टीम मैफल थकवा दूर करण्यासाठी आणि शरीर ताजेतवाने करण्यासाठी स्पा, मसाज यांसारखे विविध पर्याय आता उपलब्ध आहेत. मात्र, या दोन्ही गोष्टींसाठी भरपूर पैसे खर्च करावे लागतात. त्यासाठी हाती पुरेसा वेळही हवा. याला पर्याय आहे बाथ बॉम्बचा. तुलनेने स्वस्त हा उपाय आहे. बाथ बॉम्बमुळे शरीर ताजेतवाने होतेच, शिवाय सौंदर्यही खुलते, असे सौंदर्यतज्ज्ञ सविता श्रीवास्तव सांगतात. बाथ बॉम्बमध्ये ऑइल आणि बटर वापरले जाते. तुमची त्वचा कुठल्याही प्रकारची असली, तरी बाथ बॉम्बमुळे तिचे चांगल्या प्रकारे पोषण होते. अंघोळ करताना साबणाऐवजी बाथ बॉम्ब वापरता येऊ शकतो. साबण लावल्यामुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. बाथ बॉम्बमुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. सध्या घरगुती साबण तयार करण्याचे प्रमाण वाढते आहे, त्यांच्याकडून अशा प्रकारचे बाथ बॉम्ब तयार करून घेता येतील. ऑनलाइन शॉपिंग पोर्टलमध्येही बाथ बॉम्ब विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 'स्पा'सारखा अनुभव बाथ बॉम्ब हे रंगीबेरंगी चेंडूप्रमाणे दिसतात. साबणाला पर्याय म्हणून बाथ बॉम्ब वापरला जात असला, तरी साबणापेक्षा कितीतरी अधिक फायदा बाथ बॉम्बमुळे शरीराला होतो. साबण थेट अंगाला लावला जातो, तर बाथ बॉम्ब बाथ टबमध्ये टाकला जातो. तुमच्याकडे बाथ टब नसेल, तर बादलीमध्ये बाथ बॉम्ब टाकून त्या पाण्याने अंघोळ करता येते. बाथ बॉम्ब रंगीबेरंगी आणि एकाच रंगाचेही असतात. बाथ बॉम्ब पाण्यात टाकल्याबरोबर ते वितळायला लागतात आणि त्यातून फेस बाहेर येतो. रंगीत बाथ बॉम्ब वापरला, तर त्या बॉम्बच्या रंगाचे पाणी तयार होते. बाथ बॉम्ब एसेन्शियल ऑइल आणि बटर यापासून तयार केले जातात. त्यामुळे त्यापासून त्वचेला पोषण मिळते आणि बाथरूममध्ये त्याचा सुगंध दवळतो. बाथ बॉम्बने अंघोळ केल्यास घरच्या घरीच 'स्पा'सारखा अनुभव येतो. वापर कसा? बाथ बॉम्ब वापरण्यापूर्वी बाथ टब किंवा बादलीमधील पाणी गरम करून घ्या. घरी बाथ टब असल्यास पाणी थंड होईपर्यंत त्यातून उठू नका. बादलीत पाणी घेतले असेल, तर हळूहळू ते अंगावर घेत राहा. बाथ बॉम्बने अंघोळ केल्यामुळे त्वचा मऊ होईल आणि तकाकी येईल. वेगवेगळ्या रंगांचे बाथ बॉम्ब बाजारात उपलब्ध असतात. आपण ज्या रंगाचा बाथ बॉम्ब पाण्यामध्ये टाकू, त्याच रंगाच्या पाण्यानं अंघोळ करता येते. हे सुगंधित पाणी असते. एसेन्शियल ऑइल आणि सुगंधामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. शरीरातील पेशी रिलॅक्स होतात आणि मन प्रफुल्लित होते. मन एकाग्र होऊन डोकेही शांत राहते. एकदा बाथ बॉम्बने अंघोळ केल्यानंतर पुन्हा अंघोळ करण्याची गरज नाही. गरज वाटलीच, तर साध्या पाण्याने साबण न वापरता दुसऱ्यांदा अंघोळ करण्यास हरकत नसते. वेगवेगळ्या आकाराचे बाथ बॉम्ब बाथ बॉम्ब वेगवेगळ्या आकारांत आणि डिझाइन्सचे असतात. आपल्या गरजेनुसार ते वापरता येतात. मोठ्या आकाराचा बाथ बॉम्ब असेल, तर कापून त्याचे दोन ते तीन तुकडे करा. एक-एक तुकडा वेगवेगळ्या वेळी वापरता येईल. मात्र, कापलेल्या बाथ बॉम्बचे तुकडे हवेशीर ठेवू नका. ते हवाबंद डब्यात ठेवा. असे केल्याने बाथ बॉम्ब पुन्हा वापरण्यायोग्य राहतील. निद्रानाशावर उपाय निद्रानाशाची समस्या सतावत असेल, तर त्यावर बाथ बॉम्ब हा चांगला उपाय आहे. बाथ बॉम्बने अंघोळ केल्यास झोप चांगली लागते. झोपेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बाथ बॉम्बच्या पाण्यात कॅमोमॉइल ऑइल, लॅव्हेन्डर ऑइल आणि मॅन्डेरिन ऑइलचे प्रत्येकी दहा थेंब टाका. या मिश्रणाने अंघोळ केल्यास झोपेची समस्या नाहिशी होईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट