत. तुम्ही तुमच्या सुनेच्या एल.आय.सी. पॉलिसीसाठी भरलेले पैसे, ही तिला त्या वेळी प्रेमाने दिलेली भेटच मानायला हवी. त्यावेळी घर घेण्यासाठी दिलेली रक्कम, दागिने स्वरूपातील वा अन्य गोष्टी तुम्ही त्यांना कर्जाऊ किंवा परत करण्याच्या बोलीवर दिल्या होत्या का? मग त्या परत कशा मागणार? निवृत्तीनंतरचे उत्पन्न तुमच्या खर्चास उत्पन्न पुरत नसेल, तर तुम्हाला मुलाकडे वाढीव खर्च मागता येईल. कायद्याने वयोवृद्ध आई-वडिलांची जबाबदारी मुलावर असते. स्थावरजंगम मालमत्तेचा दावा करायचा असल्यास, त्याचे स्वरूप लक्षात घेऊन तुम्हाला तो तुमच्या मुलाविरुद्ध वा सुनेविरुद्ध दिवाणी न्यायालयात वैयक्तिक दाखल करता येईल. याव्यतिरिक्त काही माहिती आपल्याकडे असल्यास, त्या आधारे कायद्यात उत्तरे आहेत का, ते पाहता येईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट