\B चर्चेतील ती\B कॅनडाची जॅझ क्वीन एलेनॉर कोलिन्स हिने नुकताच शंभरावा वाढदिवस साजरा केला. शंभर वर्षांच्या सांगीतिक प्रवासात ती अनेक चढ-उतारांना सामोरे गेली. तिच्या सुरांनी अनेकांची आयुष्ये नादमय केली. तिच्याविषयी. सुनिता लोहोकरे अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची भाषणे तुम्ही ऐकली असतील. या भाषणांमधला आशयाचा भाग वेगळा ठेवा आणि ओबामांचा फक्त आवाज ऐकून पाहा. त्यांच्या आवाजात एक नैसर्गीक लय असलेली जाणवते. या आवाजाचा पोतच काही वेगळाच आहे. म्हणूनच त्यांची भाषणे ऐकत राहावीशी वाटतात. मला वाटते, ही त्यांना मिळालेली निसर्गाची देणगीच आहे. कितीतरी गायकांचे आवाज फक्त ऐकत राहावेसे वाटतात. अमेरिकेत पॉप आणि जॅझ गायन प्रकारांवर कृष्णवर्णियांचे पिढ्यान् पिढ्या वर्चस्व असलेले दिसते. बरोबर १०० वर्षांपूर्वी एका कृष्णवर्णीय कुटुंबात जन्म घेतलेली एलेनॉर कोलिन्स ही या कृष्णवर्णीय कलाकारांपैकीच एक. तिचा जन्म झाला तेव्हा कोणाला वाटलेही नसेल, की ही पुढे खूप मोठी गायिका बनेल. मात्र, एलेनॉर कोलिन्स जॅझ संगीतातील आदर्श बनली. खरे तर कोलिन्सला एकेरी संबोधावे का, असा प्रश्न पडला; कारण गेल्याच आठवड्यात तिने आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या चाहत्यांसाठी तिचे स्थान अगदी हृदयाजवळचे आहे, म्हणून तिला एकेरी संबोधणेच योग्य. तर कोलिन्सने गेल्याच आठवड्यात शंभर वर्षे पूर्ण केली. २१ नोव्हेंबर १९१९ हा तिचा जन्मदिवस. या शंभर वर्षांत जगात कितीतरी उलथापालथी झाल्या. समाज, माणसे, सरकारे, मूल्ये सगळे काही बदलत गेले. कोलिन्सने हे सगळे बदल याची डोळा पाहिले आहेत. तिचे स्वतःचे आयुष्यही खूप बदलले. आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या-वाईट प्रसंगांना ती सामोरी गेली. संघर्ष केला. मात्र, 'रोजचा दिवस निराळा असतो, म्हणून दर दिवशी आपण जास्तीत जास्त चांगले काय करू शकतो, ते करायचे,' या आईच्या शिकवणुकीनुसार तिने आयुष्यातील प्रत्येक दिवस सुंदर करण्याचा प्रयत्न केला. कदाचित तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य या मंत्रामध्येच दडलेले असावे. कॅनडाची प्रसिद्ध जॅझ गायिका, ब्रिटिश कोलंबिया संगीत क्षेत्राची प्रणेती, टीव्हीवरील सूत्रसंचालिका, कलाकार, सामाजिक कार्यकर्ती, उत्तर अमेरिकेच्या टीव्हीवरील पहिली कृष्णवर्णीय कलाकार अशी तिची आज ओळख आहे. ही ओळख खूप परिश्रमातून, संघर्षातून बनली आहे. कृष्णवर्णीय अस्तित्वाच्या लढ्याचाही ती एक भाग होती. तिचा जन्म कॅनडातील एडमाँटनचा. त्या काळात कृष्णवर्णीयांना राहाण्यासाठी शहरापासून लांब जमिनी दिल्या होत्या. १८७० ते १९३० या दरम्यानच्या काळात अशा पद्धतीने हजारो कृष्णवर्णीयांना अशा जमिनींवर राहण्यासाठी परवाने देण्यात आले. या स्थित्यंतरात कोलिन्सचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. हे पाहात ती लहानाची मोठी होत होती. लहानपणापासूनच ती गात असे. पंधराव्या वर्षी तिने एका गाण्याच्या स्पर्धेत विजय मिळवला. १९३०मध्ये ती व्हँकुव्हरला राहण्यासाठी गेली. तिथे तिने एका समूहगानाच्या कार्यक्रमात भाग घेतला. हा काळ कृष्णवर्णीयांच्या छळाचा होता. तिचे कुटुंबीयही या जाचातून गेले; मात्र व्हँकुह्हर तिची कर्मभूमी बनली. तिथेच तिचे संगीत फुलले. गायिका म्हणून ती नावारूपाला आली. कॅनडातील प्रसिद्ध जॅझ गायकांकडून तिचे कौतुक होऊ लागले. सोळाव्या वर्षी ती एडमॉन्टनमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये गाऊ लागली. ते दिवस तिला आजही आठवतात. तिथे गाण्यासाठी जे कपडे लागत, ते कपडे विकत घेण्यासाठी आपण पैशाची कशी बचत केली, त्या आठवणी तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितल्या आहेत. 'माझ्याकडे काहीही नव्हते. होते फक्त आशीर्वाद,' ती सांगते. मात्र, केवळ या आशीर्वादामुळेच नव्हे, तर मेहनतीने, आवाजामुळे ती स्टॅन्ली पार्कमध्ये गाऊ शकली, कॅनडाच्या टीव्हीवर कार्यक्रम सादर करू शकली. १९४२मध्ये तिने रिचर्ड कोलिन्स यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि ती बर्नबे येथे राहू लागली; परंतु तिथे तिला एका संकटाला सामोरे जावे लागले. तिच्या घराशेजारी एक गौरवर्णीय कुटुंब राहत होते. त्या कुटुंबाने वंशभेदातून कोलिन्स कुटुंबाच्या विरोधात तक्रार नोंदवली. या स्थितीतही तिने आणि रिचर्डने तिथे राहण्याचा आपला निश्चय सोडला नाही. कोलिन्स तिथल्याच एका शाळेत संगीत शिकवू लागली. तिने तिच्या संगीताला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला. कुटुंबाच्या निर्वाहासाठी तिने सीबीसी रेडिओवर गाण्यास सुरुवात केली. तिचा आलेख चढता राहिला. व्हँकुव्हरची 'फर्स्ट लेडी ऑफ जॅझ' असे तिला संबोधले जाऊ लागले. १९६० ते ७०च्या दरम्यान तिने टीव्हीवर अनेक कार्यक्रम केले. 'द एलेनॉर शो,' 'ब्लूज अँड द बॅलड,' 'क्विंटेट' आणि 'एलेनॉर' हे तिचे टीव्हीवरील कार्यक्रम प्रसिद्ध आहेत. सीबीसी टीव्ही आणि रेडिओसाठीही तिने गायले आहे. तिला अमेरिकेतही बोलावणी येऊ लागली; मात्र कॅनडालाच तिने आपली मायभूमी मानले होते. शंभर वर्षांच्या आयुष्यात कोलिन्सने अनेक चढ-उतार पाहिले; मात्र तिचे गाणे थांबले नाही. नव्वदीतही तिने संगीताचे कार्यक्रम सादर केले आहेत. ९४व्या वर्षी एका कार्यक्रमात गायन करून तिने उपस्थितांना आश्चर्यचकीत केले होते. आपल्या संगीतातून तिने विसाव्या शतकातील वांशिक संबंधांचा चेहरा बदलला, संगीताच्या विकासासाठी कार्य केले. याच भावनेतून तिला २०१४मध्ये 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा किताब देण्यात आला. शंभरीनंतरही आयुष्य असते, असा तिचा विश्वास आहे. स्वप्नांमागे धावायला तिला अजूनही आवडते. आपल्याला आयुष्याने जे काही दिले आहे, ते आता तिला वाटायचे आहे. शंभरीतही भरभरून जगणाऱ्या कॅनडाच्या या जॅझ सम्राज्ञीला सलाम. sunita.lohokare@timesgroup.com
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट