Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

रजोनिवृत्तीचा सोहळा...

$
0
0

रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अध्याय संपून नव्या आयुष्याला सुरुवात होणारी घटना आहे. मग तीही अशीच आनंदाने साजरी करायला काय हरकत आहे. रजोनिवृत्तीचेही सेलिब्रेशन होते, हे अनेकींना माहिती नसेल, एवढे त्याचे प्रमाण सध्या कमी आहे; पण सुरुवात तर झाली आहे.

लक्ष्मीकांत मेजारी

पन्नाशीला आलेल्या 'ती'च्या घरी आज मोठी लगबग सुरू होती. मोबाइल थोड्या थोड्या वेळाने सारखा खणाणत होता. काही जणी पार्टीची तयारी कशी चालली आहे, हे जाणून घेत होत्या, तर काहींची मदतीसाठी विचारणा होत होती. तिची २०-२२ वर्षांची मुलगीही तिला या पार्टीच्या तयारीसाठी मदत करीत होती. या पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे, ती फक्त महिलांचीच होती. म्हणजे बॅचलर आणि स्पिन्सटर पार्टी असते ना तशी. येथील मामला थोडा वेगळा होता. या दोन्ही पार्ट्यांपेक्षा आजचे सेलिब्रेशन वेगळे होते.

संध्याकाळी साडेसहा-सातच्या सुमारास एकेक करीत मैत्रिणी जमा होऊ लागल्या. यात सकाळी चालायला येणाऱ्या, काही सोसायटीतील आणि काही ऑफिसमधील होत्या. पार्टी सुरू झाली होती. खाणे-पिणे, नाच-गाणे, भेटवस्तू-पुष्पगुच्छ देणे, अशी सगळी धमाल झाल्यानंतर निघताना त्या तिला नव्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत होत्या.

हो नव्या आयुष्यासाठी. आजपासून तिने नव्या आयुष्यात पाऊल ठेवले होते. रजोनिवृत्तीनंतरचे, या नव्या आयुष्याचेच सेलिब्रेशन होते. बाईचे जीवन हे तिचे संपूर्ण आयुष्य ढवळून काढणाऱ्या, बदलून टाकणाऱ्या घटनांनी भरलेले असते. या आयुष्याची सुरुवात मासिक पाळीने होते. तेरा-चौदाव्या वर्षात पोहोचल्यानंतर तिच्या आयुष्यात ही उलथापालथ घडविणारी घटना घडते. पुढे ती ३०-४० वर्षे अव्याहत सुरू राहणार असते. त्यानंतर मग लग्न असो, आपले घर सोडून सासरी जाणे असो, प्रसुती अशा सगळ्या घटना तिच्या आयुष्यात घडत असतात. या सगळ्या घटना कुठे ना कुठे आपल्या संस्कृतीनुसार विधींनी, समारंभांनी साजऱ्या केल्या जातात. मुलीला पहिल्यांदा पाळी आली, की तो क्षणही काही ठिकाणी एखाद्या लग्नासारखा साजरा केला जातो. आयुष्यातील नव्या घटनांचा वा एखादी नवीन सुरुवात करताना सोहळा होणे, हा मानवी स्वभाव आहे. त्यातूनच मग बॅचलर, स्पिन्सटर पार्ट्या आयोजित केल्या जातात. रजोनिवृत्ती ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अध्याय संपून नव्या आयुष्याला सुरुवात होणारी घटना आहे. मग तीही अशीच आनंदाने साजरी करायला काय हरकत आहे. रजोनिवृत्तीचेही सेलिब्रेशन होते, हे अनेकींना माहिती नसेल, एवढे त्याचे प्रमाण सध्या कमी आहे; पण सुरुवात तर झाली आहे.

रजोनिवृत्ती ही नोकरीतून निवृत्त होण्यासारखी ठरलेली नसते. म्हणजे, आज तुम्हाला बरोबर ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. आजपासून तुम्हाला मासिक पाळी येणार नाही. तेव्हा स्वस्थ राहा आनंदी राहा, असे कुणी डॉक्टर सांगत नाही किंवा निसर्गाचीही तशी रचना नाही. रजोनिवृत्ती येण्यापूर्वी साधारण तीन-चार वर्षे आधीपासूनच स्त्रीच्या शरीरात तसे बदल होऊ लागतात. तिची मनोवस्था बदलायला लागते. आरोग्याच्या तक्रारी उद्भविण्यास सुरुवात होते. रजोनिवृत्ती आली आहे, हे समजायलाही बराच काळ जावा लागतो.

रजोनिवृत्ती ही साधारण ४०-४५ ते ५० या वयात येते. त्यापूर्वीचा साधारण तीन-चार वर्षांपूर्वीचा काळ हा प्रीमेनोपॉजचा असतो. यामध्ये मासिक पाळीत अनियमितता जाणवू लागते. काही वेळा ती लवकर येते, तर काही वेळा दोन दोन महिन्यांनी येते. चिडचिड वाढते. साध्या साध्या कारणांवरूनही चिडचिड दिसून येते. ही काही प्रीमेनोपॉजची लक्षणे आहेत. रजोनिवृत्ती आली आहे की नाही, हे समजण्यासाठी साधारण १२ महिन्यांचा काळ तपासावा लागतो. या काळात मासिक पाळी आली नाही, की रजोनिवृत्ती आली असे मानले जाते. काही वेळ डॉक्टरांकडे जाऊन ते तपासून घ्यावे लागते. रजोनिवृत्तीमुळे स्त्रीच्या शरीरातील संप्रेरके (हॉर्मोन्स) कमी होत असल्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा (ऑस्टियोपोरोसिस) त्रास सुरू होतो. शरीरातील व्हीटॅमिन डी ३ कमी होते. पाय दुखणे, पायात गोळे येणे अशा समस्या उद्भवतात. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हॉट फ्लशेस जाणवू लागतात. म्हणजे अचानक त्या स्त्रीला शरीर आतून गरम होते आहे, असे वाटू लागते. छातीची धडधड वाटणे (पाल्पिटेशन), तसेच त्वचा आणि जननमार्गाचा शुष्कपणा ही सगळी रजोनिवृत्ती जवळ आल्याची लक्षणे आहेत. रजोनिवृत्तीवेळी स्त्रीला अशाप्रकारचे त्रास सुरू होतात. शरीरातील संप्रेरकांची पातळी कमी झाल्यामुळे हे त्रास होत असतात. रजोनिवृत्तीनंतर स्त्री अशा प्रकारच्या सर्व त्रासांसह एक नव्या आयुष्यात पदार्पण करीत असते. या टप्प्यावर तिच्यासाठी आतापर्यंतची सर्वांत दडपणाची आणि तणावाची गोष्ट म्हणजे, तिचे आई होणे आता संपणार असते. तिच्या या आयुष्याची सांगता आणि नव्याची सुरुवात अशा या हुरहुर लावणाऱ्या क्षणाचा सोहळा साजरा व्हावा, यापेक्षा आणखी काय हवे!

Laxmikant.mejari@timesgroup.com

रजोनिवृत्तीची लक्षणे

- मासिकपाळी अनियमित होणे.

- अचानक शरीर आतून गरम होते आहे, असे वाटणे (हॉट फ्लशेस).

- झोप न येणे आणि आलीच तर मधेच झोपमोड होणे.

- वजन वाढणे.

- केस गळणे.

- त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे.

- जननमार्ग शुष्क होणे (व्हॅजिनल ड्रायनेस) यामुळे चिडचिड वाढते आणि शरीरसंबंध ठेवण्यात अडचण येते.

- मन:स्थितीत बदल होणे (मूड स्विंग). यामुळे साध्या साध्या गोष्टींवरून चिडचिड सुरू होते.

रजोनिवृत्तीनंतर स्वतःची काळजी कशी घ्याल?

डॉ. अमोल निकम सांगतात, 'रजोनिवृत्तीनंतर हॉर्मोन्स कमी होत असल्यामुळे ऑस्टियोपोरोसिस त्रास सुरू होतो. यावर उपाय म्हणजे, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी ३ घेतले पाहिजे. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हॉट फ्लशेस जाणवू लागतात. छातीची धडधड वाढते. त्वचा शुष्क होते. खाज येते. जननमार्गातही शुष्कपणा जाणवू लागतो. यावर उपाय म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्याने इस्ट्रोजनच्या गोळ्या घ्याव्यात. आहारातून इस्ट्रोजन मिळू शकेल असे पदार्थ घेता येतील उदा. सोयबीनचा वापर वाढवल्यास त्यातून इस्ट्रोजन मिळू शकते. कॅल्शिअमसाठी फळे घेता येतील; मांसाहार करणाऱ्या महिला अंडी, मासे खाऊ शकतात. साध्या स्वरूपाचा व्यायामही करावा. योग हा यासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे.'

वेळोवेळी तपासणी हवी

रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजन हे संप्रेरक कमी झाल्याने महिलांना आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. यासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. इस्ट्रोजन कमी झाल्याने महिलांच्या शरीरात कॅल्शिअमची मात्रा कमी होऊ लागते. त्यामुळे हाडे, नखे ठिसूळ होऊ लागतात. (ऑस्टियोपोरोसिस) शरीराला लागणारे हे कॅल्शिअम केवळ आहारामधून पूर्ण करू शकत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअम सप्लिमेंटच्या माध्यमातून ही कॅल्शियमची भरपाई करावी लागते, असं स्त्रिरोगतज्ज्ञ डॉ. नवनीत देसाई म्हणतात. रजोनिवृत्तीनंतर महिलांचे वजन वाढण्याची शक्यता असते. हे वजन वाढू नये म्हणून नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. यात एरोबिक्स, योग आणि अगदी काहीच जमत नसेल, तर किमान चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. त्याचबरोबर वेळोवेळी डॉक्टरांकडून तपाणीही केली जावी, असेही डॉ. देसाई सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>