स्वतःच्या जिद्दीवर गृहउद्योग उभा करत व इतरांनाही रोजगार मिळवून देणाऱ्या शुभांगी कुलकर्णी एक यशस्वी महिला लघुउद्योजक. उत्पादनातील गुणवत्तेबाबात कोणतीही तडजोड न करणाऱ्या शुभांगी सोळाहून अधिक दर्जेदार उत्पादनांद्वारे घराघरात पोचल्या. यामागे त्यांची २० वर्षांची मेहनत दिसून येते. या यशस्वी महिला उद्योगजकाची ही यशोगाथा.
औरंगाबादमधील सातारा परिसरात राहणाऱ्या शुभांगी गृहशास्त्राच्या पदवीधर. कृषी खात्यात असलेले देविदास कुलकर्णी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. घरसंसारात रमलेल्या शुभांगी यांच्या हातची चव सर्वांनाच ठाऊक होती. या प्रोत्साहनातूनच सन १९९६मध्ये त्यांनी 'सौरभ गृहउद्योग' या नावाने व्यवसायात पहिले पाऊल ठेवले. आटा मेकर मशिनद्वारे त्यांनी आपल्या उद्योगाला सुरुवात केली. त्यांच्या उपवासाच्या भाजणी व राजगिरा पिठाला मिळालेला प्रतिसाद पाहून दुकानदारांकडून अन्य खाद्यपदार्थांची मागणी येऊ लागली. मग व्यवसायाच्या कक्षा रुंदावत त्यांनी मशिनरीज बनवून घेतल्या. कामातल्या गतीमुळे उपवास भाजणीसह राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, भगर, शिंगाडा पीठ, शेंदे मीठ, सुंठ पावडर, चहा मसाला, काळा मसाला, गरम मसाला, मेतकूट ही उत्पादने सुरू करून शहरातल्या जास्तीत जास्त भागात पोहोचवण्याची व्यवस्था केली. साताराच नव्हे तर जालना, वैजापूरहून मागणी असते. दिवाळीच्या वेळी चकली भाजणी आणि अनारसे पीठ आर्वजून मागवले जाते. तर काळ्या मसाल्याची चव कायमच वरचढ ठरते. कच्च्या मालासाठी त्या कधीही तडजोड करत नाहीत. सुंठ पावडरसाठी पंजा सुंठच, तर राजगिरा व शिंगाडा गुजरात व राजस्थानहून मागवतात. शुभांगी यांना पतीच्या कृषिज्ञानाचा व्यवसायात खूप उपयोग होतो. त्यांच्या सल्ल्यानुसार शुभांगी यांनी सोलर ड्रायर विकत घेतला व नाचणी सत्व बनवणे सुरू केले. ड्रायरमुळे सत्वातली पोषक तत्वे कायम राहतात की, नाही हे त्यांनी पुण्याच्या प्रयोगशाळेहून तपासून आणले. अशाप्रकारे डायबेटिस असणाऱ्यांसाठी त्यांनी बिनसाखरेचे नाचणी सत्व तयार केले. ही दोन्ही उत्पादनेही यशस्वी ठरली. चांगल्या अनुभवासोबत अनेकदा उत्पादने माघारी येण्यासारखे काही प्रसंगही त्यांच्या वाट्याला आले. पण, व्यवसायातील जोखीम पत्करत त्यांनी जिद्द सोडली नाही. स्वतःसोबत त्यांनी चार महिलांनाही मदतनीस ठेवले. रोपट्याप्रमाणे व्यवसायाचा सांभाळ करणाऱ्या शुभांगी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब व मामीला देतात.
मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट