Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

नांदण्यास नकार

$
0
0

अॅड. जाई वैद्य

प्रश्न : माझे लग्न २२ जून रोजी झाले आणि ८ जुलै रोजी माझी बायको घर सोडून निघून गेली, ती आजतागायत परत आलेली नाही. हनिमूनहून परत आल्यावर ती दोन दिवसांत माहेरी गेली. आमचे लग्न झाल्यापासून ती गप्पच होती. माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबीयांशीही ती फारशी बोलली नाही. ती कायम फोनवर असे. तिने माझ्याशी आणि नवीन संसाराशी जुळवून घेण्याचा कुठलाच प्रयत्न केला नाही. ती माहेरी गेल्यावर मी आणि माझ्या आई-वडिलांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला; पण ती आमच्या कुणाशी बोलायलाच तयार नाही. तिच्या पालकांना मला आणि तिला एकांतात एकमेकांशी बोलू द्या म्हणून विनंती केली; पण तुम्ही भांडाल, असे कारण सांगून ते तिला माझ्यासमोर येऊच देत नाहीत. आमच्यातील शेवटच्या मीटिंगमधे तिच्या पालकांनी नवरा नपुंसक आहे. तुम्ही आमची फसवणूक केली आहे; त्यामुळे आम्हाला आमच्या मुलीला नांदवायला पाठवायचे नाही, असा खोटा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे मी माझी वैद्यकीय चाचणी करून घेतली व अपेक्षेप्रमाणे ती नॉर्मल आली. आता आम्हाला कळत नाही, की आम्ही काय करावे? त्यांनी प्रथम काही पाऊल उचलायची वाट पाहावी का? की तिला नांदावयास बोलावण्याचा माझा अधिकार वापरून, तिला कायदेशीर नोटीस द्यावी? मी नोटीस दिल्यावर तिने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर खोटे आरोप केले तर? मग मी घटस्फोटाचाच एकतर्फी दावा करावा का? आम्ही कुठलाही हुंडा मागितलेला नाही, तसेच तिचा कुठल्याही प्रकारे छळ केलेला नाही. आजवर तसा आरोप तिने आमच्यावर केलेला नाही.

उत्तर : तुम्ही दिलेली माहिती सकृतदर्शनी एकांगी वाटत असल्यामुळे, ती वाचत असताना असे का घडले असावे, असा विचार साहजिकच मनात आल्याशिवाय राहात नाही. लग्न झाल्यापासूनच तुमची बायको गप्प गप्प होती, तेव्हा तुमचे काही बोलणे झाले का? हनिमूननंतर ती दोन दिवसांत निघून जावी असे काय कारण घडले, हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने, नेमके काय घडले असावे, याची माहिती तुमच्याकडून मिळत नाही. त्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध लग्न करणे भाग पडले होते का, लग्नाअगोदर तुम्ही एकमेकांना भेटून एकमेकांशी ओळख करून घेतली होती का, एकमेकांना समजून घेतले होते का, हे विवाहपूर्व प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यांनी तुमच्यावर नपुंसकतेचा आरोप केल्याचे लिहिले आहे; पण असे का याबद्दल काही लिहिलेले नाही. त्यालाही काही आयाम आहेत का, हे लक्षात घ्यावे लागेल. तुम्ही संवाद साधायचा प्रयत्न करूनही मुलगी व तिचे कुटुंबीय तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत, यावरून त्या मुलीची नांदायला येण्याची इच्छा नसावी, हे स्पष्टपणे दिसते आहे. त्याची कारणे अनेक असू शकतील. त्या मुलीच्या पसंतीशिवाय, तिला काही कारणाने तुमच्याशी लग्न करावयास भाग पाडले असेल किंवा इतर कुणाशी लग्न करायची इच्छा असताना, तिच्या मनाविरुद्ध तुमच्याशी लग्न करावे लागले असेल किंवा खरोखरच लग्नानंतर तुमच्यात काही बिनसले असेल. यापैकी कारण कोणतेही असले, तरी तिची व तिच्या कुटुंबीयांची लग्न टिकावे म्हणून समुपदेशनाचा व अन्य काही प्रयत्न करण्याची इच्छा दिसत नाही, एवढे खरे. त्यामुळे तिच्या इच्छेविरुद्ध तिने तुमच्याबरोबर नांदायला परत यावे अशी नोटीस पाठवून, 'अधिकार' वापरून वा 'हक्क' गाजवून तुमचा संसार वा आयुष्य सुखी ठरणार आहे का, याचा विचार तुम्ही कुठलेही पाऊल उचलण्याआधी करावा, हे चांगले. तसे करायचे नसल्यास, तुम्हाला एकमेकांवर दोषारोप न करता परस्परसहमतीने घटस्फोट घेता येतो आहे का, हे पाहता येईल. अर्थात, तसा अर्ज करण्याअगोदर तुम्हाला लग्नाला व विलग होण्याला एक वर्ष पूर्ण व्हायची वाट पाहावी लागेल. त्याअगोदर तुम्ही चर्चा करून घटस्फोटाच्या अटी ठरवून घेऊ शकता. एक वर्ष पूर्ण होण्याअगोदर जर घटस्फोटाचा अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी न्यायालयाची विशेष परवानगी घ्यावी लागते. जर तिने केलेल्या विरोधामुळे तुमच्यात शरीरसंबंध आले नसतील, तर लग्न रद्द करून घेण्याचा (नलिटी) पर्याय तुमच्याकडे आहे. त्यासाठी एक वर्षाच्या आत तुम्हाला न्यायालयात अर्ज करावा लागेल. तसेच असा आदेश होण्यासाठी परस्पर सहमतीने अर्ज करता येत नाही. तुमच्या प्रश्नाचा अजून एक भाग म्हणजे विवाहातील नपुंसकता. नपुंसकता म्हणजे काय, हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध ठेवण्यातील शारीरिक असमर्थता (वैद्यकीय उपचारांनी बरी होण्यासारखी आहे किंवा नाही हा त्यातील आणखी एक भाग) आणि शरीरसंबंध ठेवता येत असले, तरी मूल होण्यासाठी आवश्यकतांचा अभाव यात फरक आहे. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. यापैकी त्यांचा नेमका काय आरोप आहे, हे समजून घ्या. शरीरसंबंधास आणि मूल होण्यास शारीरिक दृष्ट्या निकोप असूनही मने जुळली नसतील, वा इच्छा होत नसेल, वा इतर समलैंगिकता वगैरे कारणांमुळे जर पत्नीने तुमच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला असेल, तर त्याला 'मानसिक नपुंसकता' म्हणता येते. यापैकी तुमच्या प्रश्नाला काय लागू पडेल हे पाहून वकीलांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावा, हे उचित.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles