संसारात राहून, नित्याची कामे करून, देह-मनासह असण्याचे आणि मन:शक्तीच्या बळावर देहाच्या कक्षा भक्तीमध्येच मुरवून टाकण्याचे सामर्थ्य मुक्ता, जना, सोयरा, निर्मळा यांनी जोपासले, वाढविले. शरीराचा सन्मान वाढविणाऱ्या मन:शक्तीचा विकास करताना जो संघर्ष करावा लागतो, तो आजही संपलेला नाहीच. मराठी संत कवयित्रींचा मार्ग या साऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतो. मार्गदर्शन नक्कीच करतो. \Bडॉ. रूपाली शिंदे\B ज्ञानेश्वरांनी मांडलेली आणि वारकरी संप्रदायाने जपलेली, तसेच विकसित केलेली 'आपुला ठाय न सांडिता' चैतन्याशी एकरूप होण्याची वैशिष्ट्यपूर्ण भावरीत मराठी संत कवयित्रींनी आपलीशी केली. 'आपुला ठाय न सांडिता' हे स्त्रियांचे भावबळ झाल्याचे चित्र, संत कवयित्रींच्या जगण्यातून व रचनांमधून व्यक्त झाल्याचे दिसते. ती त्यांच्या जगण्याची, भक्तीची, भक्तीसह संसार करण्याची, चैतन्याशी एकरूप होण्याची जीवनवृत्ती झाली, हे अगदी स्पष्ट, स्वच्छ दिसते, जाणवते. मराठी संत कवयित्रींना भक्तीमार्गाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी मिळाली. कीर्तनात सहभागी होणे, एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी उत्सुक असणे. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी घरदार आणि समाज, सांस्कृतिक पुरुषसत्तेशी भक्तिकर्मप्रधान जीवनमार्गाच्या वाटेने सनदशीर बंड करणे. मुळात व्यक्त होण्यासाठी अभंग रचनेची अभिव्यक्ती, अवकाश प्राप्त होणे. त्यातून स्त्री असण्याचे सम्यक भान येण्याचा प्रवास होणे, ही सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रांतील उत्तुंग भरारी मारणे शक्य झाले. यामागे ज्ञानेश्वरांनी दाखविलेली, रचलेली विचारांची, तत्त्वज्ञानाची वाट हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. आपुला ठाय न सांडिता। आलिंगिजे चंद्रु प्रकटता। अनुरागु भोगितां। कुमुदिनी जाणे।। ही ज्ञानेश्वरांनी मांडलेली जीवनदृष्टी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. मराठी स्त्री संतांचे जीवन आणि काव्य आमूलाग्र स्वरूपात बदलण्यासाठी ही जीवनदृष्टी म्हणजे सत्त्वबीज आहे. आकर्षोनि चित्त चैत्यन्य। भरोनी ठेले लोचन। ध्यानी विसर्जिले मन। हा सदेहमुक्तीचा अनुभव ज्ञानेश्वरांनी मांडला. प्रसारित केला. त्याचे संस्कार सर्व जातीधर्माच्या स्त्रिया आणि पुरुषांच्या आध्यात्मिक जाणीवांवर झाले. बोली अरूपाचे रूप दावीन। अतींद्रिय परी भोगवीन। इंद्रियांकरवी।। हा अनुभव मराठी संत स्त्री-पुरुषांनी स्वत: घेतला. तो नुसता प्रत्यय अथवा अनुभव न राहता, ती त्यांची जीवननिष्ठा झाली. ज्ञानेश्वर अहंकार नाहीसा करण्यासाठी, मनातून अहंकाराची जाणीव विसर्जित करण्यासाठी चित्त एकाग्र करण्यास सांगतात. मनाला कर्तेपणापासून दुसरीकडे वळवतात. कर्तेपणाची भावना, लक्ष केंद्रित झालेले आहे, तिथून मनाला एकाग्र होण्यासाठी दुसरे व्यवधान लावतात. ते व्यवधान व्यवहारातील लाभ-हानी, मी-तूपण यांच्याहून उच्च, श्रेष्ठ आहे. तिचे 'मी'पण खूप छोटे, मी कुणीच नाही, अशा नसतेपणाच्या जाणीवेकडे घेऊन जाणारे आहे. जे मन बुद्धी इही। घर केले माझां ठायी। तरी सांगें मग काई। मी तूं ऐसे उरे।। सगळे 'मी'पण ईश्वरामध्ये सामावले जाते. मग मीपण असे उरत नाही. ज्ञानेश्वरांनी भक्तियोगावर म्हणजेच प्रेम-भक्तीला कर्माशी सोडून घेतले. सर्व कर्म, कर्तव्य प्रेमाने ईश्वराच्या चरणी अर्पण करायची हे तर झालेच; पण प्रत्येक काम हे त्याचेच, ते काम म्हणजेही तोच आहे, अशी एकरूप होऊन साक्षीभावाने काम करत राहणे, असा भक्ती-कर्मयोग ज्ञानेश्वरांनी मांडला. म्हणोनि प्रवृत्ती आणि निवृत्ती। इयें वोझी नेंघे मती। अखंड चित्तवृत्ती। आठवी मातें। अशा तन्मयतेचा परिणाम म्हणजे देहजाणीवेची मर्यादा स्पष्ट होते. अहंकार जागविणारी बुद्धी आणि चपळ, चंचल, वश-प्रवण असे मन ईश्वराच्या नामस्मरणामध्ये विसावते. तिथेच रमते. शरीराच्या 'मी'पणामध्ये गुंतून पडलेले मन-बुद्धी मुक्त होतात. 'अमृतानुभवा'मध्ये त्याचे वर्णन एवं वस्तूशी जाणो जाता। जाणणेंचि वस्तु तत्त्वतां। मग जाणणे आणि जाणतां। कैचा उरे।। असे केले आहे. देहभाव अध्यात्माच्या भांडारामध्येच साठविल्यानंतर तो वेगळा उरतोच कुठे? नामदेव त्याचे वर्णन, आम्ही देह केले दुकान। तेथे सांठविले ब्रह्मज्ञान। असे करतात. माझा भाव तुझे चरणी। तुझें रूप माझें मनी।। सापडलो एकमेकां। जन्मोजन्मी नाही सुटिका।। त्वां मज केले रे विदेही। म्यां तुज धरिले हृदयी। त्वां तोडिली माझी माया। मी जडलो तुझ्या पायां। नामा म्हणे गा सुजाणा। सांग ठेकिले कोणकोणा।। वारकरी संप्रदायाची प्रेमभक्तीभावाच्या माध्यमातून मनाचे सामर्थ्य वाढविणारी, देहभावातून मनाला मुक्त करणारी तल्लीनता महत्त्वाची दृष्टी आहे. मन झाले उन्मन वासना तल्लीन। देखिले हरिचरण सर्वांठायी। या नाम-प्रेम भक्तीमुळे आपल्याच शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. देह म्हणजेही तोच. 'नामा पाहे देही तंव उभा चहूं बाही। दिशाद्रुमित दाही हरि दिसे।' अशी आपल्याच देहाकडे पाहण्याची नवी दृष्टी भक्ताला प्राप्त होते. देहाचे असणे नाकारण्याची वेळ वारकरी संप्रदायातील कोणत्याही संत कवयित्रीवर आली नाही. देहाची सुंदरता, कुरूपता यांचे कोणतेही वर्णन स्वत:च्या संदर्भात करावे, अशी गरज मुक्ता, जना, सोयरा, बहिणा यांना जाणवलीच नाही. स्त्रीदेह हा भक्तिमार्गातील अडथळा आहे, असे वर्णन मराठी संत कवयित्रींनी केलेले नाही. स्त्रीच्या शरीरावर मालकी हक्क गाजविण्याचा अनुभव बहिणाने व्यक्त केला; पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न करताना अनुभविलेले सदेह मुक्तीचे तत्त्व हे तिच्यातील आंतरिक परिवर्तनाचे प्रमुख कारण आहे. देहाचा पालट विठोबाचे भेटी। जळ लवणां गांठी पडोन ठेंली।। धन्य मायबाप नामदेव माझा। तेणें पंढरिराया दाखविले।। रात्रंदिवस भाव विठ्ठलाचे पायीं। चित्त ठायीचे ठायी मावळले।। संसारात राहून, नित्याची कामे करून, देह-मनासह असण्याचे आणि मन:शक्तीच्या बळावर देहाच्या कक्षा भक्तीमध्येच मुरवून टाकण्याचे सामर्थ्य मुक्ता, जना, सोयरा, निर्मळा यांनी जोपासले, वाढविले. शरीराचा सन्मान वाढविणाऱ्या मन:शक्तीचा विकास करताना जो संघर्ष करावा लागतो, तो आजही संपलेला नाहीच. शिक्षण, अर्थार्जन, स्वावलंबन, सक्षमीकरण या साऱ्या स्थित्यंतरांमधून जाणाऱ्या आजच्या स्त्रीला तिचे देहनिष्ठ असणे साधन झाल्याचा अनुभव येत आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनामध्ये 'स्त्री देह' ही युद्धभूमी झाल्याचे विदारक चित्र आजही दिसतेच आहे. मराठी संत कवयित्रींचा मार्ग या साऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतो. मार्गदर्शन नक्कीच करतो. (समाप्त)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट