गेल्या वर्षभरापासूनच 'त्या' रिक्षा चालवत आहेत. शिवाईनगर, कोकणीपाडा, उपवन परिसरात त्या 'रिक्षावाल्या वहिनी' म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांचे नाव अनामिका भालेराव. पती अविनाशही रिक्षा चालवतात. अनामिकाताईंनी लोकांच्या घरी स्वयंपाकांची कामे केली, हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. पण, महागाईमुळे घरच्या खर्चाचा मेळ काही साधत नव्हता. त्यातच शंतनू आणि दुर्वास या दोन्ही मुलांना सांभाळण्याची तारेवरची कसरत त्यांना करावी लागत होती. कामाची वेळ चुकली किंवा खाडा झाला, तर पैसे कापले जायचे. त्यामुळे मुलांचेही योग्य संगोपन, शिक्षण होईल आणि बऱ्यापैकी अर्थार्जनही होईल, असे काही तरी करायचे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. अविनाश यांनी त्यांना रिक्षा चालवण्यास शिकवले. गेल्या वर्षभरापासून त्या शिवाईनगर ते ठाणे स्टेशन दरम्यान रिक्षा चालवतात. मुले शाळेत गेल्यावर सकाळी ९ वाजता त्या रिक्षा काढतात ते दुपारी दीड वाजता मुले शाळेतून परतण्यावेळी ब्रेक घेतात. त्यानंतर पुन्हा साडेतीन वाजता रिक्षा काढतात ते सायंकाळी ६.३०पर्यत रिक्षा चालवतात. रिक्षामालकाचा वाटा वजा होऊन त्यांना दिवसाकाठी २०० ते २५० रुपये मिळतात. रिक्षा चालवण्यासाठी पती आणि सासरे हरिभाऊ यांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे सांगतात. रिक्षा चालवली तर लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, आपल्याला हे जमेल का? ही भीती त्यांना होती. पण, सासऱ्यांनी धीर दिला. 'बायका विमान चालवतात, तू रिक्षा चालवयाला काय घाबरते, बिनधास्त चालव, मी तुझ्या पाठीशी आहे,' असे सासरे म्हणाले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे पाहिले नाही. 'आता माझा चांगला जम बसला आहे. मी रिक्षा चालवते त्या मार्गावरील प्रवाशांचेही खूप सहकार्य मिळते. काही प्रवासी महिला माझ्यासोबत फोटो काढतात, काही कौतुक करतात. हे सर्व ऐकले की, मला मोठा आधार वाटतो आणि उत्साह वाढतो,' अशी भावना अनामिका व्यक्त करतात. पुरुष प्रवासी, परिसरातील रिक्षावाले, पोलिस सर्वांचेच सहकार्य मिळते, असेही त्या आवर्जून नमूद करतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि स्वतःची रिक्षा असावी हे आमचे स्वप्न आहे. मोठ्या प्रमाणावर महिला रिक्षाचालक तयार व्हाव्यात यासाठी त्यांना रिक्षा चालवण्यास शिकवण्याचीही त्यांची तयारी आहे. संपर्क - ८४२५९८५०३२.
मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट