अफगाणिस्तानातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या जमिला अफगाणी आज शांततेच्या दूत बनल्या आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचा त्यांचा मंत्र आहे. त्यांच्याविषयी... सुनीता लोहोकरे आपण आपल्यातून बाहेर पडून दुसऱ्याचा विचार कधी करतो? त्यातून विचार केलाच, तर आपल्या प्रियजनांचाच; पण जे संपूर्ण समाजाचा विचार करतात, ते देशाच्या सीमा ओलांडून अन्य देशांमधील समाजापर्यंत जाऊन पोहोचतात आणि त्यांचेही प्रेरणास्थान बनतात. अफगाणिस्तानच्या जमिला अफगाणी या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या कोणत्याही देशांतील स्त्रियांचे प्रेरणास्थान ठरावे. जमिला यांचे काही व्हिडिओ यू ट्यूबवर पाहायला मिळाले आणि त्यांच्या शांत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याविषयीचे कुतूहल वाढले. 'इस्लाममध्ये शिक्षणाचे खूप महत्त्व आहे. सध्या आम्हाला शाळेत जायची परवानगी नाही; पण पवित्र प्रेषिताने आम्हाला संदेश दिला आहे, की ज्ञान मिळवायला अगदी चीनमध्येही जा,' असे एका व्हिडिओत त्या सांगतात. त्या अफगाणिस्तानमधील स्त्रियांच्या चळवळीतील अग्रणी आहेत, तशाच आता त्या शांततेच्या दूत बनल्या आहेत. अलीकडेच अफगाणिस्तानचे नेते आणि तालिबान्यांसमोर शांततेसाठी साकडे घालण्याची दोहा येथे तयारी करीत असतानाच, त्यांच्या शहारात गझनी येथे तालिबान्यांनी केलेल्या स्फोटात किमान आठ ठार आणि १८० जण जखमी झाल्याचे वृत्त आले. जखमींमध्ये त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश होता. अल जझिराला दिलेल्या मुलाखतीत त्या या घटनेमुळे धक्का बसल्याचे म्हणाल्या. एकीकडे शांततेसाठी बोलणी आणि दुसरीकडे बॉम्बस्फोट सुरू असतानाही त्यांची शांततेवरची श्रद्धा ढळली नाही. स्त्रियांसाठी काम करण्याच्या निश्चयापासूनही त्या कधी मागे हटल्या नाहीत. २००१मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळासमोर बोलताना त्या म्हणाल्या होत्या, 'अफगाणिस्तानातील महिला राजकारणात नसतात. शांतता आणि सुरक्षा हे पुरुषांचे काम आहे, असे म्हटले जाते; पण त्या मिथकाला आव्हान देण्यासाठी मी येथे आले आहे.' 'मी शिक्षणासाठी लढणारी एक स्त्री आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात हे राजकारण समजले जाते. मी एक मानवतावादी स्वयंसेवी संस्था चालवते.' त्यांच्याकडे हे बोलण्याचे साहस आणि केवळ बोलण्याचे नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करण्याचे साहस कोठून आले असेल? आज ४५व्या वर्षी त्या अफगाणिस्तानसारख्या देशात निर्भयाने कशा लढत असतील? या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या बालपणात दडलेली आहेत. जमिला यांच्या जन्मानंतर काही काळातच अफगाणिस्तानवर सोव्हिएत युनियनने वर्चस्व मिळवले. त्या १४ वर्षांच्या असताना सोव्हिएत युनियन आणि अफगाण संघर्षात त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यावेळी त्या पोलिओतून सावरत होत्या. आजारातून बऱ्या झाल्या; पण या आजाराने काही खुणा कायमच्या ठेवल्या. १९९०मध्ये अफगाणिस्तानातील हिंसाचाराने टोक गाठले. त्यावेळी काही अफगाणी पळून शेजारील पाकिस्तानात गेले. त्यात जमिलाचे कुटुंबही होते. हे कुटुंब पेशावरला राहिले. जमिला यांचे कॉलेजचे शिक्षण पेशावर विद्यापीठातच झाले. तेथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि पाकिस्तानातील अफगाणी निर्वासितांच्या छावणीत सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पहिली नोकरी मिळाली. या छावणीतील कामाचा त्यांना पुढील आयुष्यभर उपयोग झाला. त्यांनी छावणीतील निर्वासितांच्या प्राथमिक गरजा भागविण्याचा प्रयत्न केलाच, शिवाय तेथे कुराण शिकवायला सुरुवात केली. कुराण शिकविण्याच्या माध्यमातून त्यांनी तेथील स्त्रियांना वाचायला आणि लिहायला शिकवले. तालिबानचा पाडाव झाल्यानंतर त्या अफगाणिस्तानात परतल्या आणि काबूलमध्ये 'नूर शिक्षण संस्था' स्थापन केली. तालिबान्यांच्या हिंसाचारात काबूलच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या होत्या. हे शहर पूर्वपदावर यायला खूप अवकाश होता. 'नूर'ची पहिली वर्षे काही सोपी नव्हती. आपल्या एका विद्यार्थ्याचा, आपल्याचा दुसऱ्या विद्यार्थ्याने दगडाने ठेचून केलेल्या हत्येची भयानक आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. या अशा घटनांनी त्या मागे फिरल्या नाहीत. शांततेसाठी शिक्षण, अर्थविषयक कौशल्य प्रशिक्षण, मानवी हक्क प्रशिक्षण हे काम त्यांनी 'नूर'च्या माध्यमातून सुरू ठेवले. या संस्थेच्या कार्याचा आता मोठा विस्तार झाला आहे. सध्या त्यांचे काम काबूलसह गझनी आणि जलालाबादपर्यंत पोहोचले आहे. आरोग्य, साक्षरता, रोजगाराभिमुख शिक्षण, इंटरनेट, इंग्रजी भाषा अशा कितीतरी नव्या विषयांचे प्रशिक्षण देण्यास संस्थेने सुरुवात केली. आता हे संपूर्ण देशभरात हे काम कोणत्या ना कोणत्या प्रकल्पांमार्फत लोकांपर्यंत पोहोचत आहे. स्त्रियांना 'स्व'ची ओळख करून देण्यासाठी त्यांनी धर्माचा आधार घेतला. अध्यात्म आणि समानता ही या प्रशिक्षणाची उद्दिष्टे आहेत. स्त्रियांसाठी इस्लामिक संस्था स्थापन करण्याचाही त्यांचा मानस आहे. स्त्रियांच्या जाणीवांमध्ये वाढ व्हावी, अन्याय आणि हिंसाचारापासून स्वतःचे संरक्षण करता यावे आणि राष्ट्रीय कामात भूमिका निभावणे ही कामे या संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्या स्वतः 'इस्लाम' विषयातील विद्वान आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांचाही त्यांचा अभ्यास आहे. स्त्रियांनी शांतता आणि सुरक्षेच्या कामात सहभाग घेण्याच्या भूमिकेचाही त्या पुरस्कार करतात. आज त्यांच्या अनेक विद्यार्थिनी शिकूनसवरून मोठ्या झाल्या आहेत. जमिला या सर्वांच्या आदर्श आहेत. त्यांच्या एका विद्यार्थिनीची आई म्हणते, 'मला मुलगे हवेत, अशी प्रार्थना मी अल्लाकडे करीत असे. आता मला वाटते, की माझे सगळे मुलगे हे मुली व्हावेत आणि माझ्या मुली जमिलासारख्या व्हाव्यात.' जमिला यांना आजवर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या मातेची इच्छा हा त्यांना मिळालेला सर्वांत मोठा पुरस्कार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट