Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

चॅम्पियन्स

$
0
0

कॉलेजचा अभ्यास, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्सचा व्याप सांभाळत असतानाच अनेक तरुणी विविध खेळांमध्येही चमक दाखवताहेत. काहींनी आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करत चॅम्पियन बनण्याचा मानही पटकावला आहे. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या तरुण खेळाडूंच्या झगमगत्या यशाविषयी जाणून घेऊ, रविवारच्या 'जागतिक महिला दिना'निमित्त.

मधुरा वायकर, सायकलिंग

लहानपणी अनेक खेळांची आवड असल्यामुळे मधुरा अनेक खेळांमध्ये भाग घ्यायची. पण, वयाच्या दहाव्या वर्षी मधुरानं फक्त सायकलिंग करण्याचा निर्णय घेतला. तिथून तिचा सायकलिंगचा हा प्रवास सुरू झाला. मधुरा आता खालसा कॉलेजमध्ये एसवायबीएला शिकत असून ती गेल्या १० वर्षांपासून सायकलिंग करतेय. आयुष्यातल्या आपल्या ध्येयाकडे संपूर्ण एकाग्रतेनं कसं बघायचं हे मी सायकलिंगमुळे शिकले आहे, असं ती म्हणते. तिनं बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिला २०१६-१७मध्ये 'ट्रॅक एशिया कप' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आलं. आतापर्यंत तिनं एकूण २५ राष्ट्रीय पदकं पटकावली असून दोन वेळा तिला सायकलिंग खेळामध्ये राष्ट्रीय विजेतपददेखील मिळालं आहे. मधुरा सध्या मार्च महिन्यात होणाऱ्या 'नॅशनल ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप'साठी मेहनत घेतेय. यासाठी रोज ती सकाळी ५० ते ६० किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत असते. कामगिरी उंचवावी म्हणून ती व्यायाम, योग यासारख्या विविध गोष्टीदेखील नियमितपणे करते.

हिमानी परब, मल्लखांब

गेल्या १४ वर्षांपासून मल्लखांब करत असलेली हिमानी कीर्ती कॉलेजमध्ये बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. 'मल्लखांब करण्यासाठी स्पर्धेच्या वेळी फक्त दीड मिनिट देण्यात येतं. त्यामुळे मल्लखांब करत असताना जर दोरखंड मध्येच कुठे अडकला तर मल्लखांबमधला कोणता प्रकार करायचा हे लगेचच ठरवावं लागतं. या सरावामुळे जलद गतीनं विचार करण्याची माझी क्षमता वाढली', असं हिमानी सांगते. हिमानीला यासाठी कॉलेजकडून पूर्णपणे पाठिंबा मिळतो. पुढच्या आठवड्यात परीक्षा आणि तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा एकाच दिवशी आहे. परंतु कॉलेजकडून मिळणऱ्या पाठिंब्यामुळे ती स्पर्धेत सहभागी होऊ शकेल. २०२१ मध्ये रंगणाऱ्या 'वर्ल्ड चॅम्पियनशिप' स्पर्धेसाठी सध्या तिची तयारी सुरू असून, त्यासाठी ती रोज किमान ६ तास मल्लखांबचा सराव करतेय. मुंबईमध्ये २०१८-१९ साली झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिला वैयक्तिक पातळीवर पहिला पुरस्कार मिळाला होता.

अवंतिका चव्हाण, जलतरण

गेली जवळपास १८ वर्षं अवंतिका जलतरण करतेय. साठ्ये कॉलेजमधून तिनं नुकतंच पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे. 'खेळ माणसाला जितकं शिकवतो तितकं कुणीच काही शिकवू शकत नाही' असं ती म्हणते. गुवाहाटी येथे २०१५-१६ ला झालेल्या 'दक्षिण आशियाई खेळ' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला प्रथम क्रमांक मिळाला होता. बीएच्या पहिल्या वर्षाला असताना स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे तिला परीक्षेचं एकही सत्र देता आलं नाही. पण, कॉलेजचा तिला पाठिंबा असल्यानं तिनं पुन्हा पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केलं. सध्या अवंतिका 'नॅशनल गेम्स'साठी तयारी करत असून, त्यासाठी ती रोज किमान ४ तास पोहायचा सराव करतेय. आतापर्यंत तिनं ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्यात तिनं उत्कृष्ट १६ जलतरणपटूंमध्ये स्थान पटकावलं आहे. राष्ट्रीय खेळ पार पडल्यावर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारीला लागणार आहे.

अदिती दांडेकर, जिम्नॅस्टिक्स (ऱ्हिदमिक)

रुईया कॉलेजमध्ये बीएससीच्या शेवटच्या वर्षाला शिकणारी अदिती गेल्या १२ वर्षांपासून जिम्नॅस्टिक्स करतेय. जिम्नॅस्टिक्समध्ये लागणाऱ्या कौशल्यांचा अभ्यासामध्ये खूप फायदा झाल्याचा ती सांगते. २०१६, २०१८ आणि २०१९ मध्ये 'सिनियर एशियन चॅम्पियनशिप' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. शिवाय २०१८ साली झालेल्या 'वर्ल्ड चॅलेंज कप' आणि 'वर्ल्ड चॅम्पियनशिप' या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतदेखील तिनं भाग घेतला आहे. 'खेलो इंडिया' स्पर्धेत २०१९ आणि २०२० अशी सलग दोन वर्ष अदिती चॅम्पियन आहे. 'कॉलेजमधून पाठिंबा मिळत असल्यानं लेक्चर्सना न बसताही जिम्नॅस्टिक्सचा पुरेपूर सराव करायला मला वेळ मिळतो' असं ती सांगते. आता ती या वर्षी होणाऱ्या 'एशियन चॅम्पियनशिप' आंतराष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम ८ मध्ये स्थान पटकावण्यासाठी दिवसातले किमान ६ तास सराव करतेय.

संकलन - कौस्तुभ तिरमल्ले, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>