कित्येक वर्षे चूल आणि मूल इतपतच मर्यादित स्त्रीचं अस्तित्व होतं. कालांतराने मुली शिकू लागल्या, नोकरी करू लागल्या. आपल्या स्वप्नांच्या वाटेवर वेगाने धावू लागल्या. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार झाला. मात्र समाजातील सर्वच भागातून त्याची अंमलबजावणी झाली नाही. यातून निर्माण झाली ती एक मोठी दरी. महिलांचे दोन गट पडले. एक नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा आणि दुसरा गृहिणींचा.
नोकरी करणाऱ्या स्त्रिया समाजात वावरू लागल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या. गृहिणी मात्र पुन्हा एकदा, त्याच चौकटीत बंद झाल्या. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची महती त्यांच्या कानी पडू लागली आणि मग आपणही काहीतरी करावं, घराबाहेर पडावं, स्वावलंबी व्हावं हा विचार त्यांच्या मनात घर करू लागला. यातून साकारली ती ही 'भिशी'ची कल्पना. यात प्रत्येकीने दरमहा ठरलेली रक्कम जमा करायची, प्रत्येकीने एकदा तरी आपल्या घरी भिशीचं आयोजन करायचं, छान बेत आखायचा, भिशीच्या सर्व सदस्यांनी जमायचं, मनमुराद गप्पा मारायच्या आणि वर्षाअखेरीस मिळणाऱ्या पैशांतून आपली हौस पुरवायची, अशी ही भिशीची संकल्पना. भिशीच्या निमित्ताने गृहिणी घराबाहेर पडू लागल्या. चार-चौघीत का असेना आपली मतं मांडू लागल्या. खाणं-पिणं, गप्पा-गोष्टी यातून त्यांचा विरंगुळा होऊ लागला. आपलं मन मोकळं करायची हक्काची जागा त्यांना मिळाली. मग सासू-सून, मुलं-बाळं, शेजाऱ्या-पाजऱ्यापासून ते राजकारण, समाजकारण, पुस्तकं, पर्यटनापर्यंतच्या चर्चा या भिशीच्या निमित्ताने होऊ लागल्या आणि महिलांना एक मोकळं आकाश मिळालं. काही भिशी गटांनी साठवलेले पैसे समाज हितासाठी वापरले, काहींनी त्यातून पुस्तकांचा साठा केला. काहींनी नव-नवीन शिकण्या-शिकवण्याचा पण केला, तर काहींनी भजन संध्या, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. काहींनी आपण वाचलेल्या पुस्तकांचं सार सांगितलं तर काहींनी पुस्तक वाचनाला प्राधान्य दिलं.
बदलत्या काळानुरूप समाजही बदलला आणि स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. जसजसा शिक्षणाचा प्रसार होत गेला तस-तशा स्त्रिया दोन्ही बाजूंनी अडकत गेल्या. एकीकडे बाहेरचं जग त्यांच्यासाठी खुलं तर झालं; मात्र घरातल्या जबाबदाऱ्यांपासून मुक्ती काही मिळेना. घर सांभाळता सांभाळता आता नोकरी, व्यवसायाच्या अमाप जबाबदाऱ्यादेखील त्यांच्या खांद्यावर पडत राहिल्या. या सगळ्यातून स्वतःला वेळ द्यायला मात्र त्या विसरल्या. सुपरवूमन बनून दिवस-रात्र सगळं व्यवस्थित सांभाळू लागल्या. स्वतःसाठी काहीतरी करण्यासठी ना त्यांना वेळ उरला ना शक्ती. अशात भिशीच्या जुन्या कल्पनेला नवं वळण मिळालं ते म्हणजे किटी पार्टीचं. केवळ गृहिणीच नव्हे तर नोकरी करणाऱ्या स्त्रियादेखील या संकल्पनेचा भाग होऊ लागल्या. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, महिन्यातून एखाद्या दिवशी दोन-तीन तास वेळ काढत, कुठलीही चिंता ना करता, सगळी बंधनं झुगारून मनमोकळेपणाने जगण्याचा सुवर्ण मार्गच त्यांना मिळाला. मैत्रिणींबरोबर गप्पा मारायच्या, मनसोक्त गायचं-नाचायचं आणि भरपेट खायचं. काही काळ का होईना, ऑफिसमधील-घरातील कटकटी बाजूला ठेवून जगण्याचा आनंद लुटायचा. या किटी पार्टीत मग कुणी आपली नाचाची हौस भागवू लागलं, तर कुणी वाचनाची आवड जोपासू लागलं. कुणी शिवणकाम, कुणी चित्रकला तर कुणी पाककलेच्या रंगीत दुनियेत रमलं. समाजात निर्माण झालेली दरी आता हळू-हळू मिटू लागली. गृहिणींना नोकरी करणाऱ्या स्त्रियांची तर नोकरी करणाऱ्या स्त्रियांना गृहिणींची साथ मिळू लागली. एकमेकींची सुख-दुःख, अडचणी एकमेकीला समजू लागल्या. मग बरं नसतांना कधी भिशीतील एका काकूंनी डबा आणून दिला, तर कधी बँकेत काम करणाऱ्या वहिनींनी काकूंना बँकेच्या कामात मदत केली. आपसातील गैरसमज टाळून छान मैत्रीची सुरुवात या किटी पार्टीमुळे झाली. आपल्यासाठी काढलेले हे दोन-तीन तास म्हणजे या महिलांसाठी विरंगुळा आणि हक्काचं व्यक्त होण्याचं ठिकाण आहे. काय असतं त्या किटी पार्टीत.. निव्वळ टाईपास!, असं समजणाराही एक वर्ग आहेच आपल्या आजूबाजूला. पणहा निव्वळ टाइमपास करणंही आपली मानसिक गरज आहे. आणि सदासर्वकाळ जबाबदाऱ्यांच्या गराड्यांमध्ये वेढलेल्या महिलांना टाइमपास करण्यासाठी एक हक्काची स्पेस देण्याचं काम ही किटी पार्टी करतेय.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट