'मिस युनिव्हर्स' ठरलेल्या झोझीबिनीला महिलांच्या नेतृत्त्वगुणाचा प्रश्न वैश्विक वाटला आणि म्हणून तिने तो उत्तरात मांडला. या वैश्विक प्रश्नाचे उत्तर शोधायला आपण आपल्या घरातून सुरुवात करायला हरकत नाही! पर्णिता शेडगे-तांदूळवाडकर 'मिस युनिव्हर्स'चा किताब दक्षिण आफ्रिकेच्या झोझीबिनी टुंझीला गेला! अंतिम फेरीमध्ये झोझीबिनीने दिलेल्या उत्तरामुळे झगमगता मुकुट तिच्या डोक्यावर टाळ्यांच्या कडकडाटात विराजमान झाला. तीनही स्पर्धकांना एकच प्रश्न विचारण्यात आला होता, मग झोझीबिनीच्या उत्तरात असे काय वेगळे होते, ज्याने ती या मुकुटाची मानकरी ठरली? प्रश्न होता, तुम्ही 'मिस युनिव्हर्स' झालात, तर तरुण मुलींना कुठली महत्त्वाची गोष्ट शिकवाल? यावर तिने चटकन उत्तर दिले, लीडरशिप अर्थात नेतृत्त्वगुण. या उत्तरामुळे झोझीबिनीच्या तत्पर विचारशक्तीचे कौतुक करावेसे वाटते. सद्यपरिस्थितीत महिला-मुलींमध्ये कशाची उणीव आहे हे तिने झटकन ओळखले असले, तरी तिच्या या अवघ्या ३० सेकंदाच्या उत्तराने अनेक विचारांना, समज-गैरसमजांना वाव दिला. उपजतच अनेक गुण असलेल्या स्त्रियांमध्ये नेतृत्त्वगुणांची खरेच कमतरता असते? आणि ते शिकवण्याची गरज आत्ता आहे? अनेक वर्षे मी ग्रुमिंग एक्सपर्ट म्हणून काम करते आहे. झोझीबिनीने उल्लेख केल्याप्रमाणे मलाही मुली-स्त्रियांमध्ये नेतृत्त्वक्षमतेची कमतरता दिसून येते, अगदी जागतिक स्तरावरही. आजकाल अनेकजणी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करत असल्या किंवा करिअरच्या वेगळ्या वाटा निवडलेल्या असल्या, तरी त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. बाकींच्याचे काय? समस्या नेमकी कुठे आहे? स्त्रियांमध्ये नेतृत्त्व कौशल्यच नाही, की हा गुण अंगीभूत असूनही त्यांना पुरेसा वाव मिळत नाही? बरीच वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रांत, विविध स्तरावर काम करण्याच्या अनुभवातून मी हे ठामपणे सांगू शकते, की स्त्रियांमध्ये नेतृत्त्वगुण नक्कीच असतात; मात्र कधी कधी त्यांना आपल्यातल्या या गुणवत्तेची कल्पना नसते, तर कधी या गुणाचा वापर करायला त्या संकोच करतात. या संकोचाची दोन कारणे सांगता येतील. कोणतेही नेतृत्त्व स्वीकारणे म्हणजे वाढीव जबाबदाऱ्या सांभाळणे. संसार आणि काम यांचा समतोल सांभाळण्याविषयी नेहमी बोलले जाते. तिने करिअर केले, तरी संसार तिला चुकलेला नाही. संसार ही प्रामुख्याने स्त्रीची जबाबदारी आहे हे नकळत पिढ्यान् पिढ्या त्यांच्या मनावर बिंबवण्यात आले. त्यामुळे तिच्या या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामध्ये आणखी भर कशाला किंवा नवी जबाबदारी निभावण्यासाठी तिच्याकडे वेळ नसेल, या समज किंवा गैरसमजातून (?) तिला नेतृत्त्व करण्याची जबाबदारी दिली जात नसावी. माझ्या मते, वरिष्ठ आधिकारी हा विचार करूनच स्त्रियांना नेतृत्त्व देण्याचे टाळतात किंवा या कारणाचा 'आधार' घेऊन त्यांना व्यासपीठ दिले जात नसावे. परिस्थिती हळूहळू बदलत असली, तरी पाहिजे तितकी सकारात्मक नाही. संकोचाचे दुसरेही कारण असू शकते. एक स्त्री जेव्हा नेतृत्व करते, तेव्हा तिला अनेक प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागते. माणसाकडूनच चुका होतात, ती सुधारण्याची संधीही असते, कुणीही 'परफेक्ट' नाही; पण म्हणून महत्त्वाचे खाते सांभाळणाऱ्या स्त्रिला 'निर्बला' म्हणून हिणवण्यात काय अर्थ? ही कोणती मानसिकता? आपल्या दैनंदिन जीवनातच पाहा, जी स्त्री नेतृत्त्व करते तिला ओव्हरस्मार्ट, स्वत:ला काय समजते? अशा 'पदव्या' बहाल केल्या जातात. बऱ्याचशा स्त्रिया अशी टीका होऊ नये म्हणून पुढाकारच घ्यायला कचरतात. टीकेमुळे होणारे मानसिक खच्चीकरण पेलवेलच असे नाही. एखादा पुरुष नेतृत्त्व करत असेल, तर त्याची मात्र प्रशंसा होते. एक स्त्री नेतृत्त्व करते, तेव्हा तिला स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करायला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. पुरुषांसाठी एखाद्या स्त्रीकडून आदेश घेणे सहज होत नाही किंवा सहन होत नाही, याची स्त्रियांना पूर्ण कल्पना असते. यामुळे त्यांना आणखी दबावाखाली आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, अर्थात निराश होऊन! 'मिस युनिव्हर्स' झोझीबिनीने दिलेल्या उत्तराचे सद्यपरिस्थिती स्पष्टपणे समर्थन करते. तरुण मुलींना नेतृत्त्व कौशल्य, जे त्यांना उपजतच आहेत, त्यांना आणखी 'पॉलिश' करायची आणि नेतृत्त्व करायला पुढाकार घ्यायची गरज आहे. हे गुण शिकता येतात का? तर नक्कीच येतात! याची सुरुवात शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासून झाली पाहिजे. त्यांना बिनधास्त स्पर्धेत उतरू द्या, प्रोत्साहन द्या, तू मुलगी आहेस, तुला शोभत नाही किंवा हे तुझ्यासारख्या मुलींसाठी नाही वगैरे वगैरे उपदेश करत त्यांच्या कुवतीचे अवमूल्यन करू नका. त्यांना बिनधास्त भरारी घेऊ द्या. फक्त या भरारीमध्ये तिने सगळीकडे अव्वलच यावे, हा आपला अट्टहास किंवा दडपण तिच्या मनावर नको. तिच्यावर सांघिक जबाबदाऱ्या सोपवा. केवळ घरगुती नाही, तर व्यावहारिकही. या पुढाकार घेण्यातून ती काय शिकेल, तर व्यावहारिक ज्ञान, माणसांना त्यांच्या स्वभावानुसार हाताळण्याची हातोटी आणि अर्थात निर्णयक्षमता. झाली चूक, तर होऊ द्या, चुकीतून तर नवे मार्ग मिळतात. रोम हे सगळ्यांत सुंदर शहर एका रात्रीत बांधून झाले नव्हते! हेच पाहा ना, संसारात बाका प्रसंग आल्यास गृहिणी त्याला सामोऱ्या जातात आणि विशिष्ट जबाबदारी चोखपणे पार पाडतात. 'सॉफ्ट स्कील' या क्षेत्रात 'लीडरशिप स्कील्स' हा महत्त्वाचा भाग आहे. हे कौशल्य नक्कीच विकसित करता येते. एका नेत्यामध्ये कोणते गुण असावेत, तर टीम बिल्डिंग, संवाद, योग्य नियोजन, निर्णयक्षमता, वेळेचे व्यवस्थापन, आपत्ती किंवा वाद व्यवस्थापन इत्यादी. एका दृष्टीने पाहिले, तर या उपजत गुणांच्या जोरावरच गृहिणी, नोकरदार स्त्रिया संसाराचा गाडा हाकतात. त्यांचे कुटुंब झाली टीम, कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य संवाद स्थापन करण्याची हातोटी म्हणजे संवादकौशल्य, वेळेत काम पूर्ण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन, कौटुंबीक कसोटीच्या प्रसंगात कामी येते तिची निर्णयक्षमता आणि आपत्ती व्यवस्थापनाचा गुण, माणसांची पारखही तिला लगेच होते. हे केवळ सांसारिक किंवा कर्तव्यपूर्ती मानले जाणारे गुण नाहीत. दुर्दैवाने ते त्यासाठी मानले जातात. केवळ संसारापुरते मर्यादित नसलेले तिचे हे नेतृत्त्वगुण आहेत. हे सगळे ती सहजतेने पार पाडते. मग कामाच्या ठिकाणी हा आत्मविश्वास किंवा तयारी का नसावी? तिच्या या गुणांना व्यावहारिक आणि व्यावसायिक पायरीवर उतरवण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, तेही तिच्या क्षमतेवर कोणतीही शंका उपस्थित न करता. स्त्रियांनीही पुढाकार घेऊन संधी स्वीकारली पाहिजे, तरच हे वर्तुळ पूर्ण होऊ शकते. यशस्वी पुरुषाच्या मागे जशी एक स्त्री असते, तसेच स्त्रीला नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी उत्तम नेता म्हणून यशस्वी करण्यासाठी घरातील पुरुषाने भावनिक आणि व्यावहारिक पाठिंबा द्यायला हवा. त्यासाठी घरची आणि मुलांची जबाबदारी बरोबरीने स्वीकारावी लागली, तरी त्याला ना नसावी. तरच स्त्रिया घरच्या जबाबदारीची काळजी बाजूला ठेवून आत्मविश्वासाने आणि नि:संकोचपणे व्यावसायिक नेतृत्त्व करू शकतील. त्या कितीही प्रोफेशनल, प्रॅक्टिकल झाल्या, तरी आपल्या घरचे, कुटुंबाचे 'असणे' ती विसरत नाही. 'सॉफ्ट स्कील ट्रेनिंग'मध्ये या गुणांची पारख करून मुलींमध्ये पुढाकार घेण्याचा आत्मविश्वास तयार केला जातो. काही गोष्टींचा सराव करणे गरजेचे ठरते. सकारात्मक दृष्टिकोन, स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, दूरदृष्टी, स्वत:ला नेमक्या शब्दांत स्पष्टपणे व्यक्त करणे, प्रामाणिकपणा, वचनबद्धता, सकारात्मक देहबोली इत्यादी. हे गुण कोणतीही स्त्री आत्मसात करू शकते. व्यवस्थापन किंवा नेतृत्त्व हे फक्त पुरुषांचे काम आहे, असे विचार कालबाह्य ठरवणे हे आता आपण स्त्रियांच्याच हातात आहे. या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्टही आहे. प्रसिद्ध लीडर इंद्रा नूयी नेहमी सांगतात, 'एका ठिकाणी काम करणाऱ्या स्त्रिया दुसऱ्या स्त्रियांना पाहिजे तसे साहाय्य करत नाहीत. एखादी जर काही वेगळे करत असेल, तर कौतुक करणे आणि पाठिंबा देण्याऐवजी तिला पाण्यात पाहिले जाते. ईर्षा किंवा मत्सरापोटी तिचा तिरस्कार केला जातो.' अगदी साधे उदाहरण, कामाच्या दबावामुळे तिला किटी पार्टीला यायला जमले नाही, तर ते समजून घेण्याऐवजी, पार्टीमध्ये तिच्याविषयीच गॉसिप होतात. ऑफिसमध्येही असेच. याबाबत आपण स्त्रियांनी जर आत्मपरीक्षण करावे. अशी परिस्थिती केवळ भारतात नाही, तर जगभरात असेल; कारण 'मिस युनिव्हर्स' ठरलेल्या झोझीबिनीला हा प्रश्न वैश्विक वाटला आणि म्हणून तिने तो उत्तरात मांडला. या वैश्विक प्रश्नाचे उत्तर शोधायला आपण आपल्या घरातून सुरुवात करायला हरकत नाही! (लेखिका सॉफ्ट स्कील ट्रेनर आणि ग्रुमिंग एक्सपर्ट आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट