दिवाळीआधी पाऊस पडू लागल्यामुळे नेटकऱ्यांनी या संधीचा फायदा घेत मिम्स व्हायरल करायला सुरुवात केली. त्यामुळे पावसाळी आणि दीपावली एकत्र आल्यानं पावसावलीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. पावसावलीतल्या याच मिम्सच्या ट्रेंडविषयी... ०००० रिद्धी बांदिवडेकर, रुईया कॉलेज सगळीकडे दिवाळीतील खरेदीची लगबग चालू असताना अचानक पावसानं हजेरी लावल्यामुळे काहीसा मूड ऑफ झाला. ढगाळ वातावरणामुळे ऑक्टोबर माहिना सुरु आहे की पावसाळी महिना, असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण नेटकऱ्यांनी या संधीचाही फायदा घेऊन पोट धरुन हसायला लावणारे मिम्स व्हायरल केले. अशा मिम्सचा सोशल मीडियावर चांगला बोलबाला झाला. 'दिवाळीच्या दिवसात चकली किंवा शेव तळण्याचा खमंग सुवास सर्वत्र दरवळतो. पण यंदाच्या दिवाळीत चकली तळायची की कांदाभजी, हेच कळत नाही', 'यंदा कंदिलावर छत्री लावायची वेळ आली आहे', 'यावर्षी दिवाळीत भाऊ'भिज' साजरी करावी लागणार वाटतं', अशा आशयचे मिम्स सध्या मोठ्या प्रमाणाव व्हायरल होत आहेत. तसंच यंदाच्या दिवाळीत किल्ला बांधायचा की धरण? असे प्रश्न पडणारे मिम्स शेअर होतायत. या वर्षी दिवाळीत फटाक्याचा पाऊस न लावता खरोखर पाऊस पाडण्याचं वरुणराजानं ठरवलं आहे. त्यामुळे फराळावर यथेच्छ ताव मारुन झाल्यावर मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी घराबाहेर पडण्याचे कष्ट न घेता खिडकीत बसून पावसाचा आनंद घ्या. हॅपी पावसावली!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट