Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

बिनधास्त गर्ल्स

$
0
0

हर्षाली घुले

नुकतेच आम्हा सर्वांचे पदव्युत्तर शिक्षण संपले. म्हणजे सेट-नेटच्या परीक्षेनंतर आता सगळ्यांना घरी जायची वेळ आली. अनेकींना तर वसतिगृह सोडवतच नव्हते. विद्यापीठाच्या निसर्गरम्य वातावरणात घालवलेले दिवस, आपल्यात घडलेले परिवर्तन त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होते. कुणी ग्रामीण-शेतकरी, कुणी निमशहरी, कुणी छोट्या शहरातून विद्यापीठात आल्या होत्या. प्रत्येकीची कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती वेगळी असली, तरीही त्यांच्यात एक साम्य होते, ते म्हणजे त्या आता जगाकडे आणि स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघत होत्या.

मागील दोन वर्षांनी आपल्याला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकीसाठी वेगळे होते. 'मी घरी असते तर आतापर्यंत लग्न झाले असते,' असे एक मैत्रीण म्हणाली. दुसरी म्हणाली, 'येथे येण्या आधी मी खूप चौकटीतील होते. माझे विचार संकुचित होते. अगदी स्वतःबद्दलदेखील मी मर्यादा राखून होते. येथील प्राध्यापक, मैत्रिणी यांकडे बघून आता केवळ विचारच बदलले नाहीत, तर माझे स्वप्न तयार झाले. प्रवास चालू होता; पण अंतिम ध्येय ठाऊक नव्हते. म्हणजे शिक्षण आणि मिळाली तर नोकरी किंवा लग्न असेच ठरले होते. आता मात्र भूमिका तयार झाली आहे.' असा विचार करणाऱ्या, स्वतःचे आजवरचे कौटुंबिक समाजिकीकरण सोडून नव्या अनुभवातून सारासार विचार करणाऱ्या, माझ्या अनेक मैत्रिणी आता बदलल्या आहेत. हा बदल एक प्रवासातून आलेल्या अनुभवातून आला आहे. त्यांच्या अंगी आता तगण्याची क्षमता आली आहे. जगण्याच्या विविध कल्पना त्यांनी निर्माण केल्या आहेत.

आज अनेक मोठ्या शहरांमध्ये शिक्षण किंवा नोकरी यांसाठी आलेल्या मुलींचे प्रमाण खूप जास्त आहे. यातील अनेकजणी ग्रामीण, निमशहरी आणि छोट्या शहरांतून आलेल्या असतात. हे शहर त्यांना नवीन असते. येथील अनेक नवीन गोष्टी त्या बघतात, शिकतात, समजून घेतात. त्यांना हे शहर नवीन असले, तरीही येथे आत्मविश्वासाने टिकून राहण्यात त्या यशस्वी होतात. अनेक मुली ग्रामीण भागातून आलेल्या असतात. त्यातील अनेकींना येथे येण्यापूर्वी अगदी बंधनात जगण्याची सवय झालेली असते. कॉलेज ते घर हेच त्यांचे विश्व असते. बाहेर एकटे पडता येत नाही. गावात फिरण्याची सोय नसते. अशा वातावरणातून एकदम शहरात आलेल्या या हुशार मुली महत्त्वाकांक्षी नक्कीच असतात. या शहराने मला काय शिकवले, हा प्रश्न त्या स्वतःला सतत विचारत असतात. मी शनिवार, रविवारी रानात -मळ्यात काम करायला जायचे, आधी महाविद्यालयात जाताना सगळा स्वयंपाक करून जायचे, असे म्हणणाऱ्या या मुली आता खरेदी, चित्रपट, सहली यांसारख्या गोष्टींमध्ये रुळत आहेत. अभ्यासातील त्यांची धडपडही चांगलीच सुरू असते.

आजकाल मुली फार स्मार्ट झाल्या आहेत, असे एक मत आपण सर्वत्र ऐकतो. स्मार्ट म्हणण्यापेक्षाही त्या बिनधास्त झाल्या आहेत, असे म्हणायला हवे; कारण त्यांना मुलीसारखे वाग असे सांगणारे अनेकजण असतात. माझी सोज्ज्वळ प्रतिमा टिकवून ठेवण्यात मला आता रस नाही, असे म्हणत त्या प्रतिमेला तडा जाईल असे वागतात. मुलींनी कुठल्या विषयावर मते मांडावी असे विचारल्यास त्या सगळ्यांच विषयांवर मते मांडतात. पॉर्न, हिरो, क्रश, लव्ह, सेक्स, लाइफ अशा सर्व विषयांवर त्या व्यक्त होत आहेत. विविध विषयांवरील आपला दृष्टिकोन त्या अगदी मोकळेपणाने लोकांसमोर मांडत असतात. त्यामागील तर्क हा त्यांचा असतो. अनुभव त्यांचा असतो. त्या घाबरत नाहीत. जुन्या चौकटी मोडून अनेक नव्या बाबी त्या रुजवत जातात. सुरुवातीला अगदी व्यक्त न होणाऱ्या मुली होत्या. मला अमुक मुलगा आवडतो किंवा तो किती हँडसम आहे, माझा क्रश आहे, हे सांगतानाही बिचकणाऱ्या मुली आता मात्र भीड न ठेवता आपले खासगी आयुष्य उलगडू बघत आहेत. त्या प्रत्येकीची आवड-निवड निर्माण झाली आहे. त्या अनेक पर्याय शोधत आहेत. मला हे हवे आहे आणि हे नको आहे, असे घरच्यांना सांगण्याइतपत त्यांच्यात सामर्थ्य आले आहे. पुरुषसत्ताक पद्धती अनुभवलेली एक मैत्रीण आपल्या आईकडे बघताना हळहळत होती. आपल्या आईने आजवर काय व कसे सहन केले, हे तिला आता समजते आहे. म्हणून आपण आता केवळ मुलगी नाही, तर एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून निवडीचा अधिकार मागणार आहोत, हे ती अभिमानाने सांगताना दिसते आहे.

गेल्या आठवड्यात आम्ही मैत्रिणी 'कबीर सिंग' बघायला गेलो होतो. तिथे आलेल्या अनेक जणी आमच्या सारख्याच ग्रुपने आल्या होत्या. आजूबाजूला मुलींची संख्या जास्त दिसत होती. शाहीदच्या एंट्रीला अनेकींनी आरडाओरडा करून प्रतिसाद दिला. मुलींमधील हा ओसंडून वाहणारा प्रतिसाद अगदी खळखळणाऱ्या पाण्यासारखा होता. त्या उन्मुक्त, बेधुंदपणे चित्रपटाचा आनंद घेत होत्या.

'बिनधास्त' नावाचा एक मराठी चित्रपट होता. या चित्रपटात गौतमी गाडगीळ आणि शर्वरी जमेनिस यांनी दोघींनी महाविद्यालयीन मुलींची भूमिका साकारली होती. अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर, अंगात ऊर्जा असताना मनसोक्त वावरणाऱ्या दोन मुलींची कथा बघताना हा चित्रपट रंजक वाटतो. अशा अनेकजणी आज माझ्यासह आजूबाजूला बघायला मिळतात. ज्या स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू पाहत आहेत, धडपडत आहेत, शिकत आहेत, अनुभवत आहे आणि स्वतःला उभे करत आहेत. नव्या प्रवासासाठी निघालेल्या अशा सर्व जणींना शुभेच्छा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>