लग्न करताना नवरा बायकोपेक्षा जास्तच शिकलेला हवा, ही मानसिकता बदलण्याची वेळ आता आली आहे. कारण ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात असं स्पष्ट झालंय की, नवऱ्याबद्दलच्या या अपेक्षा न बदलल्यास २०५०पर्यंत भारतीय मुलींना अनुरूप जोडीदार मिळणं कठीण जाईल.
आपला नवरा आपल्यापेक्षा वयाने, उंचीने आणि शिक्षणाने मोठाच असायला हवा. असा सर्वसाधारण आग्रह आपल्याकडे अजूनही दिसतो. नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवत ऑक्सफर्ड विद्यापीठाने एक सर्वेक्षण केलं होतं. यात असं दिसून आलं की, 'नवरा बायकोपेक्षा सर्व बाबतीत उजवा असायला हवा' ही मानसिकता बदलली नाही तर २०५०पर्यंत भारतीय मुलींना अनुरूप जोडीदार मिळणं कठीण जाईल. 'द इंटरनॅशनल इन्स्टट्यिूट फॉर अप्लाइड सिस्टीम्स अँड व्हिएन्ना इन्स्टट्यिूट ऑफ डेमोग्राफी'च्या अहवालात याला पुष्टी देणारे निष्कर्ष समोर आलेत. त्यानुसार २०१०मध्ये २५ ते २९ वयोगटातील १५१ पुरूषांमागे १०० उच्चशिक्षित स्रिया होत्या. तर २०५०मध्ये ९२ पुरूषांच्या मागे १०० उच्चशिक्षित स्रिया असतील, असा अंदाज आहे.
उच्चशिक्षति मुलींचं प्रमाण वाढतंय, ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट नक्कीच आहे. पण लग्नाच्या बाजारातली काही गुणोत्तरं बदलण्याची खरंतर ती अधिक प्रगल्भ करण्याची नक्कीच गरज आहे. हेच या अहवालातून स्पष्ट होतंय. त्यासाठी आवश्यकता आहे, मानसिकता बदलण्याची. याविषयी तरुणाई काय म्हणते, हेसुद्धा आम्ही जाणून घेतलंय.
तरूणाई म्हणते
शिक्षणामुळे नात्यात कमीजास्तपणा येत नाही. माझी जोडीदार माझ्यापेक्षा जास्त शिकलेली असेल तर मला आनंद आणि अभिमानच वाटेल.
- केदार खांबेटे, लॉ विद्यार्थी
बायको नवऱ्यापेक्षा जास्त शिकलेली असू शकते आणि ती योग्य निर्णय घेऊन उत्तम घर सांभाळू शकते, हा बदल समाजाने आत्मसात केला, तर नक्कीच ही समस्या राहणार नाही.
-सायली बेहेरे, एमएससी
मुलीचं शिक्षण हा तिच्या लग्नातला अडथळा ठरू नये. पण उच्चशिक्षित मुलीला तिच्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा चालत असेल तर समाजानेही अशा जोड्यांवर टीका करू नये.
-अनिकेत अभ्यंकर, जपानी भाषेचा विद्यार्थी
जोडीदार निवडताना फक्त त्याचं शिक्षण हा एकच मुद्दा असू शकत नाही. मुला-मुलींबरोबर समाजानेही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
-श्रुती आपटे, सीए आर्टीकलशिप
सध्याचा ट्रेंड काय सांगतो?
आजकाल गरीब घरातल्या मुलीही शिक्षण घेताना दिसतात. पण मुलांमध्ये ते दिसत नाही. आपल्यापेक्षा जास्त शिकलेली बायको स्वीकारण्यास मुलांची तयारी असते. पण त्यांच्या कुटुंबाची नाही. शिवाय मुलीही स्वतःपेक्षा कमी शिकलेला नवरा पसंत करत नाहीत.
- अश्विनी लाटकर, कौन्सेलर
संकलन- दीपश्री आपटे, कॉलेज क्लब रिपोर्टर