अॅड. जाई वैद्य प्रश्न : माझी पत्नी सरकारी कर्मचारी आहे. दोन वर्षांपूर्वी आमच्या सतरा महिन्यांच्या मुलाला घेऊन ती घर सोडून निघून गेली. तिने दहा लाख रुपये पोटगीची मागणी करून घटस्फोट मागितला आहे. मी वकिलांमार्फत तिने नांदायला यावे म्हणून तीन नोटीस पाठवल्या. पैकी तिने दोन नोटीस स्वीकारल्या. पहिलीस उत्तर दिले व तिसरी नाकारली. ती नांदायला न आल्याने मी महिला दक्षता समिती येथे अर्ज केला. तिथे तीनपैकी एकाही तारखेला ती हजरही राहिली नाही आणि उत्तरही दिले नाही. महिला समितीने अर्ज निकाली काढून एकतर्फी जाहीर घटस्फोट झाल्याचे सांगितले. आता मी पुढे काय केले पाहिजे? उत्तर : सर्वप्रथम, न्यायालय वगळता इतर कोणीही घटस्फोट देऊ शकत नाही. तुमची पत्नी तुम्हाला सोडून गेल्याला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत; तसेच तुम्ही नांदायला बोलावण्याचा प्रयत्न करूनही तिने त्यास प्रतिसाद दिलेला नाही. तिने तुम्ही पाठवलेल्या नोटीसांपैकी एका नोटीशीला उत्तर दिले आहे. त्यात तिने तिची बाजू मांडली असेल. घर व संसार सोडून जाण्याची कारणे दिली असतील. त्यात तिने काय म्हटले आहे, हे तुम्ही येथे दिलेले नाही. तुम्हाला सोडून जाण्यासाठी तिच्याकडे जर सबळ व संयुक्तिक कारण नसेल, तर त्याग या कारणाखातर तुम्ही घटस्फोटाचा दावा दाखल करू शकता. त्याग या कारणाखाली दावा दाखल करताना चार मुद्दे महत्त्वाचे असतात. प्रथम, दावा दाखल करण्याअगोदर विभक्ती काळास दोन वर्षे पूर्ण झालेली असावीत. दुसरी गोष्ट म्हणजे, घर सोडून जाताना लग्न संपुष्टात आणण्याच्या हेतूने घर सोडले असावे. तिसरी गोष्ट म्हणजे, घर सोडून जाण्यास तुमची संमती नव्हती. चौथी गोष्ट म्हणजे, घर सोडून जाण्यास तुमचे चुकीचे वागणे कारणीभूत नसावे. या सगळ्या मुद्द्यांची खातरजमा करून घेऊन, तुम्ही वकिलांच्या सल्ल्याने घटस्फोटाचा दावा दाखल करू शकता. तुम्हाला घटस्फोट नको असेल, तर पत्नीने परत नांदायला यावे, म्हणून वैवाहिक संबंधांच्या पुनर्स्थापनेचा दावादेखील करता येईल. त्यासाठी कोणत्याही सबळ व संयुक्तिक कारणाशिवायच तुमच्या पत्नीने तुमचा त्याग केला आहे, हे तुम्हाला दाखवावे लागेल. तिने घर सोडून जाण्यास तुमची चूक कारणीभूत नाही, हे दाखवावे लागेल. या दोन्ही दाव्यांमधे तुम्हाला मुलाला भेटण्यासाठी, मुलाच्या ताब्यासाठी अर्ज करता येईल. या मधल्या काळात तुम्ही मुलाला भेटायला जात होता का? त्याच्यासाठी काही पोटगी देत होता का? मुलाचा ताबा मिळावा, यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का? याबद्दल तुम्ही काही माहिती दिलेली नाही. दावा चालू असल्याच्या काळात, तुमच्या मुलासाठी व तिच्या स्वतःसाठी अंतरिम पोटगी मिळावी, म्हणून तुमची पत्नी अर्ज करू शकते. तुमच्या पत्नीला सरकारी नोकरी आहे, असे तुम्ही म्हटले आहे. म्हणजे तिला उत्पन्नाचा स्थिर, कायमस्वरूपी व पुरेसा स्रोत आहे. तुमच्या व तुमच्या पत्नीच्या उत्पन्नात फारशी तफावत नसल्यास, न्यायालय तिच्यासाठी पोटगी अमान्य करण्याची शक्यता आहे; मात्र दोन्ही पालक अर्थार्जन करत असतील, तर दोघांनीही आपापल्या उत्पन्नाच्या प्रमाणात पाल्याचा खर्च वाटून घेणे अपेक्षित आहे. तुम्हाला यापैकी कुठलाही दावा करायचा असला, तरी वकीलांचा सल्ला घेऊन न्यायालयात जावे. योग्य न्यायालयाखेरीज इतर कोणीही घटस्फोट देऊ शकत नाही. रिवाज किंवा प्रथेनुसार समाजपंचायतीद्वारा किंवा ज्ञातपंचायतीद्वारा घटस्फोट घ्यायचा असला, तरी असा घटस्फोट घेण्याची अनेक वर्षे जुनी सामाजिक परंपरा असल्याचे न्यायालयात सिद्ध करावे लागते; अन्यथा तो घटस्फोट बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे न्यायालयीन आदेशाशिवाय आपला घटस्फोट झाला असे समजून दुसरा विवाह न करणे योग्य. अन्यथा द्विविवाहाच्या गुन्ह्यास सामोरे जावे लागेल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट