अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं 'कजरा रे' हे गाणं आठवतं? आता त्याच गाण्यातील त्या तिघांचं बहारदार नृत्य डोळ्यासमोर आणून ते आमची माती, आमची माणसं या गाण्यावर ताल धरत आहेत, अशी कल्पना करा. आलं ना खदखदून हसायला? अशाच प्रकारचे मिम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. एखाद्या गाण्याचा व्हिडीओ वापरून त्याला भलत्याच गाण्याचे बोल लावून व्हिडीओ मिम्स बनवले जात आहेत. असे हे भन्नाट मिम्स 'बाबा मिमवाले' या पेजवरून व्हायरल होत आहेत. असे अफलातून व्हिडीओ मिम्स बनवण्यात सनत लडकत या मराठमोळ्या तरुणाचा हात आहे. खळखळून हसायला भाग पाडणारे व्हिडीओ मिम्स आईमुळे सुचत असल्याचं तो सांगतो.
सनत हा पुण्यातील एक आर्किटेक्ट आहे. वाढलेली दाढी आणि केस यामुळे सनतचे मित्र त्याला 'बाबाजी' बोलायचे आणि याचमुळे त्याने त्याच्या पेजचं नाव 'बाबा मिमवाले' असं ठेवलं. हे पेज त्यानं नोव्हेंबरमध्ये २०१७ साली सुरू केलं असून या पेजचे इन्स्टाग्रामवर ४३५९ फॉलोअर आहेत तर फेसबुकवरील पेजला ३०,००० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हे मिम्स बनवणाऱ्या सनतला यामधून काहीच आर्थिक फायदा मिळत नाही. केवळ लोकांचं मनोरंजन व्हावं म्हणून हे पेज सुरु केल्याचं तो सांगतो.
व्हिडिओ- ऑडिओ
खलीबली- ललाटी भंडार
अगं अगं म्हशे- चोगाडा तारा
घुमर- कळत नकळत घडते
अगं अगं म्हशे- टूणूक टूणूक
शावा शावा- धोंड्या धोंड्या पाणी दे रे
कजरा रे- आमची माती, आमची माणसं
मल्हारी- पोरी येरा केला
मैं बढिया- केसा वर फुगे
आँख मारे- कुणी तरी येणार गं
अखिंयो से गोली मारे- बया का नाम
लोकांनी खळखून हसावं आणि त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून मी हे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. पुढे जाऊन ते एवढे व्हायरल होतील याचा मी विचारच केला नव्हता. या मिम्समधून मला काही आर्थिक फायदा होत नसला तरी माझं पेज लोकप्रिय होत आहे आणि लोकं हसतायत याचं समाधान मला जास्त आहे. जगभरातून या पेजला प्रतिसाद मिळत आहे. यात सातत्यानं वाढ कशी होईल, यासाठी मी प्रयत्न करतोय.
- सनत लडकत
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट