Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कॅन्सरचे संक्रमण होताना...

$
0
0

वंदना अत्रे

गेल्या दहा वर्षांत, २००८ ते २०१७ या काळात तीन वेगवेगळ्या कॅन्सरवर उपचार घ्यायची वेळ आली तेव्हा प्रथमच मनात काही प्रश्न पडू लागले. वंशपरंपरेने ही 'मौल्यवान भेट' आपल्याला मिळाली आहे की काय? मग कानावर येऊ लागले माझ्याच कुटुंबात यापूर्वी मुक्कामी येऊन गेलेल्या याच आजाराचे ओझरते उल्लेख. माझ्या तीन आज्यांनी (आईच्या मावश्या) वेगवेगळ्या काळात सहन केलेल्या, आधुनिक उपचार उपलब्ध नसताना धीटपणे स्वीकारलेल्या स्तनाच्या कॅन्सरचे. अर्थात प्रत्येकच कहाणीत ही धीटपणाची चमक नव्हती. स्तनात असलेली गाठ आपले अस्तित्व पुन्हा-पुन्हा सांगत असताना तिच्याकडे पाठ फिरवून तिला नाकारणाऱ्या आणि मृत्यू स्वीकारणाऱ्या एकीची दुर्दैवी कहाणी पण त्यात होती. साठच्या दशकापासून आजपर्यंत आमच्या एका कुटुंबात माझ्यासकट सहा जणांची या आजाराने मोठ्या प्रेमाने गळाभेट घेतली. कधी आम्हा प्रत्येकाच्या लढण्याच्या जिद्दीने या आजाराला दोन पावले मागे जायला लावले. कधी पलटवार करीत त्याने आम्हाला निराशेच्या खोल गर्तेत भिरकावून देत आमची परीक्षाही घेतली. माझी आई सांगायची, तिच्या लहानपणी त्या आठ भावंडांपैकी एकाने जरी काही आगळीक केली तरी तिची आई आपल्या आठही मुलांना ओळीने उभे करून पायावर पट्टीने फटके मारीत असे! आम्हा सहा जणांना हा आजार असाच ओळीत उभे राहून चाबकाने फटकारून काढतो आहे, असे स्वप्न मला कितीदा तरी पडायचे. तेव्हा मनात आले, अशी शिक्षा झालेले कुटुंब फक्त आपलेच की आणखीही. असतील त्याच्या तावडीत सापडलेली कुटुंबे. असणारच की! शोध सुरू केल्यावर निर्भय, शांतपणे वस्तुस्थिती स्वीकारणारी अशी कुटुंबे भेटणे फार अवघड नाही गेले. डॉ.(कै.)शांताबाई कुलकर्णी आणि त्यांची मुलगी डॉ. विजया सुळे. थ्रीटी पटेल आणि त्यांची मुलगी डेलनाझ, डॉ. अर्चना बोधले आणि त्यांच्या सासूबाई मंदाकिनी. या सगळ्यांशी बोलताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली महत्त्वाची, आधुनिक विज्ञानाने कॅन्सर उपचारांमध्ये घेतलेली भली थोरली झेप आणि त्यामुळे या आजाराचे बदललेले चित्र आणि दुसरी, कॅन्सरसारख्या एखाद्या मोठ्या आजाराचे अवघड वळण समोर आले तरीही स्त्रिया सहसा त्याच्यासमोर हात टेकत नाहीत. (पुरुषही टेकत नसणारच..!), आपापल्या परीने जो-तो त्याला भिडत राहतात. दृष्टिकोन वेगळे असतील. पण अंतिम उदिष्ट्य एकच, ताठ मानेने पुन्हा उभे राहण्याचे!

परिस्थितीने समोर आलेले आव्हान, पुढे ठाकलेले वास्तव म्हणून स्वीकारणे हे डॉ. शांताबाई आणि डॉ. विजया यांचे कौशल्य. जे घडणार आहे ते अटळ आहे ही यामागची स्वीकाराची भावना. शांताबाई वयाच्या साठीमध्ये असताना, १९७६ साली त्यांना फॅलोपीन ट्यूबचा, त्यावेळी अतिशय दुर्मिळ कॅन्सर झाला. या कॅन्सरच्या तेव्हा संपूर्ण जगात अवघ्या १४-१५ केसेस होत्या. शस्त्रक्रिया करणे अशक्य आहे, शेवटचे जे काही दिवस उरले आहेत ते घरी सुखाने काढू द्या असा अगदी प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला पण तरी एकदा अखेरचा प्रयत्न म्हणून टाटा मेमोरियलचे तत्कालीन प्रमुख डॉ. प्रफुल्ल देसाई यांच्याकडे डॉ. विजया आईला घेऊन गेल्या. ते म्हणाले, शस्त्रक्रिया शक्य नाही असे वाटतेय, पण पोट उघडून बघूया. काही करणे खरोखर अगदी अशक्य आहे असे वाटले तर पुन्हा बंद करू..! अतिशय अशक्य, कदाचित निरुपयोगी ठरू शकेल असे हे ऑपरेशन करण्याची शांताबाईंची पूर्ण तयारी होती. डॉक्टरांनी पोट उघडले, आत जे दिसत होते ते अतिशय अवघड होते. त्यामुळे शस्त्रक्रिया न करण्याचाच निर्णय झाला. पण अक्षरशः एखादा चमत्कार वाटावा तसे घडताना डॉक्टरांना दिसले. पोटातील अनेक अवयवांना चिकटला आहे असे वाटणारा तो ट्युमर सुटत गेला आणि अशक्य वाटणारी शस्त्रक्रिया बघता-बघता आवाक्यात आली. शस्त्रक्रियेनंतर शांताबाई एक-दोन नाही तर चक्क ३०-३२ वर्षे जगल्या. जग फिरून आल्या. दर पाच वर्षांनी त्यांना टाटा मेमोरियल कडून त्या जिवंत आहेत का, त्याबाबत चौकशी करणारे पत्र येत असे. २० वर्षानंतर तीही बंद झाली. शांताबाईंच्या कॅन्सरनंतर तीस वर्षांनी त्या कुटुंबात पुन्हा हा आजार आला. डॉ. विजया यांना स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्या बहिणीलाही या कॅन्सरने डंख मारला होताच. जवळजवळ तीन पिढ्यांनंतर हे घडत होते तेव्हा काय-काय बदल जाणवले? डॉ. विजया म्हणतात, शस्त्रक्रियेची कौशल्य माझ्या आईच्या काळात सुद्धा होतीच पण केमोथेरपी-रेडीएशनचे इतके प्रभावी उपचार अजिबात उपलब्ध नव्हते. कॅन्सरबद्दल आता समाजात होऊ लागलेली जागृतीही तेव्हा नव्हती. ते भान वाढल्यामुळे निदान लवकर करून घेण्याचा आग्रह वाढला. त्यामुळे उपचार लवकर मिळू लागले. गेल्या काही दशकांत, या आजाराकडे बघण्याची समाजाची दृष्टी प्रगल्भ होते आहे असे त्यांना वाटते. अर्थात तरीही कॅन्सरशी अनिवार्यपणे जोडले गेलेले मृत्यूचे भय आजही आहेच. निदान झाल्यापासून प्रत्येक रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनावर असलेली ही मृत्यूची सावली दूर करणे, त्यातून त्यांना जीवन सन्मुख करणे हे काळाचे आव्हान आहे.

हे आव्हान पेलण्यासाठी सर्वाधिक उपयोग होतो तो कुटुंब आणि तुम्ही जोडलेली माणसे यांचा, असा डॉ. अर्चना बोधले यांचा अनुभव आहे. बोधले कुटुंब हे आता-आतापर्यंत एकत्र राहणारे २० माणसांचे कुटुंब. ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यावर मनात दाटून आलेली अनिश्चितता, हतबलता, दुःख, भीती या सगळ्याचा विसर पडू शकला तो एकत्र कुटुंबामुळे आणि आधार देत असलेल्या अनेक मित्रांमुळे. एकत्र कुटुंबात वावरतांना सगळ्या नकारात्मक भावना जणू हे कुटुंब शोषून घेत असते. एकटं बसण्यासाठी किंवा एकाकी वाटावे असा अवकाशच इथे मिळत नाही, असे त्या म्हणतात. दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या सुनेला कॅन्सरच्या उपचारांच्या चक्रातून जाताना बघत असलेल्या सासूबाई, मंदाताई यांनाही अकस्मात कॅन्सरने गाठले तेव्हा सगळे कुटुंब हादरले..! त्यांना स्वतःला या आजाराची चाहूल लागली तेव्हा त्याही अस्वस्थ झाल्या. पण त्यांना हिंमत दिली ती त्यांनी जवळून बघितलेल्या अर्चनाच्या प्रवासाने. कॅन्सर म्हणजे आयुष्याचा शेवट नाही हे त्यांनी प्रत्यक्ष बघितले होते आणि त्यामुळेच त्यांनाही लढण्याचे बळ मिळाले! अशा प्रकारचा अनुभव घरातच मिळावा हा जेवढा शाप तेवढा वरही ठरावा ना...! स्त्रियांना परावलंबी राहणे फारसे आवडत नाही त्यामुळे हे आजारपण असतांना त्या स्वतःला सक्रीय ठेवतात आणि आजार विसरून जाऊ शकतात असे म्हणणाऱ्या डॉ. अर्चना पुन्हा कामाला लागल्या आहेत!

दोन पिढ्यांना होणाऱ्या कॅन्सरच्या वेदना थ्रीटी पटेल यांच्या कुटुंबाच्या वाट्यालाही आल्या तेव्हा 'आपल्यालाच का?' या सनातन प्रश्नाने थ्रीटी यांना अस्वस्थ केले. नाशिकमध्ये कॅन्सर उपचार अगदी प्राथमिक अवस्थेत असताना थ्रीटी यांना अकस्मात स्तनाच्या कॅन्सरच्या निदानाला सामोरे जावे लागले. निदान झाले तेव्हा त्या एका शाळेच्या प्राचार्या असल्याने त्यांनी आपला आजार फार जाहीरपणे न बोलण्याची काळजी घेतली आणि कणखरपणे उपचार पार पाडले. त्या खऱ्या अस्वस्थ झाल्या ते पुन्हा मुलीला याच कॅन्सरने गाठले तेव्हा..! आमच्या गप्पांमध्ये त्या बोलत होत्या, ते त्यांच्या पारशी समुदायामध्ये वाढत असलेल्या कॅन्सरच्या प्रमाणाबद्दल. वेदनांचा अनुभव व्यक्तीला समष्टीपर्यंत घेऊन जातो हा प्रत्यय देणारे ते बोलणे होते. कॅन्सरसारखा गंभीर आजार एकाच कुटुंबातील काही पिढ्यांमधून प्रवास करतांना दिसतो ही बाब अभ्यासकांच्या नजरेतून नक्कीच सुटली नसेल. या प्रश्नाकडे कुतूहलाने दुरून बघणाऱ्या माझ्यासारख्या सामान्यांना जाणवणारी बाब कोणती? आपल्या आयुष्यातील जिव्हाळ्याच्या माणसांचे महत्त्व! कोविडनेही दिलेला धडा हाच आहे की...!

(लेखिकेने तीनवेळा कॅन्सरवर मात केलेली आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>