'यार, आज फिरायला जायचंय', 'अरे, टेन्शन नको घेऊस, रविवार आहे ना. आज पूर्ण ट्रेन रिकामी असेल' असे संवाद तुम्ही अनेकदा ऐकले असतील. कारण रविवार हा प्रत्येकाच्या आवडीचा वार! असा हा आपला हक्काचा वार जवळ येऊ लागला की, प्रत्येकामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. आठवडाभर केलेली दगदग, अभ्यासाचा ताण, कामाचं टेन्शन यामुळे कितीही तणाव असला, तरी 'आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रविवार लवकर यायला हवा' असं म्हणत सर्वचजण रविवारची मनापासून वाट पहात असतात. रविवार हा सगळ्यांना आपलासा वाटतो. अगदी बालवाडीत असलेल्या लहानमुलापासून ते कॉलेजचे विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण रविवारची वाट बघत असतो. रविवार यायला कितीही वेळ असला तरी शनिवारपासूनच 'काय भाऊ, रविवारचा काय प्लॅन आहे' असा जागतिक प्रश्न एकमेकांना विचारत शनिवारपासूनच रविवारचा फिल घ्यायला लागतात. शनिवारची संपूर्ण रात्र रविवारी काय-काय करायचं याचा प्लॅन करण्यात जाते. काहीजण शनिवारी रात्री 'उद्या तर रविवारच आहे' असं म्हणत रात्री उशीरापर्यंत आरामात मजामस्ती करतात आणि शनिवारपासूनच मिशन संडेला सुरुवात करतात.
अखेर मनापासून वाट पाहिलेला आणि सर्वांसाठीच फन डे असलेला संडे उजाडतो. रविवार कसा उजाडतो हे बऱ्याच जणांना माहिती नसतं, कारण रविवारी अनेक जणांची सकाळ ही दुपारी होते. रविवार उजाडल्यानंतर अनेक जणांनी आधीच ठरवून ठेवलेल्या प्लॅन्सना सुरुवात होते. काहीजणांना यावेळी एखादी वेब सीरिज किंवा मालिका बघून संपवायची असते तर काहीजणांचा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर चित्रपट बघण्याचा प्लॅन ठरलेला असतो. एखाद्या ग्रुपमध्ये सगळे खवय्ये असतील तर तो ग्रुप एकत्र मिळून कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचं ठरवतो. झोप प्रिय असणाऱ्याचं रविवारी सकाळी उशिरा उठून दुपारचं जेवण झालं, की परत संध्याकाळपर्यंत ताणून द्यायचं, असं ठरलेलं असतं. बऱ्याच जणांच्या घरी रविवारी पोळी-भाजी या नेहमीच्या मेन्यूला बाय-बाय करून पावभाजी, मसाला डोसा किंवा पिझ्झा यासारखे चमचमीत पदार्थ केले जातात.
बऱ्याचजणांचा रविवार दुपारी सुरु होत असला तरी ट्रेकर्स किंवा निसर्ग सान्निध्यात रमणारे रविवारी सकाळी लवकर उठून एखाद्या मस्त ठिकाणी भटकंती करून रविवारचा पुरेपूर आनंद लुटतात. अशा वेळी अचानक पाऊस आला तर या रविवारच्या ट्रीप किंवा ट्रेकला चार चांद लागतात. 'रोज मिलने में और कभी कबार मिलने में फरक होता है' असं म्हणणाऱ्या दोस्तांना भेटण्यात काही जणांचा रविवार साजरा होतो. 'काय राव, तुम्ही मोठी माणसं, किती दिवसांनी भेटलात' अशी प्रेमळ तक्रार करून शेवटी कधी तरीच भेटणाऱ्या मित्रांसोबत साजरा केलेला हा रविवार नेहमीच लक्षात राहतो. बऱ्याच जणांसाठी रविवार हा मजा-मस्तीचा दिवस असला तरी काहीजणांचे क्लासेस असतात. पण 'क्लास असला तर काय झालं, रविवार तर एन्जॉय करणारच' असं म्हणत क्लास झाला की, हे विद्यार्थी छोटे-मोठे फिरण्याचे प्लॅन्स किंवा मस्त झोप काढून रविवार एन्जॉय करताना दिसतात. 'भाई, ही रविवारची सुट्टी मजेसाठी नाही, अभ्यासासाठी आहे' असं म्हणत हे क्षणिक अभ्यासू पुस्तक घेऊ बसतात, पण अवघ्या काही मिनिटातच हातातलं पुस्तक बाजूला होतं. 'वैसे तो स्टड हू मै, एक दिन में पढ लुंगा' असं म्हणत हे क्षणिक अभ्यासू देखील रविवारची मजा लुटायला लागतात. तर काही विद्यार्थी पूर्ण न झालेल्या असाइनमेंट्स पटापट संपवून रविवारच्या मजेसाठी तयार होतात.
काही जण रविवारी 'आज कुछ तुफानी करते है' असं म्हणत आठवडाभर आलेले गुड मॉर्निंग, गुड नाइट आणि रविवारच्या दिवशी आलेल्या 'हॅपी संडे' यांसारख्या फोटोज, विविध व्हिडीओजनी भरलेली गॅलरी, विविध फाइल्स डिलीट करून फोनचं स्टोअरेज क्लिअर करण्याचा विडा उचलतात. अखेर रविवारी रात्री दिवसभर मजामस्ती करून घरी आलं की, उद्या सोमवार येणार आणि रुटीन सुरु होणार अशी कंटाळवाणी फिलिंग यायला लागते. संडे संपायच्या आधीपासून येणाऱ्या मंडे च्या फिलिंगला बरेचजण गमतीनं 'स्मंडे' असंही म्हणतात. शेवटी बऱ्याच दिवसांपासून वाट पाहात असलेला रविवार संपतो आणि दिनक्रम सुरु होतो, पण रविवारी केलेली धमाल मस्ती पूर्ण आठवड्याची दगदग सहन करण्याची ताकद देते. सोमवारपासूनच पुढचा रविवार कधी येईल याच्याकडे अनेकांचे डोळे लागतात, कारण 'एक संडे केलेली मस्ती भी बहोत बडी चीज होती है बाबू!'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट