परीक्षा शब्द ऐकला की एक वेगळ्याच प्रकारची भीती वाटते. लहानपणच्या परीक्षा आठवतात. त्यात झालेली गडबड आठवते. तेव्हा आलेला ताण, त्यातून काढलेला मार्ग...या सगळ्या आठवणी येतात. अशाच काही अडचणींचे आणि आठवणींचे किस्से वाचकांनी शेअर केले आहेत.
गणित सोडवलंच
मी आधीपासूनच अभ्यासू होते. एखादी गोष्ट मला का येत नाही याचा विचार करून त्यावर मेहनत घेण्याचा माझा स्वभाव. शाळेत माझा गणित हा विषय फारच कच्चा होता. बाकीचे विषय चांगले असले तरी गणितामुळे आपली दांडी उडते की काय अशी भीती वाटू लागली. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी तयारी करताना मी चांगलीच घाबरले होते. काहीही करून गणितावर मेहनत घ्यायची असा ध्यास मी घेतला. परीक्षेच्या काही महिने आधीपासून मी गणिताच्या सरावाला लागले. पुस्तकातली सगळी गणितं पुन्हा पुन्हा सोडवून साधारण आठ मोठ्या वह्या भरतील इतका सराव केला. बाकीच्या विषयांना मी अगदी मोजून वेळ दिला पण गणिताचं भूत मात्र रात्रंदिवस माझ्या डोक्यावर बसलेलं असायचं. या विषयात आपण पास होऊनच दाखवायचं या वेडापायी मी इतकी मेहनत केली की माझा पेपर तर चांगला गेलाचं पण पुढे जाऊन इंजिनीरिंग करायचं धाडस माझ्यात निर्माण झालं.
- रेश्मा गायकवाड, व्यावसायिक
घोळात घोळ
मी प्राध्यापक असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा याच माझ्या परीक्षा असतात. तोच तणाव अगदी प्रत्येक परीक्षेला जाणवतो. पण माझ्या कायम लक्षात राहिलेली परीक्षा म्हणजे माझी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची परीक्षा! बी. एस. सी. करत असताना मी झू लॉजि हा विषय घेतला होता. या विषयाचे तीन पेपर कायम एकाच क्रमाने असायचे. नेमक्या माझ्या परीक्षेच्या वेळी सरांनी हा क्रम बदलला. मी नेहमीप्रमाणे अभ्यास करून कॉलेजात गेले आणि पेपरच्या अर्धा तास आधी हा घोळ माझ्या लक्षात आला. मी ज्या पेपरचा अभ्यास करून गेले होते तो पेपर दुसऱ्या दिवशी होता आणि प्रत्यक्ष त्या दिवशी वेगळाच पेपर होता. झालेला गोंधळ लक्षात येताच मी कोलमडून गेले. आता आपलं काही खरं नाही या भीतीने थरथर कापू लागले. खूप रडले. माझ्या बाबांनी आणि सरांनी खूप समजावल्यावर मी पेपर लिहायची तयारी दाखवली. घाबरतच परीक्षा हॉलमध्ये गेले. पेपर हातात आल्यावर एक क्षण काहीच आठवेना, पण नंतर मात्र सगळं लक्षात यायला लागलं. सरांच्या शिकवण्याकडे लक्ष देत असल्यामुळे माझी या विषयाची तयारी वर्गातच झाली होती. घाबरले असले तरी आत्मविश्वासाने परीक्षा पार पडली. काही दिवसांनी निकाल लागल्यावर समजलं की मी त्या पेपरमध्ये वर्गात पहिली आले होते.
- डॉ. अर्चना अष्टेकर, प्राध्यापक
धावपळ
फेब्रुवारी- मार्च म्हणजे परीक्षेचा व्हायरस घुसण्याचा काळ. त्यातही दहावीची बोर्डाची परीक्षा म्हणजे एक सोहळाच असतो. माझं परीक्षेचं सेंटर घरापासून लांब होतं त्यामुळे जायला यायला आम्ही तिघी मैत्रिणींनी एक रिक्षा ठरवली होती. परीक्षेची वेळ दुपारी अकराची असल्यामुळे अभ्यासाच्या ताणाबरोबर उन्हामुळेही आम्ही दमून जायचो. घाम पुसत शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तकात डोकं खुपसणाऱ्या आम्ही आज आठवलो तरी हसू येतं. याच परीक्षेच्या काळात एकाच दिवशी दोन पेपर होते. दोन्ही पेपर्सची केंद्र वेगवेगळी आणि एकमेकांपासून लांब. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! टेन्शनमध्ये असताना धावत पळत दोन्ही पेपर पार पाडले. उन्हाळा आणि परीक्षा या दोन गोष्टी एकत्र आल्या की त्याचा ताण आणखीच वाटतो. यावर्षी माझ्या मुलाची दहावी असल्याने पुन्हा एकदा परीक्षेचं व्हायरस घरात घुसलाय.
- संध्या कुलकर्णी, गृहिणी
आनंदीआनंद
माझ्या काळात अकरावी मॅट्रिक परीक्षा असायची. सध्याच्या दहावीइतकी त्याची हवा नसली तरी ती परीक्षा अवघड असायची. आत्तासारखे भरपूर मार्क मिळायची पद्धत त्या काळी नसल्यामुळे पास होणं हीच खूप मोठी गोष्ट वाटायची. मला शिक्षणाची आवड होतीच शिवाय अभ्यासाची तयारी होती. या परीक्षेच्या आठवणी काहीशा धूसर झाल्या आहेत पण निकालाचा दिवस मात्र अजूनही माझ्या लक्षात आहे. १९६९ साली परीक्षा झाल्यावर काही महिन्यांनी निकाल जाहीर झाला. आमच्या शेजारी राहणारे आणि मला बहिण मानणारे 'बाबा' माझा निकाल बघायला गेले. रात्री १२ ला ते परत आले आणि जाहीर केलं की, मी शाळेत मुलींमध्ये पहिली आले होते. सगळ्यांनाच आनंद झाला. त्या रात्री सगळे शेजारी घरी आले होते. गोडधोडाचं खाणं आणि गप्पा टप्पा रात्री २ पर्यंत चालू होत्या. या निकालाने माझ्या पुढच्या शिक्षणासाठीही मला खूप प्रोत्साहन मिळालं त्यामुळे या आठवणी कायम लक्षात राहिल्या.
- वैशाली कुलकर्णी, संगीत शिक्षिका
पडू आजारी
मी शाळेत असताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळत असे. माझा बराच खेळाच्या सरावातच जाई. परीक्षेच्या एक दोन महिने आधी अभ्यासाची आठवण यायची. पण मी चिक्कार अभ्यास करत असे. पहिल्या तीन नंबरात यायचं हे डोक्यात पक्कं होतं. त्या काळात मग इतर गोष्टी पूर्णपणे बंद ठेऊन अभ्यासाला प्राधान्य द्यायचे. आई-वडील दोघंही शिक्षक असल्याने त्यांनी अभ्यासाचं महत्व समजावून दिलं होतं. दहावीच्या वर्षात मात्र अगदी पहिल्या दिवसापासून अभ्यास केल्यामुळे परीक्षेच्या वेळी फारसा ताण जाणवला नाही. पण माझ्या बाबतीत परीक्षा आणि आजारपण हे समीकरण ठरलेलं होतं. मी अभ्यासात इतकी बुडून जात असे की, खाणं-पिणं-झोपणं याकडे साफ दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळे मी नेहमी हमखास आजारी पडायचे. पुढच्या वेळी असं करायचं नाही, हे ठरवूनही दरवर्षी त्याचीच पुनरावृत्ती करायचे.
- माया मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
घड्याळाची गंमत
शाळेची परीक्षा म्हटली की ती कधी चालू होते यापेक्षा कधी संपते याकडे आमचं जास्त लक्ष असायचं. सुट्टीचे बेत आखण्यात आम्ही इतके मग्न व्हायचो की, परीक्षा आली कधी नी गेली कधी कळायचंचं नाही. चौथीपर्यंत तोंडी परीक्षा असल्यामुळे पाचवीत पहिल्यांदा लेखी परीक्षेचा सामना करावा लागला. आपल्याला किती आणि कोणते पेपर असतात? याबाबत बेफिकीर राहिल्यामुळे परीक्षेचा एक पेपरच चुकला. त्यावेळी पालकांचं दडपण नसल्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त राहून परीक्षा द्यायचो. नववीची परीक्षा माझ्या कायम लक्षात राहिली. त्यावेळी घड्याळं घालून जायची अगदी नवीन पद्धत होती. खूप कमी मुलांकडे घड्याळं असायची. माझ्याकडे असलं तरी ते परीक्षेत घालून जायचा मी हट्ट केला. त्यात आकडे नव्हते, फक्त रेषा होत्या आणि त्याची सवय नसल्यामुळे मी पुरती गोंधळून गेले. आपला वेळ संपत आला की, काय या भीतीने मी भरभर लिहू लागले. शेवटी माझी ती गडबड पाहून बाईंनी मला त्याचं कारण विचारलं. आणि मला म्हणाल्या, काळजी करू नकोस. अजून एक तास शिल्लक आहे, तू सावकाश लिही. घड्याळानं आपली फजिती केली ही गोष्ट लक्षात येताच मला हसू फुटलं. नंतर शिक्षिकेचा पेशा स्वीकारल्यामुळे आताच्या परीक्षांमध्ये झालेला बदल मी अगदी जवळून बघू शकते.
- वृषाली सावळेकर, शिक्षिका
संकलन : आकांक्षा मारुलकर